सर्वांना समाधानी आयुष्य जगायचंय पण त्यासाठी खाललेल्या ठेचा कोणालाच नकोय..
मेराज बागवान
समाधानी आयुष्य प्रत्येकाला हवं असतं.’माझं सगळं छान,सुरळीत असावं’ असं प्रत्येकाला वाटत असतं. आयुष्यात भरपूर पैसा मिळावा,सुख-समृद्धी नांदावी असे अनेकांना वाटतं. ह्यात हे असं वाटणं काहीच गैर नाही.आयुष्यात हे सर्व मिळतं देखील.पण हे सर्व मिळविण्यासाठी,हे समाधान चेहऱ्यावर आणण्यासाठी अतोनात कष्ट करावे लागतात.अपार खस्ता खाव्या लागतात.असंख्य ठेचा खाव्या लागतात.म्हणजेच अनेकदा अपयश,अपमान,दारिद्र्य,आर्थिक कुचंबणा यासारख्या गोष्टींना निधड्या छातीने तोंड द्यावे लागते.आयुष्यात समाधान कमवायचे असेल तर ,रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागते.कमालीचा संयम ठेवावा लागतो.तसेच आत्मविश्वास आणि खूप प्रयत्न करावे लागतात.पण हे सर्व करायला किती जण तयार असतात? तर खूप थोडे.पण बहुतांशी,सर्वांना समाधानी आयुष्य जगायचंय पण त्यासाठी खाललेल्या ठेचा कोणालाच नकोय.
शालेय जीवनात परीक्षेत यश मिळवायचे असेल तर प्रामाणिकपणे केलेला अभ्यास,सातत्य हे फार महत्वाचे असते.योग्य दिशेने केलेला अभ्यास परीक्षेत मोठे यश देऊन जातो.पण सर्वच विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक येतो का?सर्वच जण उत्तम श्रेणीत पास होतात का ?तर नाही.कारण
प्रत्येकजण तेवढेच कष्ट घेत नाही.पण प्रत्येकाला वाटत असतं, मला चांगले मार्क पडले पाहिजेत.
परीक्षा संपली की नोकरीचे वेध लागतात.तिथे देखील प्रत्येकाला वाटत असते,’मला ना अशी नोकरी मिळायला हवी जिथे अनेकजण माझ्या हाताखाली असतील.मला एवढा पगार असेल.एकदम निवांत,तणावरहित माझी नोकरी असेल.’पण हे सर्व मिळविण्यासाठी खस्ता खायला कोण तयार आहे? हे सर्व समाधान आयुष्यात आणायला कष्ट ,मेहनत सगळेच करतात का ? जीव ओतून,प्रामाणिकपणे काम करणारे किती लोक आहेत? आयुष्यात सर्व सुख सोयी,सुविधा आणि त्यातून मिळणारे समाधान ,शांती प्रत्येकाला हवी आहे.पण ,मेहनत घेण्यासाठी,ह्या यशापर्यंत पोहचण्यासाठी खाव्या लागणाऱ्या असंख्य ठेचा कोणालाच नको आहेत.सगळे कसे कष्ट न करता,’कम्फर्ट झोन’ मध्ये राहून झाले पाहिजे.अशी प्रत्येकाची इच्छा.मी कुठे ही जाणार नाही,पण मला घराच्या जवळ चांगली नोकरी हवी,अशी अनेकांची मानसीकता असते.म्हणजेच काय ,खस्ता खायला माणूस तयार नसतो.
हे झालं करिअर च्या बाबतीत.दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ‘नाती’.आजकाल नाती इतकी तकलादू झाली आहेत की ,एक एक गोष्टी ऐकल्या,बघितल्या तर अंगावर काटा येतो आणि माणूस माणसाला विसरायला लागला आहे हे लक्षात येते.आजकाल प्रत्येकाला घट्ट, एकनिष्ट, विश्वासू नाती हवी आहेत.’मला ना कोणी आपलं असं नाही,माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही,माझा नवरा/बायको किंमत च देत नाही, मुलं चांगली निघाली नाहीत,मित्र मला आदर देत नाहीत,कुटुंबीय तर काय असून नसल्यासारखे,अडचणीला कोणी माझ्या मदतीला येत नाही’.असे अनेकजण म्हणत असतात.
