“चुका त्रास देतात, पण जसे आपण पुढे सरकू तसे त्या सर्वांची गोळा बेरीज एक धडा बनते.”
मधुश्री देशपांडे गानू
स्वातीची आज खूपच चिडचिड होत होती. एकतर बँकेत year ending closing चालू होतं. प्रचंड workload होतं. ओव्हर टाईम करायला लागत होता. त्यामुळे प्रचंड काम, त्याचा stress होताच. घरी यायलाही रोज उशीर होत होता. त्यातच तिच्या तिसरीतल्या लेकाचं तेजसचं प्रोजेक्ट करून द्यायचं होतं शाळेत. तिचे पती राजेश नेहमीप्रमाणे त्यांच्या नोकरीत, रूटीन मध्ये बिझी होते. त्यामुळे घर, ऑफिस, मुलगा अशा सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वातीची नुसती दमछाक होत होती.
घरी स्वयंपाकाच्या मावशी होत्या. वरकामाला मदतनीस होती. तरीही घरच्या बाईला सगळं बघावंच लागतं. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. त्यातच तिच्या सासूबाई तिच्याकडेच असायच्या. वयोमानामुळे आणि तब्येतीमुळे त्यांना हल्ली काही काम जमत नव्हतं. मग त्या उगाचच चिडचिड करत. स्वातीवर तोंडसुख घेत. कुठलंही क्षुल्लक कारण त्यांना पुरत असे. आणि हे हल्ली फारच वाढलं होतं. स्वाती मनाने अत्यंत सुस्वभावी होती. आणि त्यांचं सगळं व्यवस्थित करत होती. सासूबाईंना समजूनही घेत होती. पण अगदी घाई गडबडीच्या वेळी त्या मुद्दाम काहीतरी काम काढून तिचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करायच्या. मग कधीतरी स्वातीचाही तोल सुटत असे. तीही त्यांना चिडून काही बोलायची. कधीकधी मुलावर, नवऱ्यावरही चिडचिड करायची.
नंतर मात्र तिला स्वतःची चूक जाणवत असे. वाईट वाटत असे. अपराधीपणाची भावना तिला जाणवत असे. ज्या घरात वृद्ध माणसं असतात त्या घरातील व्यक्तींना खरंच काही वेळेला खूप कसरत करावी लागते. वयोमानामुळे वृद्ध व्यक्तींना काही जमत नाही आणि आपण आता महत्त्वाचे नाही अशा जाणिवे पोटी ते असं काही बाही वागतात. हट्टीपणा करतात. त्यामुळे कधीतरी घरच्यांची चिडचिड होणं स्वाभाविक आहे. यामुळे चिडचिड होणं, anxiety, stress येणे असं सहज होऊ शकतं. बहुतेक कुटुंबांमध्ये असं चित्र दिसतं.
स्वातीही तिच्या नकळत सासूबाईंवर चिडत होती. नंतर शांतपणे विचार केल्यावर तिला कळत होतं की आपली चूक झाली. आपण असं बोलायला नको होतं. तिला अपराधी वाटू लागायचं. असं अनेकदा झाल्यावर तिच्या लक्षात आलं की, तिचं चिडणं हेच त्यांच्यासाठी reward आहे. (बक्षीस आहे.) त्यांच्या वेळ जाण्याचं साधन आहे. तिने चिडावं म्हणूनच त्या असं वागतात.
फक्त सासू-सून अशा नात्यातच नाही, तर अगदी आई-मुलगी, वडील-मुलगी अशा नात्यांमध्ये ही हे असं घडतं. कारण वृद्ध व्यक्तीं आपण डावलले जातोय की काय? अशा भावनेपोटी ते असं वागतात. हे स्वातीच्या लक्षात आलं. आणि तिने ठरवलं की आता काहीही झालं तरी प्रत्युत्तर करायचं नाही. चिडचिड करायची नाही. शांतपणे ऐकून घ्यायचं. फार झालं तर तिथून निघून जायचं, पण उलट बोलायचं नाही. अनेक वेळा चुका होऊन तिच्यासाठी या चुकांची गोळाबेरीज कायमस्वरूपी एक धडा बनली. आणि ती त्यातून बरंच काही शिकली.
माणूस परिस्थितीनुसार चुकीचा वागतो. कोणी सर्वगुणसंपन्न नसतो. प्रत्येकात दोष हे असतातच. कोणी शीघ्रकोपी असतो, कोणी दुरुत्तर करणारा असतो. कोणी खोटं बोलणारा असतो. काहीतरी दोष असतोच प्रत्येकाच्या स्वभावात. आणि एखाद्या प्रसंगी आपण अशा चुका करतो. आपल्याच प्रेमाच्या माणसांना, मित्र-मैत्रिणींना आपण दुखावतो. आपला अहंकारही आडवा येतो.
मग आपण चूक कबूलही करत नाही. पण कधीतरी आपल्या विचारांचे सुनियोजन करणारा शहाणा माणूस चुका कबूल करतो. त्यातून योग्य तो बोध घेतो. धडा घेतो. आणि स्वतःमध्ये तशी सुधारणा करतो. यालाच माणूस म्हणून प्रगल्भ होणं म्हणतात. प्रत्येक जण चुका करतोच, पण वेळीच ते ओळखून पुन्हा ती चूक न करणे म्हणजे शहाणपण! त्याच त्या चुका परत केल्या तर त्या चुका न राहता एक तर वाईट सवय बनतात नाहीतर गुन्हेगारी प्रवृत्ती..
आपण स्वतःला जितके ओळखतो तितकं दुसरं कोणीच ओळखत नाही. आपण जगाला फसवू शकतो पण स्वतःच्या मनाला नाही. त्याचप्रमाणे आपण केलेल्या चुका आपल्याला त्रास देतातच. अपराधीपणाची भावना आपल्या मनात उत्पन्न करतातच. पण त्यातच अडकून न राहता त्या चुकांचे वास्तव स्वीकारून त्या चुका परत न करण्याचा धडा आपण शिकतो, तेव्हाच आपण माणूसपण कमावतो. मानवी स्वभाव आहे. चुका होणारच. पण त्याची गोळा बेरीज म्हणून धडा घेणे महत्त्वाचं आहे. तर आणि तरच आपली सर्वांगीण प्रगती होते. आणि आपल्या आयुष्यात आपण आनंदी, यशस्वी, समाधानी होतो….
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Nice positive things