तुम्ही काय होता यापेक्षा तुम्ही काय होणार याला जास्त महत्त्व द्या.
मेराज बागवान
प्रत्येक माणसाचे व्यक्तीमत्व असते.प्रत्येकामध्ये काही ना काही गुण दडलेले असतात.प्रत्येकाचा एक प्रकारचा स्वभाव असतो.प्रत्येकाचा आपला आपला दृष्टिकोन असतो.मानसिकता देखील वेगवेगळी असते.व्यक्तिपरत्वे हे सगळे निरनिराळे असते.याचाच अर्थ प्रत्येकजण एकमेव असतो.पण आयुष्याच्या वेगवेळ्या टप्प्यावर स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे असते.हा बदल गरजेचा असतो ,आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि यश संपादन करण्यासाठी आणि अंतिमतः एक कणखर व्यक्ती बनण्यासाठी. म्हणून ,तुम्ही पूर्वी कसे होतात यापेक्षा तुम्ही काय होणार ह्याला जास्त महत्व द्या.
तुमच्या पूर्वीच्या जीवनात तुम्ही कदाचित खूप हळवे असतात.खूप भावनिक असतात.पण पुढील जीवनात ह्या हळवेपणाबरोवर थोडे मजबूत ,मनाने कणखर असणे देखील गरजेचे असते.कारण अति भावनिकता आयुष्य ‘स्टक’ करून ठेवते.म्हणून तुम्ही पूर्वी जर असे असाल तर हाच विचार करण्याऐवजी मी ह्या भावनांचा कशी माझी बलस्थान बनवेन याकडे लक्ष दिले पाहिजे.
भूतकाळात तुम्ही खूप आर्थिक विवंचना पाहिली,अगदी दारिद्य देखील अनुभवले.पण कायम दारिद्र्यात राहायचे की त्यातून उठून उंच भरारी घ्यायची हे सर्वस्वी तुमच्या हातात असते.म्हणून सतत त्या दारिद्र्याचा विचार करण्याऐवजी इथून पुढची परिस्थिती मी कशी बडलेन आणि समृद्धी कडे कशी वाटचाल करेन ह्यावर काम करणे महत्वाचे ठरते.
तुम्ही अनेकदा अपयश अनुभवलेले असतात.मग ते अपयश कोणतेही असू शकते.जसे की ,नोकरीतील,व्यवसायातील,अगदी नात्यांमधील देखील.त्यामुळे कित्येकदा तुम्ही नैराश्यात गेलेले असतात.पण हे तर सर्व घडून गेलेले असते.मग आता मी इथून पुढे काय करणार,काय बनणार,काय होणार याला महत्व दिले पाहिजे. तुम्ही एखादे आयुष्यातील ध्येय निश्चित केले पाहिजे.आणि त्यावर रोज काही ना काही कामकाज केले पाहिजे.आणि हेच पुढील जीवनात ‘म्याटर’ करते.
माणसाच्या हातून अनेक चुका होतात.पण त्या चुका तुम्ही पुढील जीवनात सुधारतात की त्याच चुकांची पुनरावृत्ती करतात हे तुमच्यावर अवलंबून असते. चूक झाली तर ह्यात गैर काही नाही.पण त्या चुकातून तुम्ही शिकले पाहिजे.आणि हे शिकणेच तुम्ही आयुष्यात काय होणार हे ठरवत असते.
तुम्ही अनेकदा भूतकाळात रमत असतात.’हे असे झाले, हे नको व्हायला हवे होते,ह्या व्यक्तीशी भेट व्हायला नको हवी होती, माझं नशीबच फुटके,माझ्याच बाबतीत हे सर्व का’ असं तुम्ही वारंवार स्वतःला म्हणत असतात आणि त्यावर अतिविचार करत असतात.पण जे होते ती विधात्याची मर्जी असते.आणि कधी कधी तो निसर्ग नियम देखील असतो. मग ह्या सर्व गोष्टींमुळे मी असा होतो वगैरे वगैरे तुम्ही बोलत राहतात.पण ह्यातून उठून पुढे गेले पाहिजे.
कोणतीच परिस्थिती कधीच कायम नसते.त्यामुळे तुम्ही काय होतात यापेक्षा तुम्ही काय होणार यालाच कायम महत्व दिले पाहिजे.तुम्ही पूर्वी लाजरे बुजरे ,रागिष्ट,एकटे एकटे राहणारे होतात. आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती.प्रत्येक क्षेत्रात फक्त आणि फक्त अपयश च मिळत होते.आजारपण पाठ सोडत नव्हते.कोणी पाठिंबा देत नव्हते.या सगळ्याचा अर्थ असा होत नाही की, पुढे आता ह्यातून वेगळे काय घडणार?
तुम्ही म्हणाल हे लिहायला-वाचायला सोपे आहे.पण हे कसे शक्य आहे.का शक्य नाही? तुम्ही ठरवले तर सर्व काही शक्य काही.फक्त त्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे, कष्ट-मेहनत केली पाहिजे,आत्मविश्वास बाळगला पाहिजे,संयम हवा ,बदल स्वीकारता यायला हवा आणि जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन.ही जर मानसिकता असेल तर तुम्ही नक्किच आयुष्यात यशस्वी होऊ शकतात.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

