माझ्या नवऱ्याचं अफेअर आहे / माझ्या नवऱ्याचं अफेअर नाहीये, नेमकं कोणत्या मनाचं ऐकायचं??
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
गायत्री खूप दिवसांपासून अस्वस्थ होती. एक गोष्ट जी मनात बसली होती ती काही केल्या जाईना. गोष्ट तिच्या नवऱ्याच्या बाबतीत होती. प्रथम, तिचा नवरा, काही महिन्यांपूर्वीच त्याची बदली पुण्याला झाली होती. त्याआधी ती दोघही मुंबईला राहत होती. आता कंपनीमार्फत त्याची बदली झाली होती. हा त्याचा ट्रेनिंग पिरियड होता.
तो फक्त एक वर्षासाठीच तिथे राहणार होता. त्यामुळे गायत्री आई बाबांसोबत राहील अस त्यांनी ठरवलं. सुट्टीमध्ये तो येऊन जाऊ शकत होता. त्या प्रमाणे तो पुण्याला राहू लागला आणि ही मुंबईला. सुरुवातीला त्यांचं सारखं बोलण व्हायचं. तो सुट्टीत घरी देखील यायचा. रात्री न चुकता गायत्रीला फोन करायचा. दोघं सध्या वेगळ्या शहरात राहत असल्याने गोष्टी देखील वेगळ्या होत्या. त्यामुळे ते सर्व सांगण्यात एकमेकांचा वेळ जाई. तो आल्यावर देखील ती दोघं बाहेर कुठेतरी फिरायला जात.
पण अलीकडे काही दिवसात चित्र बदलल होत. बोलण तर कमी झालच होत, पण दर वेळी सुट्टीत जसा तो घरी यायचा ते येणं पण कमी झालं. गायत्रीने जेव्हा सुरवातीला याबद्दल विचारलं तेव्हा तो कामाचा खूप व्याप असतो त्यातून वेळ मिळत नाही म्हणाला. तिला देखील ते पटलं. पण नंतर नंतर तिला शंका येऊ लागली. असे एक दोन प्रसंग घडले होते जेव्हा ती दोघं फोनवर बोलत होती आणि बोलता बोलता त्याने फोन अचानक कट केला होता.
नंतर विचारल्यावर त्याने नीट काही सांगितल ही नाही. असच एकदा तो बोलत होता तेव्हा बाजूने मुलीचा आवाज आला होता. त्या दोघांचे बरेचसे नातेवाईक पुण्यामध्ये राहत होते. त्यातल्याच एका नातेवाईकाने गायत्रीला एकदा बोलताना सांगितल की प्रथमला त्यांनी एका मुलीसोबत पाहिलं होत. या सर्व गोष्टी अश्या पद्धतीने घडत गेल्या की गायत्रीला मनातून वाटू लागलं की आपल्या नवऱ्याच तिथे अफेयर चालू आहे म्हणून तो असा वागत आहे.
आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्याच घरी यायचं प्रमाण कमी झालं आहे. बर यावर त्याच्याशी सविस्तर बोलावं, त्याची बाजू काय आहे हे समजून घ्यावं अस काही झालंच नाही. का? तर मी अस थेट विचारलं तर त्याला काय वाटेल? त्याला वाटेल माझी बायको माझ्यावर संशय घेते. म्हणून ती काही बोलली नाही. नवरा बायकोमध्ये जो एक खुला संवाद होण गरजेचं आहे तेच इथे नव्हत. त्याच येणं जाणं बोलण कमीच झाल्याने त्याने स्वतःहून काही सांगण्याचा प्रश्नच नव्हता.
किंबहुना गायत्री असा विचार करते ह्याचीच त्याला कल्पना नव्हती. गायत्री पूर्णपणे त्याच्यावर अविश्वास दाखवत होती अस नव्हत. तिची द्विधा मनस्थिती झाली होती. एका बाजूला वाटत होत की प्रथम अस काही करणार नाही. तो आपल्याला फसवणार नाही. दुसऱ्या बाजूला वाटत होत की तो आपल्यापासून काहीतरी लपवतोय. त्याच हे अस वागणं, या गोष्टी याचा अर्थ असा होता की नक्कीच त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे. दोन्ही प्रकारचे विचार तिच्या डोक्यात येत असल्याने तिला काहीच समजत नव्हत. नेमक कोणाचं ऐकायचं. आपला विश्वास खरा मानायचा की समोर जे काही दिसत ते खर मानायच. विचारायची हिम्मत तर होतच नव्हती. त्यामुळे अजूनच त्रास होत होता.
