Skip to content

इतरांसाठी चांगलं करा, नक्कीच अनपेक्षित वाटेने ते तुम्हाला रिटर्न मिळेल.

इतरांसाठी चांगलं करा, नक्कीच अनपेक्षित वाटेने ते तुम्हाला रिटर्न मिळेल.


अपर्णा कुलकर्णी


आज एक गोष्ट सांगावीशी वाटते. गोष्ट तशी खूप वर्षांपूर्वीची आहे. अगदी श्री कृष्ण आणि अर्जुन यांच्या काळातील. एकदा अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघेही बाहेर फिरायला गेले होते. तिथून जाताना त्यांना एक गृहस्थ भीक मागत असताना दृष्टीस पडला. त्याच्या अंगावर कळकट मळकट फटाके कपडे, ते ही जागो जागी फाटलेले, पोट पाठीला टेकलेले जणू बऱ्याच दिवसांचा उपाशी असावा. अशी त्याची अवस्था पाहून अर्जुनाला त्याची दया आली.

अर्जुन त्या भिकऱ्याकडे गेला आणि त्याने त्याचे नाव विचारले, त्याने सांगितले माझे नाव सोपान. अर्जुन म्हणाला तू काही काम का करत नाही, अशी भीक मागण्यापेक्षा काम केलेस तर लोकांकडे हात पसरत राहण्याची गरज पडणार नाही ना ?? सोपान म्हणाला, खूप ठिकाणी काम शोधले एक दोन ठिकाणी कामावर ठेवले पण मला दम्याचा त्रास असल्यामुळे फारसे काम होत नाही म्हणून मग अशी भीक मागत असतो.

त्यावर अर्जुनाला खूपच कसेतरी झाले आणि तो म्हणाला, मी तुला एक हिरा देतो. तो तू विक आणि त्यावर चरितार्थ भागव. म्हणजे तुला काम करण्याची गरज पडणार नाही आणि पोटही भरेल. हा घे हीरा. तो हिरा सोपनाने घेतला आणि तो खूप खुश झाला. त्याच दिवशी त्याला तो हिरा विकायचा होता पण रात्र झाली असल्याने ते शक्य नव्हते. तो घरी आला, तो हिरा सुरक्षित जागी ठेवता येईल अशीही जागा त्याच्या घरात नव्हती. त्यामुळे त्याने एका रिकाम्या मातीच्या मडक्यात म्हणजे माठात तो हिरा ठेवला आणि झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी उठून त्याने आधी तो माठ पहिला तर माठ तिथे नव्हताच. त्याने त्याच्या बायकोला माठ कुठे आहे ते विचारले, त्यावर ती म्हणाली, आपला पहिला माठ वापरून वापरून जुना झाला होता आज त्याला धुण्यासाठी घेतले तर तो फुटला. मग हाच माठ शिल्लक होता म्हणून आज मी त्यात पाणी भरले आहे. ते ऐकून सोपान खूप निराश झाला, अग तुला यात काही वस्तू दिसली नाही का नदीवर पाणी भरायला गेली तेंव्हा ?? त्याने जरा चिडून विचारले. त्यावर बायको म्हणाली, हो मी माठ उलटा केला तेंव्हा काहीतरी पडल्याचा आवाज आला, पण मी बघेपर्यंत ते नदीत पडले होते.

अर्जुन आणि कृष्ण दुसऱ्या दिवशी पुन्हा फिरत असताना सोपान पुन्हा भीक मागत असलेला त्यांनी पाहिले आणि अर्जुना ने कारण विचारले तेंव्हा सोपानने घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यावर अर्जुनाने शंभर सोन्याच्या मुद्रा त्याला दिल्या. या मुद्रा देताना नेमके एका चोराने पाहिले होते. सोपान ज्या रस्त्यावरून जात होता तो जंगलातून, जात होता, शिवाय सूनासान होता. याच संधीचा चोराने फायदा घेऊन सोपान समोर चाकू धरून सोन्याच्या मुद्रा देण्यास भाग पाडले. जीवापेक्षा काहीच मोठे नसल्याने सोपानने मुद्रा देऊन टाकल्या. दोन वेळा दिवस बदलण्याची संधी देवाने दिली पण दोन्ही वेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने लक्ष्मी प्राप्त होता होता राहिली. याचे सोपानला खूपच दुःख झाले.

