“कारण नसतानाही आनंदी राहणारी माणसं Full Energetic असतात..”
मधुश्री देशपांडे गानू
“पाण्याने अर्धा भरलेला ग्लास तुमच्यासमोर ठेवला तर तुमच्या मनात काय येतं??” ग्लास अर्धा रिकामा आहे की अर्धा भरलेला?? ही तर अगदी सोपी परीक्षा आहे माणसाच्या वैचारिक स्थितीची. ग्लास अर्धा भरलेला आहे असं सांगणारी माणसं आनंदी असतात. खरंच, काहीही कारण नसताना आनंदी राहणारी माणसं असतात का?? असतात ना! त्यांचा आनंद हा सर्वस्वी त्यांच्या स्वतःवर अवलंबून असतो, हे त्यांना पक्कं ठाऊक असतं. स्वतःच्या आनंदाची जबाबदारी त्यांनी खुशीने घेतलेली असते. आणि हा आनंद आतून अगदी अंत:करणातून आलेला असतो. तो बाह्य गोष्टींवर, महागड्या वस्तूंवर, बाह्य व्यक्तींवर अजिबातच अवलंबून नसतो. आणि म्हणूनच तो शुद्ध, खरा, अक्षय असतो. मग असं कारण नसताना आनंदी राहणारी माणसं असतात तरी कशी??
१) आनंदी माणसं ही त्यांच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असतात. समाधानी असतात. नवीन मिळवण्याचा प्रयत्न करतातच पण सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहतात.
२) ही आनंदी माणसं कृतज्ञता नेहमीच शब्दांतून, कृतीतून व्यक्त करतात. मनापासून कौतुक, शाब्बासकी, प्रेम, जिव्हाळा, ममता, एखाद्याचे आभार लगेच व्यक्त करतात.
३) आत्ता या हातात असलेल्या वर्तमान क्षणासाठी भरभरून जगतात. भूतकाळ, भविष्याच्या विचारांमध्ये अडकून राहत नाहीत.
४) अत्यंत प्रेमळ असतात. विचारी, संयमी, मदतीला धावून जाणारी, प्रत्येकाचा आदर करणारी असतात.
५) नकारात्मक व्यक्ती आणि नकारात्मक विचार यापासून लांब राहणारी असतात.
६) ईर्षा, मत्सर, हेवा, गॉसीप अशा नकारात्मक भावनांवर स्वतःची ऊर्जा आणि वेळ ते कधीही वाया घालवत नाहीत.
७) सदा हसतमुख असतात. त्यांचं हास्य हे अस्सल, खरं असतं. अगदी त्यांचे डोळेही हसरे, दयाळू असतात. त्यांची देहबोली ही मनाला सुखावणारी, प्रसन्न असते. जिथे जातील तिथे सगळ्यांना आपलंसं करतात.
८) आनंदी व्यक्ती सतत नवीन संधी, आव्हानं, मौजमजा यासाठी तयार असतात.
९) अत्यंत आत्मविश्वासपूर्ण असतात. स्वतःच्या क्षमतांवर त्यांचा वास्तववादी विश्वास असतो. त्याचबरोबर स्वतः मधल्या कमतरताही त्यांना माहीत असतात.
१०) स्पर्धेला महत्त्व न देता सहकाराला महत्त्व देतात. इतरांच्या यशस्वीतेमध्ये आनंदी होतात.
११) अध्यात्म, ध्यानधारणा, योगासने, कुटुंब, मैत्री याला प्राधान्य देतात. पैसा, स्टेटस, प्रॉपर्टी, महागड्या गाड्या, वस्तू यांना अवास्तव महत्त्व कधीही देत नाहीत.
१२) शारीरिक, मानसिक आरोग्याची उत्तम काळजी घेतात. त्यामुळे आनंदी माणसांना शांत झोप लागते.
१३) आनंदी माणसं त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना, अडचणींना समर्थपणे, धैर्याने तोंड देतात. आणि योग्य वेळी योग्य तोडगा काढतात.
१४) आनंदी माणसे ही तुमचा ऐकणारा कानही असतात.
१५) आनंदी माणसांच्या सानिध्यात तुम्हांला नक्कीच सुरक्षित वाटतं.
ही झाली आनंदी माणसांची काही लक्षणं. अशी माणसे कोणत्याही नकारात्मक भावना, व्यक्ती यांच्यापासून लांब राहतात. मत्सर, हेवा, वाद, गॉसिपिंग यात स्वतःचा वेळ खर्च करत नाहीत. त्यामुळे नक्कीच त्यांची ऊर्जा वाचते. स्वतःच्या शरीर-मनाच्या आरोग्याबाबत जागरूक असल्याने ते इतर व्यक्तींपेक्षा जास्त energetic असतात. अत्यंत आरोग्यपूर्ण, सामर्थ्यवान अशा असतात. आनंदी व्यक्ती यामुळे निश्चितच उर्जेने भरपूर असतात. तेजस्वी दिसतात.
“Energy neither be created nor destroyed. Energy can only be transformed.”
हे निसर्गाचं महत्त्वाचं तत्व आनंदी व्यक्ती तंतोतंत पाळतात. स्वतःच्या ऊर्जेचा योग्य विनियोग कुठे करायचा? कुठे ही ऊर्जा जपून ठेवायची? हे त्यांना छान जमतं. म्हणूनच ते नेहमी कारणा शिवाय आनंदीही असतात आणि full energetic ही.. अशा व्यक्ती अकारण वाद, भांडणं यापासून लांब राहतात. स्वतःच्या रागाचं, दुःखाचं, निराशेचं योग्य नियोजन त्यांना करता येतं. “ज्या नकारात्मक व्यक्ती उगाचच तुमची ऊर्जा खर्च करू पाहतात अशांना आनंदी माणसं चटकन ओळखतात. आणि अशांपासून तातडीने दूर होतात.”
अत्यंत प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या सकारात्मक ऊर्जेचा योग्य विनियोग करून ही आनंदी माणसं स्वतःच्या आयुष्यात समाधानी, आनंदी तर होतातच, पण याच व्यक्ती जिथे जातील तिथे स्वतःच “आनंदाचे झाड” होऊन जातात. आणि त्यांचे कुटुंब, मित्र-मैत्रिणी या आनंदात न्हाऊन निघतात.. आणि हीच positive energy त्यांना ही लाभते. बरोबर ना!!
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


अ प्र तिम!
खुप सुंदर विश्लेषण आणी विवेचन!