एखादी व्यक्ती अचानक एकटी राहत असेल तर ती स्वतःला Strong करतेय,असाही अर्थ होऊ शकतो.
हर्षदा पिंपळे
‘रमा’ आणि ‘सारंग’ सोसायटीमधील क्युट जोडपं होतं. दोघांमध्ये जितकं भांडण असायचं तितकच प्रेम आणि जिव्हाळा दोन्हीही भरभरून होतं.एकमेकांमध्ये चांगलं Bonding होतं.एक दिवस सारंग मिटींगसाठी पुण्याहून नागपूरला चालला होता.आणि जाता जाता त्याच्या गाडीला अचानकपणे अपघात झाला. त्यामध्ये सारंगचा मृत्यू झाला.आणि ही बातमी जेव्हा रमाला कळली तेव्हा ती अक्षरशः कोसळली होती.काय करायचं आणि काय नाही तिला काहीच कळत नव्हतं.एकतर सारंगच्या आई बाबांना आधीच शुगर,बीपी असे त्रास होते.कुणाकुणाला कसं सावरायचं हे रमाला कळतच नव्हतं.तिला त्यावेळेस रडून चालणार नव्हतं.
म्हणून ति काही वेळ एकटं एकटं रहायला लागली. ती स्वतःची समजूत काढत होती.”तुला सारखं सारखं रडून चालणार नाही.आई-बाबांसाठी तरी तुला कणखर व्हावं लागेल.अशी त्यांच्यासमोर सारखी रडत राहिलीस तर कसं होणार ? उठ,आणि पुन्हा नवीन सुरुवात कर.” अशी ती स्वतःच स्वतःची समजूत घालत होती.पण लोकांनी मात्र तिच्या या वागण्याचा वेगवेगळा अर्थ लावला.
“असं बरं वाटतं का,एकटं रहायला. घरात बाकी लोकं आहेत त्यांच्याकडे कोण पाहणार ? त्यांच कोण करणार? असं एकटं एकटं रहाणं चांगलं वाटतं का?,खचली असेल त्याच्या जाण्याने. ” वगैरे वगैरे अनेक अर्थ लावून झाले.
पण तिच्या एकटं राहण्याचं कारण फक्त तिलाच चांगलं माहीत होतं.आणि तिच्या घरच्यांनाही माहीत होतं की रमा खरचं खूप strong आहे. त्यामुळे त्यांनाही बाहेरच्या लोकांकडे फारसं लक्ष दिलं नाही.
कालांतराने, रमाने नव्याने सुरुवात केली होती. सगळं सुरळीतपणे चाललं होतं.
मित्रांनो,
कधी कधी अचानकपणे आपल्या आयुष्यातील सगळी फुलपाखरं एक एक करून उडून जातात. कायमची !
आता ही फुलपाखरं म्हणजे नक्की कोण?आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला आपण फुलपाखरू म्हणून बघूयात.
करिअर, रिलेशन्स,विविध गोल्स,आकांक्षा, छंद या अशा गोष्टींना आपण फुलपाखरू म्हणूयात.
कितीही नाही म्हंटलं तरी आपापल्या गोष्टी आपल्याला खूप प्रिय असतात.
एखाद्या फुलपाखरासारख्याच त्या आपल्याला सुंदर आणि हव्याहव्याशा वाटतात.आपल्या आयुष्यातील आपल्या आवडीची माणसं,आपलं आवडतं करिअर, विविध छंद या गोष्टी खरचं आपल्याला नेहमीच हव्याहव्याशा वाटतात.
आपलं करिअर सक्सेसफुल व्हावं,आपल्याला आपला छंद जोपासता यावा,आपली मैत्री, प्रेम कायम टिकून रहावं असं आपल्याला वाटत असतं.ते वाटणं साहजिक असलं तरी प्रत्येकवेळी ते शक्य होतं असं नाही.
एखाद्या फुलपाखरासारख्याच या गोष्टी कधी भिरभिरत निघून जातात कळतही नाही.पण मग अशावेळेस या गोष्टी मनासारख्या घडल्या नाही की आपल्याला त्याचा त्रास होतो. करिअरमध्ये अपयश आलं की आपण खचून जातो.कुणी जवळचं सोडून गेलं की मानसिक ताणतणाव वाढत जातो.कधी कधी रडावसं वाटतं,सगळं मनातील दुःखं शेअर करावसं वाटतं.आणि कित्येकजण ते दुःखं शेअरही करतात.थोडंफार इतरांमध्ये मिळून मिसळूनही राहतात.इतरांच्या सुखात मिसळून स्वतःचं दुःखं विसरूनही जातात.पण कधी कधी काय होतं काही जणं हेच मनातील दुःख कधी शेअर करताना दिसत नाही.
अशावेळेस काही लोकं अचानकपणे एकटं रहायला लागतात. कुणामध्येही मिसळत नाहीत.मग अशावेळी आपण आपले अंदाज लावून मोकळे झालेलो असतो.”टेन्शन आलं असेन, एकटं वाटत असेन,खचली असेन,फार हळवा/हळवी आहे.” असे बरेच तर्क वितर्क लावून आपण मोकळे झालेले असतो.पण यामागे नेहमीच असं काही कारण असतं असं नाही.
वरील गोष्टीतील रमाचं उदाहरण तुम्ही नक्कीच लक्षात घेऊ शकता.
एखादी व्यक्ती ही सगळ्या गर्दीतून एकटी राहते कारण ती स्वतःला कणखर बनवण्याचा प्रयत्न करत असते.तिला रडायचं नसतं तर लढायचं असतं.त्यासाठीच ती स्वतःला प्रिपेअर करत असते.स्वतःची समजूत स्वतः काढून पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी स्वतःला strong करत असते.स्वतःमध्ये एक हिम्मत निर्माण करत असते.
त्यामुळे एखादी व्यक्ती अचानकपणे एकटी राहत असेल तर तिला तिचा थोडा वेळ घेऊद्या. तिच्या एकटं राहण्याचा आपापल्या परीने अर्थ लावू नका. तिचा एकटं राहण्यामागचा उद्देश ओळखायला शिका.स्वतःला strong बनवण्याचा हासुद्धा एक मार्गच आहे.
तर..परिस्थिती कशीही असूद्या, नेहमी strong रहायचा प्रयत्न करा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

