Skip to content

परिस्थिती स्वीकरण हे स्वतःला move on करण्याचा जबरदस्त उपाय आहे.

परिस्थिती स्वीकरण हे स्वतःला मुव्ह ऑन करण्याचा जबरदस्त उपाय आहे.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“श्रिया कशी आहेस? आश्चर्य वाटतय आज इतक्या लवकर तुला कसा काय भेटायला आलो. कारणच तस आहे. तुझ्याशी भेट करून देण्यासाठी एका व्यक्तीला सोबत घेऊन आलो आहे. ही बघ, मनाली. तुला एक बातमी सांगायची आहे. ऐकून तुला खूप आनंद होईल. आम्ही लग्न करतोय श्रिया. ही बघ पत्रिका. पहिली पत्रिका तुला देतोय.”

अस म्हणत अनुपने ती पत्रिका श्रियाच्या फोटो समोर ठेवली. डोळ्यात खूप पाणी साठले होते. पण कसेतरी त्याने ते रोखून धरले. तो मनालीकडे वळून म्हणाला, मग कशी वाटली श्रिया. आहे की नाही सुंदर? मनाली हसुन हो म्हणाली. त्याने कितीही लपवले तरी त्याचे अश्रू तिला स्पष्ट दिसले होते. तरीही त्याबद्दल तिने त्याला काही विचारले नाही की काही बोलली नाही. त्याला अजून दुखवायची तिची इच्छा नव्हती. तिने श्रियाकडे पाहून नमस्कार केला व ती दोघही तिथून बाहेर आली.

श्रिया, अनुपची पहिली बायको. अवघा एक वर्षाचा संसार. इतकी प्रेमळ मुलगी. सर्वांना आपलंसं करून घेतल होत तिने. लोक म्हणून देखील दाखवत, काहीही म्हणा, अनुपला बायको छान मिळाली. त्याच पण श्रियावर खूप प्रेम होत. त्यांचं लव्ह मॅरेज होत. दोघांचे मित्र मैत्रिणी कॉमन होते. त्यातूनच त्यांची ओळख झाली होती. ती त्याच्याहून वयाने तशी लहान होती. स्वभाव पण लहान मुलीसारखा, अल्लड, अवखळ. तिला आनंदी व्ह्यायला काही फार मोठं कारण लागायचं नाही.

मुळातच चेहऱ्यावर हसू असायचं. त्यामुळे जिथे असायची त्या लोकांमध्ये आपोआप प्रसन्नता यायची. एकदा बोलायला लागली की ती थांबत नसे. माणसांची खूप आवड होती तिला. त्या मानाने अनुप जरा शांत होता. सुरुवातीला त्याला ती बालिश वाटली होती. पण नंतर नंतर त्याला तिचा हाच स्वभाव आवडू लागला. आपल्या सहज बोलण्याने सुध्दा ती समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणायची. अगदी कोणाचा मुड खराब असला तरी तिच्या बोलण्याने तो ठीक होई.

तिला देखील अनुप सुरवातीला एकदम धीरगंभीर स्वभावाचा, अबोल असा वाटला होता. पण नंतर त्यांच्या भेटी होऊ लागल्या, गप्पा होऊ लागल्या तसा त्याचा हाच शांत स्वभाव तिला आवडला. महत्वाचं म्हणजे तो तिला खूप जपायचा. वयाने लहान असेल हे पण कारण असू शकत पण एखाद्या वडिलांचं आपल्या मुलीवर जसं प्रेम असत, माया असते तशी तो तिच्यावर माया करायचा.

अजून काय हवं असत एखाद्या मुलीला? माणसं तर तिला आधीपासून आवडायची. त्यामुळे अनुपच्या मोठ्या कुटुंबाचं तिला दडपण आल नाही. दोघांचही कुटुंब यांना मित्र म्हणून ओळखतच होत. जेव्हा अनुपने श्रियाला लग्नासाठी मागणी घातली तेव्हा तिच्याहून त्या दोन्ही कुटुंबांना आनंद झाला. कारण त्यांना आधीपासून वाटत होत की ही दोघं एकमेकांसाठी योग्य आहेत. खूप धूमधडाक्यात त्यांचं लग्न झालं.

त्यानंतर काय आनंदी आनंद होता. अगदी काही दिवसात ती त्या घराची मुलगी झाली होती आणि सर्वांची लाडकी बनली होती. गम्मत म्हणजे काही झालं तर घरातले अनुपला बोलायचे, ओरडायचे आणि तिची बाजू घ्यायचे. त्यावर अनुप रागवायचा, “मी तुमचा मुलगा आहे आणि दर वेळी तुम्ही हिची बाजू घेता. नॉट फेअर.” यावर सर्व हसायचे आणि म्हणायचे, “तू मुलगा असलास म्हणून काय झालं, ही पण आमची मुलगी आहे, ती पण लाडाची. तिला आम्ही काही बोलणार नाही.”

श्रिया पण त्याला चिडवून दाखवायची. लग्नाला आता वर्ष होत आलं होत. हसत खेळत असे काही दिवस गेले की समजलंच नाही लग्नाला एक वर्ष होत आल. आता कुठे संसार बहरू लागला होता. पण या सगळ्यामध्ये अस काही घडलं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. श्रिया वरचेवर आजारी पडू लागली.

