रोज चांगला दिवस नसतो, पण आपण नेहमी एखादा वाईट दिवस चांगल्या एटीट्यूडने जगू शकतो.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
संजू आज जरासा उदास होऊनच घरी आला. रोज येताना घर दुमदुमून निघे. कारण आल्यावर आधी ती आई आई अशी आरोळी ठोकणार, त्यानंतर घर भर नाचत शाळेत काय काय घडल, काय काय गमती जमती केल्या ते सांगणार त्यानंतर हात पाय धुवून भूक लागली म्हणून परत ओरडायला सुरुवात. खाताना पण त्याची बडबड सुरूच असायची. दिवसभर शांत असलेलं घर त्याच्या येण्याने जिवंत होऊन जाई.
खूप बडबड्या आणि उत्साही स्वभावाचा असा तो मुलगा होता आणि आई त्याची सर्वात जवळची व्यक्ती आणि मैत्रीण. अस कधी झालं नाही की तो शाळेतून आला किंवा बाहेरून कुठूनही आला आणि त्याने आईला काही सांगितल नाही. त्याच्या या स्वभावाची वर्षाला पण आता सवय झाली होती. त्यामुळे ती पण उत्सुक असायची की आज हा काय सांगतोय. कारण तो सांगायचाच तस हातवारे आणि हावभाव करून.
पण आज मात्र सूर्य पश्चिमेला उगवल्यासारख झालं होत. कारण हा पठ्या आज काहीही न बोलता सरळ घराच्या मागच्या बाजूला जी बाग होती तिथे जाऊन बसला. आईने त्याला येताना पाहिलं होत. म्हणून ती लगबगीने हॉल मध्ये आली होती. पण तो कुठे दिसला नाही म्हणून हाक मारत बाहेर आली. तो कुठेच दिसेना म्हणून ती मागे आली तर हा तिथेच एका बाजूला बसून होता.
वर्षा त्याच्या बाजूला जाऊन बसली तरी त्याला समजलं नाही. तेव्हा तिनेच बोलायला सुरुवात केली. “अरे वा, आज आमच्या बाळ राजेंना झाडांवर प्रेम आलं वाटत. आईशी न बोलता तडक बागेत येऊन बसले आहेत.” त्यावर संजूंने तोंड वाकड करत तिच्याकडे पाहिलं. ते पाहिल्यावर वर्षाला समजल की आज काही त्याचा दिवस फार चांगला गेलेला नाही. “कोणाचा तरी मुड चांगला नाही वाटत आज?” अस म्हणत तिने त्याच्या खांद्यावर हात टाकला. त्यावर परत एकदा संजूने आधीसारखा चेहरा करत तिच्याकडे पाहिलं. यावेळी तो जरासा वैतागलेला होता.
“काय झालं? आईला नाही सांगणार?” वर्षाने अस म्हणताच संजूने बोलायला सुरुवात केली. कारण तो तिच्याशी न बोलता राहणं शक्यच नव्हत. “आई आज माझा दिवस अजिबात चांगला गेला नाही. तुला माहित आहे, आज ना आम्हाला पी.ई. चे दोन तास मिळाले होते. मी आणि माझ्या मित्रांनी काल ठरवलं पण होत की आज काय काय खेळायच.” “अरे वा! मस्त, म्हणजे आज एका मुलाची मजा होती. काय काय खेळलात तुम्ही? नक्की बास्केट बॉल वगैरे असणार ना! आणि तू त्यात जिंकला पण असशील.” वर्षा म्हणाली.
त्यावर संजू म्हणाला, “नाही ग आई, अस काही झालं नाही.” अस म्हणत त्याने परत तोंड पाडलं. “हे बघ बाळा, खेळ म्हटल्यावर हार जीत होत असते. आज खेळामध्ये जर तू हरला असशील तर ती काही इतकी मनाला लावून घेण्यासारखी गोष्ट नाही. अस होतच राहत.” वर्षा फक्त अंदाज बांधत होती. कारण तिला अस वाटत होत जर हा खेळाच सांगतोय याचा अर्थ अस काहीतरी झालेले असू शकत. एरवी तो खेळात आपण कसे जिंकलो, चांगला खेळ खेळला हेच सांगत असे. आता जर तो तोंड पाडून बसला असेल तर हे एक कारण असू शकत होत.
