जगाच्या या गर्दीत स्वतःचा आवाज हरवू देऊ नका.
हर्षदा पिंपळे
पर्णवी म्हणजे बाबांच लाडकं शेंडेफळ.पर्णवीला दोन मोठी भावंड होती.यांच घर म्हणजे समाजातील प्रतिष्ठित घराणं.पर्णवी वगळता पूर्ण कुटूंबच वैद्यकीय पेशामध्ये होतं.पर्णवीची नुकतीच दहावी झाली होती.पर्णवीला आवड होती ती कला क्षेत्रात. डॉक्टर, इंजिनिअरिंग यामध्ये तिला बिलकुल रस नव्हता. गणित आणि विज्ञान तर तिचा नावडीचा विषय. कसेबसे दोन्ही विषयात दहावीमध्ये तिला साठ ते सत्तर गुण मिळाले होते.आता मात्र पुढच्या प्रवेशासाठी तिची धडपड चालू होती.
घरच्यांनी तिच्यासमोर मेडिकल नाहीतर इंजिनिअरिंग असे दोनच पर्याय ठेवले होते.”आपलं सगळं कुटूंब वैद्यकीय पेशात आहे तर तूही मेडिकल क्षेत्रात करिअर कर.ते कला वगैरे घरच्या घरी ठेव.त्यांनी काही पोट भरत नाही.” असं बोलून घरच्यांनी तिच्यावर अपेक्षांचा तगादा सुरूच केला.
नाही म्हंटलं तरी पर्णवी लहानच होती.तिला चित्र,लेखन,फोटोग्राफी यामध्ये जास्त आवड होती.पण घरच्यांपुढे तिचं काहीच चाललं नाही. घरात कटकट, भांडणं नको म्हणून तिने मेडिकल क्षेत्रात जायचा निर्णय घेतला. मनाला पटलं नव्हतच तिच्या पण नाईलाज होता.बारावी झाली. जेमतेम पन्नास टक्के पडले होते पर्णवीला.सीईटी, वगैरे मध्ये तर खूपच कमी स्कोअर होता.सगळं अवघड होऊन बसलं होतं.
कसंबसं ओळखीने तिला मेडीकलला प्रवेश मिळाला. इच्छा नसताना शिकणं म्हणजे फार अवघड असतं.आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं.पर्णवी फार काळ मेडिकल क्षेत्रात टिकली नाही. पहिल्याच वर्षी सगळे विषय राहिले.वारंवार घरच्यांच प्रेशर वाढत होतं.पर्णवीची घुसमटही त्यावेळी वाढत होती.तिचा भित्रा स्वभाव,अतिसमजूतदारपणा तिला त्यावेळी नडला.तिचं कायमच गप्प राहणं तिलाच महागात पडलं.एक दिवस ती स्वतःलाच गमावून बसली.आर्थिक स्थिती चांगली होती,सगळं चांगलं होतं.
फक्त एका गोष्टीमुळे ती स्वतःला हरवून बसली. जगाच्या या गर्दीत ती कोलमडून गेली.एखाद्या गोष्टीतून बाहेर येणं इतकंही सोपं नसतं.त्यासाठी वाट पहावी लागते.पेशन्स ठेवावे लागतात. साधारणपणे असचं, तीन चार वर्षाच्या गॅपनंतर पर्णवी तिच्या वाईट अवस्थेतून बाहेर पडली.
जगाच्या या गर्दीत आपण काय करायला हवं नी काय नको याची चांगलीच जाणीव तिला झाली होती. या गर्दीमध्ये आपण स्वतःही किती महत्वाची भूमिका बजावतो हे तिच्या लक्षात आलं.स्वतःचा आवाज हा बंद करण्यासाठी नाही तर काहीतरी करून दाखवण्यासाठी असतो.आणि तोच आवाज जपणं तितकच आवश्यक असतं.जगाच्या गर्दीत तो हरवला तर जगणं कठीण होऊ लागतं. याचा चांगलाच अनुभव पर्णवीला आला होता.
तर या सगळ्यातून ती बरच काही शिकली. वेळप्रसंगी ती बोलायला लागली. मत मांडायला शिकली. जे जे योग्य आहे ते ते मिळवण्यासाठी ती लढायला शिकली. गर्दीमध्ये स्वतःचा आवाज टिकवून ठेवायला शिकली.
तर पर्णवी शिकली…. तुमचं काय ?
मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्विमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची…
झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची
तू चाल पुढं…
जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन् हत्याराचं फुलावानी घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची
तू चाल पुढं…
[- शांताराम आठवले ]
आठवतय का हे गीत ?
शांताराम आठवले यांनी शब्दबद्ध केलेलं हे गीत म्हणजे आपल्या प्रत्येकाला लाभलेली एक प्रेरणा आहे.ह्या गीताच्या ओळी जिथे कुठे कानावर पडतात तेव्हा मनाला खूप छान वाटतं.खचलेल्या मनाला प्रेरणा देणाऱ्या ओळी जगाच्या गर्दीत कसं जगायचं हे कळत नकळतपणे सांगून जातात.
आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यात काहीतरी करण्यासाठी धडपडत असतो.प्रत्येकाचीच काही ना काही स्वप्न असतात.इच्छा आकांक्षा असतात.आणि प्रत्येकजण ते पूर्ण करण्यासाठी, मिळवण्यासाठी झटत असतो.पण अनेकदा काय होतं एखाद्या भीतीपोटी कित्येकजण पहिलं पाऊल टाकायलाही घाबरतात.प्रत्येकवेळी लोक काय बोलतील याचा विचार ते करतात.यामध्ये स्वतःला जे वाटतय ते करायचं राहून जातं.
कित्येकजण एखाद्या गोष्टीविषयी असणारं मतही लवकर मांडत नाही.लोकं आपली अडवणूक करतच असतात, या गर्दीत कुणीतरी आपला आवाज बंद करतच असतं.पण आपण आपला आवाज या गर्दीत हरवून द्यायचा नसतो.
मित्रांनो, आपल्याला वैचारिक स्वातंत्र्य आहे, भाष्य स्वातंत्र्य आहे, संचार स्वातंत्र्य आहे. आपण त्याचा योग्य ठिकाणी योग्य वापर करायला हवा.प्रसंग कोणताही असुद्या, पण स्वतःला काय वाटतं ते व्यक्त करायला अजिबात डगमगू नका.एकदा घाबरलात तर आयुष्यभर तसेच रहाल.आणि छळणारा मात्र आपल्याला छळत राहील.कायमच असं सहन करत रहायचं का ? आणि किती दिवस ?
जोपर्यंत आपण साहस दाखवत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. त्यामुळे जगाच्या गर्दीत स्वतःला हरवू द्यायचं नसेल तर एक एक पाऊल पुढे टाकणं आवश्यक आहे.वेळप्रसंगी बोलणं गरजेचं आहे. कृती करणं आवश्यक आहे. नकार द्यायला शिकणही गरजेचं आहे.
तुमचा आवाज बंद करणारे रोजच येतील आणि जातील. त्यांच्याकडे फारसं लक्ष देऊ नका.शांताराम आठवलेंच गीत ऐकून तुम्हीही पुढे चालत रहा.अविरत.. निरंतर..!
स्वतःचा आवाज हरवला असेन तर नव्याने शोधायला सुरुवात करा.तो शोधा आणि त्याला जाणीवपूर्वक जपण्याचा प्रयत्न करा.
कारण ,आयुष्यात पुढे जायला तोच एक दिशादर्शक आहे.
So…
Never loose your own voice !
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


लेख खूप छान आहे..