गायत्रीच्या बाबत जे होत होत ते अनेक स्त्रियांच्या बाबत होत. नवऱ्याच्या अश्या काही गोष्टी, वागणं अनुभवाला येत की समजत नाही आपण कसा विचार करावा. कुठल्या मनाचं ऐकावं. काय असेल याच उत्तर? तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या विचारांमध्ये बदल करणे. आपल्या मनाला वाटलं म्हणून अस होऊ शकत किंवा अस होईल हे लॉजिकल नाही.
ही एक वैचारिक चूक आहे, ज्याला इमोशनल रीझनिंग अस म्हणतात. म्हणजेच काय तर आपल्याला वाटत म्हणून खर मानायचा. त्याला पुरावा असतो का? तर नाही. त्याला भक्कम आधार अस काहीच नाही पण मला वाटत ना म्हणजे होणार. भर उन्हात अस म्हणणं की आता पाऊस पडेल. आपण जो काही विचार करतो किंवा बोलतो त्याला काहीतरी आधार लागतो.
आणि समजा काही पुरावा असला तरी तो आपण ज्या टोकाला जाऊन विचार करतोय, समज करून घेतोय त्यासाठी पुरेसा आहे का? गायत्रीच्या बाबतीत तो फोनवर जास्त बोलत नव्हता, घरी जास्त येत नव्हता, मुलीसोबत दिसला ही कारणं खरच पुरेशी होती का? हल्ली कामाच्या निमित्ताने मुल मुलींचं भेटणं बोलणं होत. तसच घरातल्या लोकांशी बोलण पण कामाच्या व्यापात राहून जात. आताच जगच तस आहे. अश्या गोष्टी होत राहतात. पण म्हणून आपण पूर्ण आंधळा विश्वास ठेवून सर्व गोष्टीवर डोळेझाक करायची अशी अपेक्षा नाही.
इथे महत्त्वाचं आहे आपण जो काही विचार करतोय तो विवेकी असणं? म्हणजेच त्याला काहीतरी आधार असला पाहिजे, तर्क पुरावा असला पाहिजे. त्यात सर्व शक्यता विचारात घेतल्या पाहिजेत. अस जर घडत आहे तर त्याची याहून वेगळी काहीतरी बाजू असू शकते का? आणि दर वेळी आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं माहीत असतील का? नाही. असावीत असा आपल्याला आग्रह तरी का असावा? आपल्या बऱ्याचश्या समस्या या आपल्या चुकीच्या समजुतीतून आणि नात्यात स्पष्टता नसल्याने होतात.
त्याला काय वाटेल म्हणून आपण काही बोललोच नाही तर समोरच्या माणसाला कसं समजेल? आणि आपण ज्या माणसाशी बोलणार आहोत तो आपला नवरा आहे. या नात्यात जर संवाद नसेल तर ते नात कसं बळकट होईल? मनात कोणीतीही भीती न ठेवता आपण मोकळेपणाने जर बोललो तर आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतील. समोरच्या माणसाला पण समजेल की आपल्या या वागण्याचा असा परिणाम होतो आहे. त्यामुळे आपण पण विचार केला पाहिजे. आपण पण संवाद ठेवला पाहिजे.
बऱ्याच जणांचा गोंधळ कुठे होतो? जेव्हा मनात अश्या शंका येतात तेव्हा एखाद्या आरोप्याला जसे प्रश्न विचारले जातात तस बोलण सुरू होत. तु अस वागलासच का? किंवा तू अस काहीतरी केलं म्हणजे नक्की काहीतरी असणार. या अश्या बोलण्याने कोणीही अपमानित होऊ शकत. यापेक्षा आपल्या माणसावर विश्वास ठेवून, त्याची बाजू आधी नीट ऐकून घ्या. मनाला काय वाटत याहून खरी गोष्ट, त्यामधील वास्तविकता तपासा.
नवरा किंवा बायकोचं अफेयर नसत का? तर अलीकडे बऱ्याच जणांमध्ये हे पाहायला मिळत. पण त्याची कारण देखील खूप वेगळी असतात. अश्या गोष्टी होत आहेत म्हणून आपला माणूस पण तसाच असेल असा टोकाचा विचार करण्यापेक्षा सर्व शक्यता पाहून आणि सर्वात महत्त्वाचं ही व्यक्ती आपल्याला किती समजली याचा विचार करून मग निर्णय घ्या.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