पण ‘मी किती माझ्या कुटुंबीयांसाठी झटत आहे,मी किती माझ्या नवऱ्याचा मान ठेवत आहे,मी किती माझ्या बायकोचा आदर ठेवतो आहे, मी किती जणांच्या अडचणीच्या काळात उपयोगी पडू शकलो/शकते,मी मुलांकडे किती लक्ष देऊ शकलो/शकले’ याचा अनेकजण विचार देखील करीत नाही.’मी किती इतरांना समजून घेतो.त्यांच्याशी किती जुळवून घेते/घेतो,नाती जपण्यासाठी मी माझा अहंकार,ईर्षा किती बाजूला ठेवतो/ठेवते,त्यांच्यावर किती विश्वास ठेवतो’ हे तर पाहण्याचा कोणी प्रयत्न देखील करीत नाही.फक्त इतर माणसे कशी चुकत आहेत,किती विश्वासघातकी आहेत याचाच विचार सगळे करीत असतात.म्हणजेच काय,तर,नाती जोपासण्यासाठी जे कष्ट ,प्रयत्न करावे लागतात ते करायला कोणीच तयार नाही.फक्त एकमेकांना दोष देण्यात आयुष्य चालले आहे.आणि मग फक्त एकच वाक्य तोंडी येत आहे,ते म्हणजे ,’मला समाधानी आयुष्य जगायचं आहे’.
समाधान ,समाधान तरी काय असते? जे तुम्हाला आयुष्यात करायचे आहे आणि ते करून त्यात यश प्राप्त झाले तर मी समाधानी. समाधानी असणे ही एक मानसिकता आहे. कोणाला अमाप पैसा मिळवून देखील समाधान मिळत नाही.कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा हव्यास असतोच.दुसरीकडे,काही थोड्या गोष्टी आयुष्यात मिळाल्या तरी माणसं समाधानी आयुष्य जगत असतात.हे सर्व अवलंबून असते ते तुमच्या दृष्टिकोनावर.
पण कोणतेही समाधान मिळविण्यासाठी, ठेचा तर ह्या खाव्याच लागतात.ते म्हणतात ना ,’कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है.’अगदी तसेच.आयुष्यात एखाद्याचे प्रेम मिळवून समाधान मिळणार असेल, तर त्यासाठी प्रथम स्वतःला झोकून द्यावे लागते,स्वतःला विसरावे लागते आणि मग कुठेतरी ते प्रेम मिळवता येते.पैसे,यश,समृद्धी हवी असेल तर कष्ट ,मेहनत करावी लागते,फुकट काहीच मिळत नाही.घनिष्ठ नाती कमवायची असतील तर आधी स्वतः नाती जपायला शिकले पाहिजे.तुम्हाला जर वाटत असेल, की,मला आयुष्यात आपली माणसं कमवायची आहेत,पैसा कमवायचा आहे,समृद्धी हवी आहे,चांगले आरोग्य कमवायचे आहे ,आणि हे सर्व मिळाले तर मी समाधानी असेन.तर मग ह्या सगळ्यासाठी प्रथम तुम्हाला स्वतःला झिजावे लागेल.तुम्हाला खस्ता खाव्या लागतील.ह्या प्रवासात अनेक ठेचा तुम्हाला लागतील आणि ते सहन करून आयुष्यातील समाधान तुम्हाला मिळवावे लागेल.
हे इतकंच ,अगदी सोपे,सरळ आहे.फक्त मानसिक तयारी हवी आयुष्याला सामोरे जाण्यासाठी.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


छान आहे