सुरवातीला एक दोनदा त्यांनी फार मनावर घेतलं नाही. आणि ती देखील कोणाला काही दाखवून देत नसे. डोकं वैगरे दुखू लागलं की घरातच काही औषध घे, जरावेळ पड अस करून ती वेळ मारून न्यायची. अनुप त्यावेळी पण डॉक्टर कडे जाण्यासाठी आग्रह करत होता पण तिने ऐकले नाही. पुढे जेव्हा तिचा त्रास वाढू लागला तेव्हा त्याने तिला डॉक्टरकडे नेले. तिथे जी बातमी मिळाली ती खूप धक्का देणारी होती. श्रियाला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. जो लास्ट स्टेजचा होता.

अगदी काही दिवसांची ती सोबती होती. कोणाला कल्पनाही नव्हती की अस काही होईल. पण हेच वास्तव होत. शेवटच्या दिवसात तिला हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करावं लागलं. या सगळ्यामध्ये स्वतःची अवस्था ज्याने सर्वात खराब करून घेतली तो अनुप होता. त्याला हे मान्यच होत नव्हत की श्रिया आता त्याच्यासोबत नसणार आहे. श्रिया समोर तर तो किती तरी वेळा ढसाढसा रडला होता.

पण ती मुलगी मनाने इतकी धीट होती की स्वतःचा त्रास सहन करत त्याला समजावायची. तिच्या त्रासाची कोणाला कल्पना पण करता आली नसती. पण तरी देखील ती हसुत मुख राहायची. सर्वांशी बोलायची. तिचं म्हणणं होत आपण जाताना सर्वांसोबत चांगल्या आठवणी तयार करून जावं. अनुपला पण ती सांगायची, की जरी मी नसले तरी माझ्या, आपल्या आठवणी नेहमी सोबत असणार आहेत. त्या कुठेही जाणार नाहीत. त्यामुळे तू दुःखी राहायचं नाही. तसच तू एकट्याने आयुष्य काढायच नाही.

ज्या दिवशी ती गेली त्या दिवसांपर्यंत अनुप हे मान्य करायला तयार नव्हता. पण हट्टाने तिने त्याच्याकडून हे वचन घेतल की तो एकटा राहणार नाही. तो पुन्हा कोणाच्यातरी सोबतीने जगणार, अश्या व्यक्तीसोबत जी त्याला शेवटपर्यंत साथ देईल, जी त्याला तिच्यासारखी अर्ध्या वाटेतून सोडून जाणार नाही. मनातलं सर्व दुःख त्यादिवशी तिच्या आसवांमधून बाहेर पडल. शेवटी ती गेली. त्यानंतर अनुप जो बदलला तो पूर्वीसारखा झाला नाही.

श्रियामुळे तो जसा आयुष्य भरभरून जगायला लागला होता, आयुष्यावर नव्याने प्रेम करायला लागला होता ते सर्व तिच्यासोबत कुठेतरी हरवलं. तासनतास तो एकटाच बसून राही. श्रियाच्या फोटोसोबत बोलत बसे. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी आपल्या आठवणी तयार केल्या होत्या तिथे जाऊन बसे. बाहेर मिक्स होण दूर तो घरातल्या लोकांशी पण नीट बोलत नव्हता.

परिस्थिती मान्य करण, स्वीकारणं त्याला जड जात होत. घरातले लोक त्याला समजावत पण काही परिणाम होत नव्हता. त्याला पूर्णपणे नॉर्मल व्हायला जवळपास तीन ते चार वर्ष लागली. दुःख पूर्ण गेलं नसल तरी जखम भरत आली होती. घरातल्या लोकांना पण वाटत होत की त्याने लग्न कराव. हे करताना त्यांना आनंद होत अस नाही. कारण त्याच्या आयुष्यातील श्रियाची जागा कोणी घेणं शक्यच नव्हत. पण तरीही तो किती वर्ष अजून एकटा राहणार होता? त्याच वय तरी किती होत? आताच जर त्याला कोणाचीतरी सोबत मिळाली तर कदाचित त्याचं दुःख कमी होऊन तो पुन्हा पहिल्या सारखा होण्याची शक्यता होती.

त्यांनी लग्नाचा विषय काढला तेव्हा सुरुवातीला त्याने

आढेवेढे घेतले. पण ते यासाठी नाही की त्याला झालं ते मान्य नव्हत. वर्ष सरत गेली तस त्याने जे झालं ते स्वीकारलं होत. पण तरी इतक्यात लग्न करयाच नव्हत. त्याचा वेळ घेऊन खूप विचार करून त्याने मनालीशी लग्नाला होकार दिला. मनालीचा स्वभाव पण मन मिळावु होता. अनुपच्या पूर्वायुष्याबद्दल तिला सर्व कल्पना होती. तिने देखील पूर्ण विचार करूनच लग्नाला होकार दिला.

अनुपने लग्न करण्याचा निर्णय घेतला त्याला देखील एक कारण होत. त्याला श्रीयाला दिलेलं वचन पाळायचं होत. एक माणूस म्हणून तो तिचा आदर करत होता. आपण आपल्या आयुष्यात पुढे गेल्याने जर श्रियाला आनंद मिळणार असेल तर तो ते करणार होता. त्याने ही परिस्थिती स्वीकारली होती आणि यातून बाहेर पाडून आता तो आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करत होता. अर्थात श्रियाच्या गोड आठवणी त्याच्या सोबत होत्याच.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!