Skip to content

आपल्याला काळजी घेणारी व्यक्ती हवी असते, काळजी घेण्याचं व्यसन जडलेली व्यक्ती नाही.

आपल्याला काळजी घेणारी व्यक्ती हवी असते, काळजी घेण्याचं व्यसन जडलेली व्यक्ती नाही.


हर्षदा पिंपळे


रेवती आणि अभिषेकची खूप छान मैत्री होती.रेवतीचा स्वभाव काळजी घेण्याचा होता.म्हणजे तिला प्रत्येकाची काळजी घ्यायला आवडायचं.अभिषेक हा तिचा बालपणीचा मित्र होता.अगदी बालवाडी ते एकाच कंपनीमध्ये नोकरी असा त्यांचा प्रवास खरच खूप छान होता.रेवती काळजी घ्यायची त्यामुळे सगळ्यांना कशाचीच काळजी नसायची. कधीही कुठेही जाताना सगळ्या गोष्टींमध्ये रेवती पुढे असायची.

अगदी काळजी घेण्यामध्येही रेवती पुढेच होती.कुणाला काही लागलं,खरचटलं,कुणी नाराज असेल,रडत असेल तर रेवती त्यांची उत्तम काळजी घ्यायची. पण हळुहळू रेवतीचं वागणं बदलत चाललं होतं. काळजीचं तिला जणू व्यसनच जडलं होतं.अभिषेकला मध्यंतरी बरं नव्हतं हे तिला माहीत होतं. त्यामुळे ती आणि बाकी मित्र बऱ्याच दिवसांनी अभिषेकला भेटायला आले होते.त्या दिवशी रेवतीने अभिषेकला काळजीचे इतके डोस पाजले की अभिषेक अक्षरशः वैतागला.खरं तर अभिषेक पूर्णपणे बरा झाला होता.

पण रेवतीने त्याला त्या दिवशी फारच कमजोर करून टाकलं.”असचं करू नको,हेच कर,तेच कर.मी करते,असं करायचं नाही. तसं करायचं नाही.आता मी सांगेन तसच करत जा.कसं होणार तुझं ?काहीच कशी काळजी नाही तुला.दे ,हे मी करते.” असं सातत्याने बोलून तिने त्याला हैराण करून सोडलं.एरवी ती अशी कधी वागलीच नव्हती.

सगळ्यांना वाटलं अभिषेकच्या बाबतीत जरा जास्त पझेसिव असेन. पण खरं तर तसं काही नव्हतं.कारण ती येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाशी असच वागत होती.येणाऱ्या जाणाऱ्यालाही ते असह्य होत होतं.ती अशी काळजी घ्यायला लागली होती की समोरच्याला वाटायचं आपल्याला बांधून ठेवलय या काळजीने.तिची ही अशी अतिकाळजी पाहून बाकीचेच काळजीत पडले होते.बाकीच्यांना तिचं असं वागणं असह्यही झालं आणि तिच्याचविषयी काळजीही वाटू लागली.एकप्रकारे टॉक्सिक वातावरण तेव्हा तयार झालं होतं.

अभिषेक चिडणार होता पण त्याने कंट्रोल केलं.तो घरी गेला.आणि नेहमीप्रमाणे आईने बाहेरून आला म्हणून त्याला पाण्याचा ग्लास हातात आणून दिला.बाजूला चहा बिस्कीटं ठेवली.पण त्यावेळेस मात्र अभिषेकचा कंट्रोल सुटला.”अगं मी काही लहान नाही. माझं मला घेता येतं पाणी.आणि मी घेतलं असतं हाताने.तु आणून द्यायची काहीही गरज नव्हती. किती काळजी करशील….. बस् कर आता काळजी घेणं.” अशा शब्दात आणि उंच आवाजात त्याने आईला सुनावलं.

क्षणभर तो आईशी बोलतोय हे विसरून गेला होता.भानावर येताच त्याने आईला सॉरी बोलून तिला सगळं सांगितलं.आईनेही त्याला समजून घेतलं.

“काळजीलाही मर्यादा असावी लागते रे अभि…किती घ्यायची, कधी घ्यायची आणि कशी घ्यायची याचं कौशल्य आत्मसात करता यायला हवं.नाहीतर उगाचच कधी कधी काळजीमुळे समोरचाही नकळतपणे कमकुवत बनत जातो.आणि इतकच नाही तर समोरच्यालाही अवलंबून रहायची सवय लागते.कुणीतरी आपली काळजी घेतय म्हंटल्यावर स्वतःची काळजी स्वतः कित्येकजण घेतच नाही.आणि या अतिकाळजीमुळे एखाद्याची प्रायव्हसीसुद्धा भंग होते.प्रत्येक गोष्टीत काळजी काळजी….. नको वाटतं रे.स्वतःचं चित्र कधीतरी स्वतः काढायला हवं नं ? त्यात सातारा कुणाची मध्यस्थी कशाला ?