पण वर्षाच्या या बोलण्यावर त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही तेव्हा तिच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळच झाल आहे. आता मात्र तिला अंदाज लागत नव्हता की नेमक काय झालं असावं. म्हणून तिने त्यालाच विचारलं “संजू तू म्हणतो आहेस की खेळाचे तास होते, ते पण दोन. तु खेळात हरलास पण नाही. मग कश्याला उदास आहेस?” संजू तिच्याकडे तोंड करून बसत म्हणाला, “अग आई, खेळात हरायला खेळ खेळायला मिळाला तर पाहिजे.” आता त्याने सर्व पहिल्यापासून सांगायला सुरुवात केली.
आज खरच त्यांचे खेळाचे दोन तास होते. पण काही दिवसांनी त्यांच्या परीक्षा पण आल्या होत्या. म्हणूनच आज सर्व शिक्षकांनी मिळून अस ठरवलं की मुलांची सराव परीक्षा घ्यायची आणि एखाद्या विषयाचा ज्यादा तास घ्यायचा. थोडक्यात त्यांना आज खेळायला काही मिळालं नव्हत. जे संजुला खूप जास्त प्रिय होत. एरवी कम्पल्सरी एकतरी खेळाचा तास असायचा आणि त्यामुळेच तो खुश असायचा. आज तोही झाला नाही. दिवसभर वर्गात बसून, त्यात माहीत नसताना परीक्षा घेतली. सकाळी जे काही ठरवून गेला होता त्यातलच काहीच न झाल्याने तो उदास झाला होता.
आता कुठे वर्षाला समजलं की हा असा का बसला होता. पण त्याला समजवायला पण हवं होत. कितीवेळ तो असा उदास बसून राहणार होता. ती बोलू लागली, “संजू मला सांग, आपल्या बागेत इतकी फुलांची झाड आहेत. त्याला फुल पण येतात. आपण नाही का सकाळी लवकर उठून इथे फेऱ्या मारतो.
पण एखाद्या दिवशी समजा फुल नाही आलं म्हणून ते झाड कधी मलूल पडलेल पाहिलं का तू? किंवा रुसलेल पाहिलं का? ते गुलाब बघ, त्याला दोन आठवडे झालं फुल येऊन पण अजून त्याला कळ्या आल्या नाहीत. पण ते झाड बघ! किती टवटवीत आहे.” संजुच्या डोळ्यात आता आश्चर्य आणि उत्सुकता दोन्ही होत. तो वर्षाला म्हणाला, “खरच ना आई, झाड कशी काय उदास होत नाहीत. त्यांना तर रोज फुल येतात ना!
मग तरीदेखील मध्ये फुल यायची बंद झाली तरी झाड कस टवटवीत राहत?” यावर वर्षा हसुन म्हणाली, “संजू हीच तर गम्मत आहे राजा. ही झाडं, हा निसर्ग आपल्याला हेच शिकवतो की रोजचा दिवस सारखा नसतो. आज काही चांगल घडल म्हणून उद्या पण घडेल अस नाही. बदल हा होतच राहणार. पण म्हणून आपण या गोष्टींनी उदास व्हायचं का? तर नाही. कदाचित या वाईट दिवसात पण काहीतरी चांगल दडलेले असू शकत. हे सर्व आपल्या मानण्यावर आहे.
आता ते गुलाब त्याला जरी इतके दिवस कळ्या आल्या नाहीत कारण त्याला आता नवनवीन फांद्या येणार आहेत आणि त्यातून पूर्वीपेक्षा जास्त कळ्या उगवतील आणि उमलतील. या सगळ्याला वेळ लागतो. मधल्या काळात त्याला कळ्या नसणारच आहेत. पण त्यातून पुढे चांगलच घडणार की नाही! अस समज आजचा तुमचा खेळाचा तास बुडला. पण त्यातून काहीतरी चांगल घडू शकलेल असू शकत.” संजुने अबोधपणे विचारल, “चांगल ते काय?” वर्षा म्हणाली, “अरे तुमची उजळणी नाही का झाली? परीक्षेला तुला त्याचा उपयोग नाही का होणार?”
संजुचे डोळे चमकले व तो हसुन म्हणाला, “अरे हा असा विचार मी केलाच नाही! आई तू बेस्ट आहेस?” अस म्हणत त्याने तिला मिठी मारली. आज त्याला नवीन काहीतरी शिकायला मिळाले होते. एक नवीन दृष्टिकोन त्याला मिळाला होता जो कदाचित कोणत पुस्तक देऊ शकला नसता.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Farach chan.