Skip to content

काही दिवस एकमेकांमध्ये अंतर ठेवल्यास एकमेकांना एकमेकांची व्हॅल्यू समजते.

काही दिवस एकमेकांमध्ये अंतर ठेवल्यास एकमेकांना एकमेकांची व्हॅल्यू समजते.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“वृंदा तू असं अचानक कसं ठरवलस माहेरी जायचं? मला काही बोलली नाहीस.” विराज म्हणाला. “अरे, अचानक कुठे? आपलं परवाच बोलण झाल की नाही, की काही दिवस आपण एकमेकांपासून लांब राहूया, एकमेकांना थोडा वेळ देऊया. म्हणून मी विचार केला तर आपल्या दोघांनाही थोडा वेळ हवा असेल तर माहेरी जाणं हा उत्तम पर्याय असू शकतो. तसही मला वर्ष झालं जाऊन. तिथे जाऊन आई बाबा बाकीच्या सर्वांसोबत वेळ घालवता येईल. आणि मी काही कायमची तर जात नाहीये. काही दिवसांनी परत येणारच आहे. कदाचित आपल्या या लांब राहण्याने नात्यामध्ये जी गुंतागुंत झाली आहे ती सुटायला पण मदत होईल आणि आपल्याला स्वतःसोबत पण वेळ घालवता येईल.”

विराज यावर काही बोलू शकला नाही. कारण ती म्हणत होती ते खर होत. खरच त्यांचं यावर बोलण झालं होत. त्याला कारण म्हणजे हल्ली त्यांचे काही ना काही गोष्टींवरून खटके उडत. ती दोघच घरात राहत होती. त्यामुळे त्यांनी कामाच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या. त्यानुसार ते करत देखील. पण समस्या ही होती की ते काम त्या वेळी नाही झालं किंवा त्यात काही गडबड झाली की धारेवर धरलं जाई. त्यात विराज कामाच्या एकंदरीत सर्व बाबतीत जरा particular होता.

एखादी गोष्ट जशी व्ह्यायला पाहिजे तशीच व्ह्यायला पाहिजे. त्यात कमतरता चालणार नाही. वृंदा गोष्टी शक्य तितक्या नीट पुर्ण करायचा प्रयत्न करायची. पण शेवटी आपण माणूस आहोत. त्यामुळे दर वेळी सर्व काही नीट होईलच अस नाही. काहीतरी राहून जात. हे विराजला मान्य होत नसे. हे अस झालच का? किती वर्ष झाली याला तरी का चुका होतात असा त्याचा आविर्भाव असे.

जेव्हा दोन व्यक्ती नात्यात असतात, विशेषतः जिथे नवरा बायकोचं नात असत तिथे एका टप्प्यानंतर अपेक्षांचं प्रमाण वाढत. कारण हे नातच तितक जवळच आणि घट्ट आहे. सुरवातीला तू अस कर किंवा मी हे अस वागतो अस सांगून ज्या अपेक्षा मांडल्या जातात त्या नंतर नंतर अप्रत्यक्षरीत्या मागितल्या जातात.

उदा. ही माझी बायको आहे म्हटल्यावर हिने माझा मूड समजून घेऊन वागल पाहिजे. किंवा एक नवरा म्हणून त्याने माझी प्रत्येक गोष्टीत साथ दिलीच पाहिजे, माझ्या म्हणण्याला होकार दिलाच पाहिजे. हे तोंडाने बोलून दाखवलं नाही तरी मनात ह्याच गोष्टी असतात. जेव्हा हे अस घडत नाही तेव्हा भांडण किंवा तंटे होतात. या आणि अश्या अनेक घटना घडतात जिथे एकमेकांना गृहीत धरलं जातं.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनात एक ठाम विश्वास असतो की ही व्यक्ती, हा माणूस आपल्यासोबतच राहणार आहे. ती कुठेही जाणार नाही. आपण एकटे नाही आहोत, जेव्हा कधी गरज लागेल ही व्यक्ती आपल्यासोबत असणारच आहे. यातून अवलंबून राहण्याच प्रमाण वाढत आणि मग गृहीत धरल जात. भले त्या माणसाला ते जमणार नाही जमणार, त्यात त्याला रस आहे का नाही ते महत्वाचं नाही.

आपल्याला वाटत ना म्हणून मग करायचं. नवरा बायको मध्ये हे प्रमाण जास्त असण्याच कारण हेच आहे की दोघंही एकमेकांच्या खूप जवळ असतात. आयुष्याचा सर्वात मोठा काळ ही दोन माणसं एकत्र घालवतात. त्यामुळे एक हक्काची भावना निर्माण होते. नात्यामध्ये या गोष्टी असू नयेत का? तर असाव्यात. आपण एकटे नाही, आपल्यासोबत कोणीतरी आहे हा विचार चांगलाच आहे. पण यातून जे गृहीत धरणं होत, त्या व्यक्तीला महत्त्व न देणं, अपमान करण या गोष्टी मात्र चुकीच्या आहेत.

