Skip to content

नवऱ्याला / बायकोला अगदी पर्सनल भावनेत ठेऊन आपण आपलं सामाजिक आयुष्य जगू शकतो का?

नवऱ्याला / बायकोला अगदी पर्सनल भावनेत ठेऊन आपण आपलं सामाजिक आयुष्य जगू शकतो का?


हर्षदा पिंपळे


माणूस हा समाजाचा एक विशिष्ट भाग म्हणून ओळखला जातो. असं म्हणतात की,माणूस हा एक समाजशील प्राणी आहे. त्यामुळे समाजाचा आणि माणसाचा अत्यंत निकटचा संबंधित आहे. आणि ते कोणताही माणूस सहजासहजी नाकारू शकत नाही.आता कोणत्याही मनुष्याचं आयुष्य हे वेगवेगळ्या प्रकारे विभागलं गेलं आहे.जसं की आपण पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ असं सहज बोलतो.

तर असं माणसाचं आयुष्य हे वैयक्तिक,सामाजिक,आर्थिक, मानसिक, सांस्कृतिक , वैवाहिक अशा विविध भागांमध्ये विभागलं गेलं आहे.तर त्यातीलच सामाजिक आयुष्य म्हणजे माणसाच्या महत्वपूर्ण आयुष्यापैकी एक आहे.माणसाच्या आयुष्यात जितकं त्याच्या वैयक्तिक, प्रोफेशनल लाईफला महत्त्व आहे तितकच त्याच्या सामाजिक आयुष्यालाही महत्त्व आहे. त्या सामाजिक आयुष्याशिवाय तो अपूर्ण आहे असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही.

माणसाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे बदल हे घडत असतात. शिक्षण,नोकरी आणि नंतर सुरु होतं ते वैवाहिक आयुष्य.अर्थात वैवाहिक आयुष्य जगत काय एकट्याचं आयुष्य मुळीच नाही.वैवाहिक आयुष्य आलं की,दोन कुटूंब जोडली जातात.आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन मनं जोडली जातात. दोन मनं एकत्र येतात. अर्थात संसार किंवा वैवाहिक आयुष्य हे दोघांच असतं.त्यात नाही म्हंटलं तरी सगळं दोघांच्या संमतीने करावं लागतं.आणि दोघांचे स्वभाव नेहमीच एकमेकांना समांतर असतील असं नाही.

एकाचा स्वभाव फार हट्टी तर एकाचा फार समजूतदार स्वभाव असतो.अशातच वैवाहिक जीवन सोडून बाकी आयुष्य असतं.पण ते जगताना मात्र जरा विचार करावा लागतो.कारण,वैवाहिक आयुष्याआधी आपण थोडेफार मोकळे नी स्वतंत्र असतो.परंतु वैवाहिक आयुष्य सुरू झाल्यावर आपण आपलेच निर्णय घेताना अनेकदा स्वतंत्रपणे विचार करत नाही.आपल्या नवऱ्याला काय वाटेल ? बायकोला हे सगळं चालेल का ? तिचा/त्याचा यावर काही आक्षेप असला तर ? त्यावेळी अगदी अशाच अनेक शंकाचा, प्रश्नांचा मनात बाजार भरत असतो.

थोडक्यात काय तर आपण आपल्या जोडीदाराशिवाय अनेक गोष्टी करत नाही.मग अनेकदा कुणाला पटतं तर कुणाला नाही. कारण एखादा मुळातच खूप सोशल असतो आणि एखाद्याला सारखं सोशल होणं आवडत नाही. त्यामुळे साहजिकच खटके उडतात.

तर आता मुद्दा असा आहे की,

नवऱ्याला / बायकोला अगदी पर्सनल भावनेत ठेऊन आपण आपलं सामाजिक आयुष्य जगू शकतो का?

तर या प्रश्नाचं उत्तर खरं तर दोघांवर (पती-पत्नी)अवलंबून ठरू शकतं.कारण नवरा आणि बायकोचं नातं हे दृढ विश्वासावर, समजूतदारपणावर दीर्घकाळ टिकून राहतं.कुठल्याही नात्याचा बेस म्हणून विश्वासाकडे नेहमीच प्रथम पाहिलं जातं.अगदी तसचं वैवाहिक नात्याचा बेस सुद्धा हा विश्वास आहे.आणि हाच विश्वास, एकमेकांना समजून घेण्याची पुरेपूर मानसिकता,एकमेकांच्या विचारांचा,मतांचा आदर करण्याची मानसिकता असेल तर नक्कीच नवऱ्याला किंवा बायकोला अगदी पर्सनल भावनेत ठेऊन आपण आपलं सामाजिक आयुष्य जगू शकतो.त्यावेळेस आपल्याला कुणीही सामाजिक आयुष्य जगण्यापासून अडवणार नाही. परंतु हेच जर एकमेकांमध्ये तितकसं अंडरस्टँडींग नसेल, एकमेकांच्या मतांचा,विचारांचा जिथे रिस्पेक्ट नसेल, एकमेकांना समजून घेण्याची पुरेपूर क्षमता, मानसिकता नसेल तर सामाजिक आयुष्य जगताना अनेकदा अडचणी निर्माण होऊ शकतात.वेगवेगळी बंधनं त्यावर येऊ शकतात.एकमेकांमध्ये थोडेफार वाद निर्माण होऊ शकतात.वैचारिक मतभेद होऊ शकतात.

म्हणूनच दोघेही एकमेकांना समजून घेणारे असणं आवश्यक आहे. दोघांमध्ये तेवढी समज असणं आवश्यक आहे.नाहीतर एकही समजून घेणारा नसेल तर ते अवघडही होऊ शकतं.प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वतंत्र असं आयुष्य असतं हे वैवाहिक नात्यात असताना देखील एकमेकांना समजायला हवं.लग्न झालं याचा अर्थ बाकीची आयुष्य नाहीत असा होत नाही याची समज दोघांना असायला हवी. वैवाहिक, वैयक्तिक आयुष्याबरोबरच माणसाला सामाजिक आयुष्यही असतं याची जाणीव दोघांना असेल तर निश्चितच ते त्यांच सामाजिक आयुष्य अगदी निर्धास्तपणे जगू शकतात.

सर्वात महत्वाचं म्हणजे,सगळ्या गोष्टींच भान ठेवून आयुष्य जगायला शिका.नाहीतर सामाजिक आयुष्य जगताना वैवाहिक आयुष्याकडे दुर्लक्ष झालं तर त्याचे काही विपरीत परिणाम होऊ शकतात.म्हणूनच दोन्हीही गोष्टींचा समतोल साधण्याचा प्रयत्न करा.त्यामुळे आयुष्य सोपं आणि सुखकर होईल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!