तिसऱ्या दिवशी पुन्हा अर्जुन आणि कृष्णाने त्याला भीक मागताना पाहिले. अर्जुन म्हणाला, आता काय झाले आता का भीक मागत आहेस ?? पुन्हा सोपानने घडलेला प्रसंग सांगितला. अर्जुन कृष्णाला म्हणाला, मी याचे दिवस बदलण्याचा प्रयत्न करत असूनही याचे दिवस का बदलत नाही ?? त्यावर कृष्ण म्हणाला, आता तू काहीच करू नकोस. मी प्रयत्न करून बघतो. मग श्रीकृष्णाने सोपानला फक्त दोन पैसे दिले आणि म्हणाला, यात जे काही येईल ते घेऊन तुझे पोट भर. ते पाहून अर्जुनाने प्रश्नार्थक नजरेने कृष्णाकडे पहिले पण श्री कृष्णाने, त्यावर फक्त स्मित केले.

रस्त्याने जाताना सोपान विचार करू लागला, कुठे शंभर सोन्याच्या मुद्रा, कुठे हिरा आणि कुठे हे दोन पैसे. आता या दोन पैशांनी काय घेऊ ?? चोर सोपान काय करतो याकडे लक्ष ठेवून होता. सोपानला रस्त्याने जाता जाता एक मासळीवाला मासे नदीतून काढताना दिसला. त्यातील बाकी सगळे मासे मेले होते पण एक मासा खूप तरफडत होता. सोपानला त्याची अवस्था बघवली नाही आणि त्याने मासेवाल्याकडून तो मासा दोन पैशात विकत घेतला आणि पुन्हा पाण्यात सोडण्यासाठी नदीकडे जात असताना त्याला जाणवले माशाच्या तोंडात काहीतरी अडकले आहे आणि त्याचाही त्रास त्याला होत आहे.

म्हणून त्याने माशाच्या तोंडातून काय अडकले आहे ते काढण्याचा प्रयत्न केला तर अर्जुनाने दिलेला हिरा त्याच्या तोंडात होता. हिरा पाहून सोपानला खूप आनंद झाला आणि त्या आनंदात तो जोरात ओरडला अरे सापडला, अरे सापडला. चोराला वाटले सोपानने आपल्याकडे पाहिले आणि आता हा ओरडला तर आपण पकडले जाणार त्यामुळे त्याने पळत जाण्याच्या नादात सोन्यांच्या मुद्रांची पिशवी तिथेच फेकली आणि तो पळत निघून जाताना सोपानने ती पिशवी पहिली आणि त्या मुद्रा मिळाल्याचा त्याला खूपच जास्त आनंद झाला.

दुसऱ्या दिवशी हे सांगण्यासाठी सोपान अर्जुन आणि कृष्णाला भेटायला गेला आणि त्याने सगळे काही सांगितले. त्याची कथा ऐकून अर्जुन म्हणाला, मी सोपानला हिरा, सुवर्ण मुद्रा देऊनही त्याचे दिवस बदलले नाहीत. पण तुमच्या दोन पैसे देण्याने गेलेले सगळे वैभव परत कसे मिळाले ?? त्यावर कृष्ण हसून म्हणाला, तू त्याला हिरा, सोन्याचे नाणे दिले तेंव्हा त्याने त्या गोष्टींचा उपयोग स्वतःच्या सुखासाठी कसा करता येईल याचाच विचार केला.

नेपण जेंव्हा त्याला दोन पैसे दिले आणि त्याने माशाला तरफडताना पाहिले तेंव्हा त्या दोन पैशात बाकी काही विकत घेता येण्याजोगे नसल्याने त्याने माशाचा जीव वाचवण्याचा विचार केला आणि त्याच वेळी अनपेक्षितपणे त्याच्या हातातून निसटून गेलेल्या गोष्टी त्याला परत मिळाल्या.

याचाच अर्थ आपण नेहमी स्वतःपुरता आणि स्वतःच्या सुखाचा विचार करतो ते चुकीचे नसतेच तो करावाच पण तो केवळ आत्मकेंद्री नसावा. स्वतः सोबत दुसऱ्याचा विचार करायला लागतो तेंव्हाच आपल्याला सगळी सुखं अनपेक्षित मिळायला लागतात. थोडक्यात काय तर, इतरांसाठी चांगलं करा, नक्कीच अनपेक्षित ते तुम्हाला परत मिळेल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “इतरांसाठी चांगलं करा, नक्कीच अनपेक्षित वाटेने ते तुम्हाला रिटर्न मिळेल.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!