वृंदा आणि विराजच्या बाबत तेच झालं होत. एकमेकांना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत गृहीत धरणं, नको तितक्या अपेक्षा यामुळे त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले होते. म्हणून त्यांनी मिळून हा निर्णय घेतला की काही दिवस आपण लांब राहायचं. हा रागात घेतलेला निर्णय नव्हता. विचार करूनच हा निर्णय घेतला होता. अस म्हणतात जेव्हा माणूस आपल्या सोबत असत तेव्हा त्याची किंमत समजत नाही. पण जेव्हा तो माणूस, ती व्यक्ती दूर जाते तेव्हा तिची कमतरता भासते. रोज संघर्ष होण्याहून आपण लांब राहून आपलं काय चुकत आहे हे तपासून पाहू, त्यातून गोष्टी सोप्या होतील अस त्यांना वाटलं. त्यानुसार वृंदाने माहेरी जायचं ठरवलं. ती सहसा माहेरी जात नसे. खरतर तिचं माहेर जवळ होत. पण विराजची गैरसोय होईल या विचाराने ती कधी गेली नाही.

ठरल्याप्रमाणे ती गेली. सुरवातीला एक दोन दिवस काही वाटल नाही. कारण सर्व लोकांना भेटण्यात, बोलण्यात वेळ गेला. पण सेटल झाल्यावर मात्र एकेक गोष्टी आठवू लागल्या. विराज तर रोज घरी आल्यावर जेवणाच ताट तयार असे. ती गेल्यावर त्याने एक दोन दिवस हॉटेल मधुन जेवण मागवलं. पण नंतर मात्र त्याला कंटाळा आला. ते बाहेरच जेवण जेवताना त्याला वृंदाने केलेल्या जेवणाची आठवण येऊ लागली.

एकदा असच तो ऑफिस वरून आला तेव्हा जेवण तयार व्हायचं होत. वृंदा स्वतःच काम करून घरी येऊन सर्व करत असे. तरी त्या दिवशी जेवण तयार नव्हत म्हणून त्याने तिला खूप सुनावलं होत. आता जेव्हा स्वतः ऑफिस मधून येऊन तो स्वतः साठी काही करायला घेऊ लागला तेव्हा त्याला समजलं की वृंदाला काय वाटलं असेल. घरी एकट राहायची कधी वेळ आलीच नाही. त्यामुळे घरात काय लागत काय लागत नाही याबद्दल पण त्याला काही कल्पना नव्हती. सर्व काही वृंदा पहायची. आता हे सर्व मॅनेज करताना त्याची दमछाक होत होती.

इथे वृंदाच सुध्दा तेच झाल होत. तिला त्याची खूप आठवण येत होती. एका प्रसंगात विराजची कमतरता तिला खूपच भासली. तिच्या माहेरी तिचा मोठा भाऊ आणि वहिनी पण होते. तिच्या वहिनीचा वाढदिवस होता. पण तिच्या भावाला ते लक्षात देखील नव्हत. काही भेट वस्तू देण्याचा प्रश्नच नव्हता. हे पाहून वृंदाला आश्चर्य वाटलं. तिने वहिनीला विचारल देखील की तिला वाईट नाही का वाटलं. त्यावर वहिनी म्हणाली, मला काहीही वाटल तरी भावाला ते समजणार आहे का? त्याला या गोष्टी हे वाढदिवस वैगरे याच काहीही अप्रूप नाही.

सुरुवातीला मला वाईट वाटलेले पण नंतर याची सवय झाली. तिचं हे बोलण ऐकून वृंदाला स्वतःचा वाढदिवस आठवला होता. विराजे ने तिला खूप छान अस सरप्राइज दिलं होत. वाढदिवस खूप छान केला होता. आणि त्याला या सर्वाची आठवण करावी लागतं नसे. त्याला माहित असायचं. तिला कधीही काहीही लागलं तरी तो आणून द्यायचा. असच एकदा तिने काहीतरी मागितल होत अगदी तशीच नाही पण त्यासारखी वस्तू तो घेऊन आला होता. पण ती वेगळी होती म्हणून वृंदा ने नाकारली होती. अस केल्याने त्याला काय वाटेल याचा तिने विचार केला नाही. या अश्या अनेक गोष्टी होत्या ज्यातून ते एकमेकांना दुखावत होते. पण ते एकत्र असताना त्यांना समजलं नाही. आता जेव्हा ते एकमेकांपासून दूर राहिले तेव्हा त्याची किंमत समजली.

कोणत्याही नात्यात हे असच असत. जितकं ते नात घट्ट तितक्या त्यात या सर्व गोष्टी पण येतातच. पण दर वेळी आपण एकमेकांपासून लांब राहूच शकतो अस नाही. यासाठीच एकत्र राहत असताना एक माणूस म्हणून एकमेकांचा आदर करण, पुरेसा स्पेस देणं गरजेच आहे.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “काही दिवस एकमेकांमध्ये अंतर ठेवल्यास एकमेकांना एकमेकांची व्हॅल्यू समजते.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!