Skip to content

आनंदी आयुष्य जगायचे असेल तर त्याला तुमच्या ध्येयाशी जोडा,नाही की माणसांशी किंवा वस्तुंशी !

आनंदी आयुष्य जगायचे असेल तर त्याला तुमच्या ध्येयाशी जोडा,नाही की माणसांशी किंवा वस्तुंशी !


हर्षदा पिंपळे


प्रत्येकालाच आनंदी आयुष्य जगावं असं वाटत असतं.आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो.पण अनेकदा आनंदी आयुष्यासाठी काय करावं हेच कित्येकांना उमजत नाही.वेगवेगळे उपाय करून, टिप्स फॉलो करूनही आनंदी कसं रहायचं? आनंदाने आयुष्य कसं जगायचं? या प्रश्नांचा उलगडा होत नाही.अनेकदा आपण दुःखी , नाराज ,हताश होतो ते माणसांमुळे.

आपलं आयुष्य माणसांशी, वस्तूंशी, निसर्गाशी अगदी छोट्या छोट्या गोष्टींशी जोडलं गेलं आहे. पण काय होतं अनेकदा आपण या गोष्टींना इतकं जवळ करतो की त्याला काही सीमाच नसते.आपण माणसांमध्ये इतके गुंतून पडतो की आपलं आपल्याला भानचं उरलेलं नसतं.आपली माणसं ,आपल्या वस्तू आपल्याला इतक्या प्रिय असतात की आपल्याला वाटतं हाच आपला आनंद आहे. केवळ यांच्यामुळे आणि यांच्यामुळेच आपलं आयुष्य आनंदी, सुखी आहे.

पण प्रत्यक्षात असं खरचं काही आहे का ?

आनंदी आयुष्य जगणं म्हणजे केवळ माणसांभोवती पिंगा घालणं,वस्तूंशी कनेक्ट होणं आहे का ? आपण आपल्या आयुष्याला माणसांशी जोडतो,वस्तूंशी जोडतो.पण यामुळे आपण खरचं आनंदी असतो का ? हा प्रश्न एकदिवस स्वतःला नक्की विचारून पहा.


हल्ली, आनंदी आयुष्याच्या व्याख्याच बदलत चालल्या आहेत.आणि आनंदी आयुष्याच्या व्याख्येबरोबर हल्लीची माणसही बदलत चालली आहे. एखाद्या ऋतूप्रमाणे ही हल्लीची माणसं बदलताना दिसतात. क्षणार्धात कुणी कसं वागेल काही सांगताच येत नाही.

घटक्यात प्रेम नी घटक्यात द्वेष करणारी आजची माणसं खरचं आपलं आयुष्य आनंदी करतात का ? खरचं त्यांच्यामुळे आपलं जगणं आनंदी होतय का ?

मुळातच आपलं आयुष्य त्यांच्याशी जोडलं गेलय हे वास्तव आहे. आणि त्याहीपलीकडे जाऊन विचार करायचा झाला तर…आपण एकतर त्या माणसांना पूर्णपणे स्वीकारणं गरजेचं असतं.आणि मुळातच आपण ते करत नाही. त्यामुळेच काही काळानंतर आपल्याला त्याचाच त्रास होतो.आपली माणसं आपल्याशी नीट वागत नाहीत.

येता जाता सहज दुःखावून जातात.आणि वस्तूंच म्हणाल तर…वस्तूही आज असतात उद्या नाही. त्या वस्तूंच केव्हा काय होतं आपल्यालाही कळत नाही. तरीदेखील आपण वस्तूंच्या मागे धावत राहतो.माणसांच्या मागे धावत राहतो.आपल्या आयुष्याला माणसांशी, वस्तूंशी जोडत राहतो.पण मग हल्ली अशा गोष्टींसोबत आपलं आयुष्य फार आनंदी आहे असं वाटत नाही. कुठलं ना कुठलं दुःखं आयुष्यात आहेच.

मग चुकतय काही? की, काहीतरी बदल गरजेचा आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. माणसांशी आयुष्य जोडून झालं,वस्तूंशी जोडून झालं.मग आता थोडा वेगळा विचार करून पहायला काय हरकत आहे.

या आयुष्याला आपण ध्येयाशी जोडलं तर ?

किती छान कल्पना आहे नं ?

आपण आपल्या आयुष्याला ध्येयाशी जोडणं ही खरचं खूप छान कल्पना आहे.एक वेगळा विचार आहे. माणसांच्या, वस्तूंच्या पलिकडेही एक वेगळं विश्व असतं हे त्या ध्येयांमुळेच आपल्याला लक्षात येतं.आता मुळातच ध्येयाची व्याख्याही प्रत्येकाच्या परिने वेगळीच असणार यात प्रश्न नाही.तर सांगायचं इतकच की,आयुष्याला माणसांव्यतिरिक्तही आपण दुसऱ्या गोष्टीशी जोडायला हवं.आणि त्यापैकी ध्येय ही एक चांगली गोष्ट वाटते.निश्चितच आपण आपल्या आयुष्याला ध्येयाशी जोडलं तर आपलं आयुष्य हे आनंदी होऊ शकतं.

हं,आता प्रत्येकाने ध्येय ठरवायला हवं.खरं तर गाडी घेणं , बंगला घेणं , खूप संपत्ती मिळवणे ही आपल्या आयुष्याची ध्येय नसावीत.याला आपण आपली छोटी मोठी स्वप्नं नक्कीच म्हणू शकतो.आपल्या गरजाही म्हणू शकतो.

यशस्वी होणं,एक चांगला माणूस होणे,समाधानी, आनंदी जीवन जगणं हे आपल्या आयुष्याचं ध्येय असायला हवं. या ध्येयांशी आपलं आयुष्य आपण जोडायला हवं.यांच्यामुळे आपलं आयुष्य निश्चितच आनंदी होऊ शकतं.आनंदी आयुष्यासाठी ही ध्येयं नक्कीच महत्वाची आहेत.

नुसतच माणसांच्या मागे,वस्तूंच्या मागे धावण्यात काहीच अर्थ नाही. या सगळ्यात आपण आपल्या स्वतःवरही लक्ष द्यायला हवं.आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करायला हवं.ध्येय गाठण्याची प्रोसेस अवघड असते मान्य आहे, परंतु जेव्हा त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचतो त्यावेळी होणारा आनंद,त्यावेळी होणारे आयुष्यातील बदल खरच खूप काही देऊन जाणारे असतात.एकवेळ माणसं साथ सोडतील, वस्तू हरवतील पण ध्येय मात्र साथ सोडून कधीच जाणार नाहीत.

म्हणून

आनंदी आयुष्य जगायचे असेल तर त्याला तुमच्या ध्येयाशी जोडा,नाही की माणसांशी किंवा वस्तुंशी !


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आनंदी आयुष्य जगायचे असेल तर त्याला तुमच्या ध्येयाशी जोडा,नाही की माणसांशी किंवा वस्तुंशी !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!