काळजी असावी, काळजी घ्यावी त्यात वाईट काहीच नाही. पण तिचा नको तिथे,नको त्या वेळी अतिरेक होता कामा नये.”

आई म्हणाली.

“हो गं आई…मलाही हेच बोलायचय.आपल्याला काळजी घेणारी व्यक्ती हवी असते, पण काळजी घेण्याचं व्यसन जडलेली व्यक्ती नाही. पण ती रेवती.कहर केला गं तिने.जाऊदे मी जरा बाहेर मोकळ्या हवेत फिरून येतो. तेवढाच मूड फ्रेश होईल.”

असं बोलून अभि बाहेर गेला.

तर मित्रांनो,

काळजी… यालाच आपण इंग्रजीमध्ये केअर असं म्हणतो.खरं सांगायचं झालं तर, कुणीतरी काळजी घेणं म्हणजे एक सुखावह फिलिंग वाटतं. नातं कोणतही असो,त्या नात्यात काळजी, आपुलकी, प्रेम ,आदर अशा भावना असणं आवश्यक असतं. तरच ते नातं चांगल्या प्रकारे बहरत जातं.आणि इतकच नाही तर प्रत्येकाला वाटतं की कुणीतरी आपली काळजी घ्यावी.

आपण धडपडलो तर कुणीतरी जखमांवर मायेची फुंकर घालावी असं कित्येकांना वाटतं.नवऱ्याला वाटतं बायकोने काळजी घ्यावी, मुलांना वाटतं पालकांनी काळजी घ्यावी.थोडक्यात काय तर कुणीतरी आपली मनापासून काळजी घ्यावी हे वाटणं स्वाभाविक आहे.आपल्या आयुष्यात आपल्याला काळजी घेणारी व्यक्ती ही हवी असते.आयुष्यात काळजी घेणारं कुणी असलं की सगळ्या चिंता सहज मिटतात.त्यात काहीच शंका घेण्यासारखं नाही.एक वेगळा आधार त्या काळजी घेणाऱ्या व्यक्तीमुळे असतो.

पण ह्याच काळजीचं जर अतिकाळजी मध्ये रूपांतर झालं तर ? काळजी घेणारे आणि अतिकाळजी घेणारे/करणारे अशा या माणसांच्या वेगवेगळ्या तऱ्हा.एखादी व्यक्ती काळजी घेत असेल तर काही वाटत नाही. मनाला बरं वाटतं.पण हेच जर आयुष्यात अतिकाळजी करणारी /घेणारी व्यक्ती असेल तर जगणं फार अवघड होऊन जातं.अतिकाळजी करणारी लोकं अशी भासतात जणू काही यांना काळजीचं व्यसनच जडलेलं आहे.

एखाद्या माणसाला एखादं व्यसन लागलं की ते लवकर सुटत नाही.व्यसन फार वाईट असतं असं म्हणतात.तसचं हे काळजीचं व्यसनही फार वाईटच म्हणावं लागेल.काळजी असावी पण काळजीचं व्यसनच एखाद्याला जडलं असेल तर ते फार काही चांगलं नाही.काय आहे,काळजी घेण्याचं हे व्यसन समोरच्या व्यक्तीला फार त्रासदायक ठरू शकतं.समोरच्या व्यक्तीची काळजी कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता वाढते.

एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की तो नकोनकोसा होतो.आणि त्यात हे काळजीचं व्यसन असेल एखाद्याला तर ‘कुणीतरी आपली काळजी घ्यावी’ असं सहसा कुणाला वाटणारच नाही.अशा व्यसनापेक्षा कुणी काळजी न केलेलीच बरी असं बोलणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढत जाईल.कुणी मनापासून थोडी काळजी घेत असेल तर ती काळजीही त्यांना नकोशी वाटेल.जितकं काळजी घेणारं कुणी सुखावह वाटत असेल तितकच कालांतराने ते त्रासदायक, अस्वस्थ करणारं वाटू शकतं.हे वरील उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलच असेल.

एकच लक्षात ठेवा,प्रत्येकाला काळजी घेणारी व्यक्ती हवी असते परंतु काळजीचं व्यसन जडलेली नाही.

म्हणून,काळजी घेणं हा स्वभाव नक्कीच असायला हवा परंतु काळजी घेण्याचं व्यसन मात्र नसलं पाहिजे.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “आपल्याला काळजी घेणारी व्यक्ती हवी असते, काळजी घेण्याचं व्यसन जडलेली व्यक्ती नाही.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!