Skip to content

माणसाने आपल्या अतिविचारांचा किती विचार करावा, यावर मर्यादा लावता येतात का?

माणसाने आपल्या अतिविचारांचा किती विचार करावा, यावर मर्यादा लावता येतात का?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


लाईट गेली, अरे देवा मला मिक्सर लावायचा होता. आता मी वाटप कस करणार? जेवण कसं तयार होणार? वाटपाची तयारी करून ठेवली होती. आता लाईट आलीच नाही तर काय करायचं? आता आयत्या वेळी मी काय करू? वाटप नसलेलं जेवण कोण खाणार पण नाही. काय करू मी? एका गृहिणीच्या डोक्यातील हे विचार आहेत. या विचारांतून तिला चिंता देखील आली आहे. जेवण कस करायचं याच टेन्शन ना शेवटी. पण हे सर्व विचार आले किती वेळेमध्ये? तर लाईट गेल्यावर लगेचच. जाऊन दोन चार तास झालेत अस देखील नाही. अवघ्या पाच मिनिटांत हे विचार आले. बाकीची लोक सांगतात इतका विचार करु नको. लाईट येईल. नाही आली तर आपण काहीतरी करु. पण नाही. अतिविचार करण्याची सवय काही सुटत नाही. आणि हे फक्त गृहिणीमध्ये असत अस नाही.

अनेक जणांना ही सवय असते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर उगाच जास्त विचार करत बसणे. याला इंग्लिश मध्ये “rumination” असं म्हणतात. याचा अर्थ चघळणे असा होतो. अतिविचारामध्ये देखील हेच केल जात. एकच विषय आणि त्यासंदर्भात येणारे विचार एकसारखे डोक्यात फिरत राहतात. एक प्रकारचा loop तयार होतो. अनेकजणांना ही सवय असते. यातून एखाद्या गोष्टीत मन तर लागत नाहीच पण चिंता पण वाढते. जरी हा एक मानसिक आजार नसला तरी चिंता, नैराश्य यासारख्या मानसिक आजारामध्ये व्यक्ती या अवस्थेत दिसून येते. कितीतरी तेच तेच विचार डोक्यात घोळत राहतात. यातून बाहेर पडता येत नाही. एकदा हे विचारांच चक्र सुरू झाली की चालूच राहत.

कित्येकांच्या स्वभावाचा हा भाग बनलेला असतो. ज्यांना आपण अती काळजी करणारे म्हणतो. आपण जो इतका अतिविचार करतो, गोष्टी चघळत बसतो त्याने आपल्याला त्रास होणार याची सर्वांनाच कल्पना असते अस नाही. कारण आपल्याकडे याला एक सुंदर शब्द दिलेला आहे. ‘काळजी ‘. म्हणून आपण समजवायला जरी गेलो तरी काय ऐकायला मिळत? काळजी आहे म्हणून इतका विचार करते किंवा करतो! आम्हाला काही हौस नाही. पण विचार करणे आणि अतिविचार करणे यात फरक आहे. ज्यातून आपल्याला काम करायला प्रोत्साहन मिळत असेल, आपण विकसित होत असू, चांगल काय वाईट काय यातला फरक आपल्याला समजत असेल तर ते विचार चांगले आहेत अस म्हणता येईल. ज्यातून आपल्याला आहे त्या क्षणाचा आनंद घेता येत नाही, आपण अडकून पडतोय, ज्यातून आपल्याला त्रास होतोय असे विचार काही कामाचे नाहीत.

काही जणांना याची जाणीव असते की आपण अतिविचार करतो आहोत, यातून आपल्याला काही मिळत नाही. पण मग हे कसं कमी करायचं हे ही समजत नाही. इथे ही लोक ह्या अतिविचार करण्याच्या स्वतःच्याच सवयीने टेन्शन घेतात. जशी एका भावनेमधून दुसरी भावना निर्माण होते तसच काहीस होत. म्हणजे मी सारखं चिंतेत असतो यावर स्वतःचा राग येणं. इथे चिंता कमी करण्याच्या आधी राग कमी करण्यावर भर दिला जातो. का? तर चिंता कमी करता येईल. पण पुढे जाऊन कधी परत चिंता आली तरी स्वतःचा राग करून घेण्याचं काही कारण नाही. शेवटी या सर्व सरावाच्या गोष्टी आहे. आपण जितका ज्या गोष्टीचा सराव करणारा तितक्या चांगल्या आपल्याला त्या जमणार.

तसच अतीविचार करण्याची सवय आहे म्हणून त्यावर विचार करत बसलात तर त्रास अधिक होणार. याहून आपल्याला याची जाणीव होते म्हणजेच आपण स्वतः च्या बाबतीत सजग आहोत हे समजून घेऊन ही अतिविचार करण्याची सवय कशी कमी करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. यातून येणारे विचार त्यांना मर्यादा लावण्याहून मुळातच हा अतिविचार करण्याचा स्वभाव बदलण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी हवं तर तज्ज्ञाची मदत घ्या. समुपदेशक यांच्याशी बोला आणि शक्य तितक्या लवकर यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!