Skip to content

आयुष्याचा कोरा कागद एकदा रंगवून तर बघा, आयुष्यात कसे रोज सुखाचे इंद्रधनू उमटतील…..!

आयुष्याचा कोरा कागद एकदा रंगवून तर बघा, आयुष्यात कसे रोज सुखाचे इंद्रधनू उमटतील…..!


हर्षदा पिंपळे


तुफान पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही,
जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही,
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही…(संदीप खरे )

या गाण्याच्या ओळी आठवतात का हो ? नक्कीच या ओळी प्रत्येकाच्या तनामनात रूजलेल्या आहेत त्यामुळे त्या आठवणार नाही असं कधीच होणार नाही.

तर आपणही असच आज थोडसं या आयुष्यावरच काहीतरी बोलूया.

तर मित्रांनो, ‘आयुष्य’ शब्द तसा छोटाच आहे पण त्याचा पसारा मात्र खूप विशाल आहे. आयुष्यावर जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. साधारणपणे जन्म आणि मृत्यू यामधील जे अंतर असतं त्याला आयुष्य असं म्हंटलं जातं.अर्थात त्याच अंतराला आपण कोरा कागद म्हणून संबोधलं तरी काही हरकत नाही. ते अंतर म्हणजे आपल्या आयुष्याचा जणू कोरा कागदच !

पण आपण काय करतो या कोऱ्या कागदाकडे नुसतं बघत राहतो.आयुष्यात काही घडत नाही म्हणून रडत बसतो.आणि स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्यापेक्षा इतरांच्या आयुष्यात किती आणि काय चाललय याचाच विचार जास्त करतो.इतरांच आयुष्य किती रंगीत आहे, किती सुंदर आहे हे पाहण्याकडे आपला जास्त ओढा असतो.आणि या सगळ्यात आपण इतरांचच बघत बसतो.स्वतःची तुलना इतर लोकांसोबत करायला लागतो.

‘त्यांच्या आयुष्याची पानं किती रंगीत आणि आपली पानं कोरी करकरीत ! अगदी चुरगळलेली म्हंटल तरीही चालेल. नाही का ?’असाच काहीसा विचार करणारी काही माणसं आपल्या अवतीभवती असतात.आणि आपणही कधी कधी असच वागतो.पण आपणही आपल्या आयुष्याचे कोरे कागद रंगवू शकतो हे मात्र विसरतो. मुळात आपण कधी रंग भरायचं नावच घेत नाही. दुःखाचा पाढा वाचत राहतो आपण,अपयशाचा पाढा वारंवार घोकत राहतो.

आणि या सगळ्यामध्ये थोडंफार खचूनही जातो आपण.नकोसं होतं आपल्याला सगळं.एखादी गोष्ट नकोशी झाली की आपण ती तशीच सोडून देतो.आणि मग कोऱ्या कागदासारख्या त्या गोष्टी कोऱ्याच राहतात.मग मला सांगा वारंवार असच केलं तर आयुष्य रंगीत कसं होणार बरं ?

आपण नवे रंग भरलेच नाही, कोरे कागद रंगवलेच नाही तर आयुष्यात सुखाचे इंद्रधनू उमटणार तरी कसे ?

म्हणूनच, आयुष्य सुंदर, रंगीत आहे हे आधी स्विकारून घ्या. दुःख काय आयुष्यात येतच राहतात, रोज कोणती नं कोणती समस्या ही आयुष्यात येतच राहते म्हणून काय आपण रडतच रहायचं का ?

सांगा बरं,एखाद्या चित्रात रंग भरायला विसरलो तर ते चित्र कसं दिसेल ? जोपर्यंत आपण त्या चित्रात रंग भरत नाही तोपर्यंत ते चित्र आपल्याला कोरच भासणार.पण आपण त्याच चित्रात जेव्हा वेगवेगळे रंग भरतो तेव्हा तेच चित्र छान रंगीत दिसतं.अधिकाधिक खुलून दिसतं.

अरे आपल्या आयुष्याचही अगदी असच आहे. जोपर्यंत आपण रंग भरायला सुरुवात करत नाही तोपर्यंत आपलं आयुष्य रंगीत होणार नाही.एकदा संपलं म्हणजे कायमचं संपलं असं नाही. एकदा प्रयत्न करून सहसा काही होत नाही.कधी कधी प्रयत्नांनाही वाट पहावी लागते.पन्नास वेळा प्रयत्न करून एक्कावनवेळा काढलेलं चित्र खरच खूप सुंदर असतं.एकदा ट्राय करून नक्की पहा.मग कळेल,आयुष्य असं अर्धवट सोडून कुठे पळायचं नसतं.नाहीतर सुखाचे इंद्रधनू कधी दिसणार नाहीत.

इंद्रधनू पहायचं आहे नं मग लागा तयारीला…आत्ता या क्षणापासून.मनाशी निर्धार करा.

“माझ्या आयुष्याचा कागद कितीही कोरा असूदे,कितीहीवेळा तो कोरा होऊदे,ती रंगवायची जबाबदारी माझी.आयुष्यात कितीही काहीही झालं तरी माझ्या आयुष्यात मी रंग भरणारच.दुःखाला दोन हात करून माझ्या आयुष्यात सुखाचा इंद्रधनू मी उमटवणारच.”
असं स्वतःला ठणकावून सांगा.

मित्रांनो,एकदा उरलेला कोरा कागद रंगवून बघा….एखादं सुंदर चित्र नक्कीच तयार होईल.

कधी छोट्या छोट्या आनंदाच्या,समाधानाच्या तर कधी हास्याच्या,प्रयत्नांच्या तर कधी यशाच्या रंगाने आयुष्याचा कोरा कागद रंगवून तर पहा,आयुष्यात कसे रोज सुखाचे इंद्रधनू उमटतील…..!


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!