Skip to content

प्रेम म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री नव्हे, तर दोन प्रेमळ आंतरिक आत्मे!

प्रेम म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री नव्हे, तर दोन प्रेमळ आंतरिक आत्मे!


मेराज बागवान


‘प्रेम’ जगातील सर्वात सुंदर आणि सकारात्मक गोष्ट.पण तरी देखील अनेकदा नकारात्मक रित्या घेतली जाणारी गोष्ट.अगदी दोन स्त्री-पुरुष एकत्र दिसले की ‘अफेअर’,’भानगड’ असे काही शब्द वापरणारा काही भाग समाजात आजही अस्तित्वात आहे.पण प्रेम ह्याहून देखील खूप वेगळे आणि पुढचे आहे.प्रेम म्हणजे,फक्त एक पुरुष आणि एक स्त्री एकत्र येणे नव्हे.तर प्रेम म्हणजे, असे दोन आत्मे जे आंतर्मनाने एकत्र आलेले असतात आणि दोन व्यक्तींचे दोन प्रेमळ आत्मे फुलत असतात,बहरत असतात.

प्रेम ही खूप दूरवरची बाब आहे. आपण प्रेमाच्या अनेक गोष्टी ऐकतो, वाचतो,कधी स्वतः अनुभवतो.ह्या प्रेमातून जो तो आपला आपला अर्थ,निष्कर्ष काढत असतो.जेव्हा एक स्त्री आणि एक पुरुष प्रेमात असतात, तेव्हा अनेकदा काही कलह होत असतात.कलह म्हणजे,काही प्रमाणात भावनिक गुंतागुंत होत असते.कधी एकाला वाटत असते, “तिचे माझ्यावर प्रेम नाही.कधी दुसऱ्याला वाटत असते, तो माझ्याकडे लक्षच देत नाही.माझ्याशी नीट बोलत नाही,उघडपणे व्यक्त होत नाही.ती मला समजून घेत नाही.इतके करून देखील मी कुठे तरी कमीच पडतो. त्याला माझी काही किंमतच नाही.” असे अनेक प्रसंग घडतात, आणि अशी काही मानसिकता कमी-अधिक प्रमाणात प्रेमात स्त्री-पुरुषाची होत असते.हे तसे नैसर्गिक आहे आणि त्यात वेगळे असे काही नाही.नाती जिथे येतात, तिथे भावना येतात,आणि जिथे भावना असतात तिथे एकमेकांचा विचार असतो आणि हेच प्रेम असते.पण इथपर्यंतच ह्या प्रेमाची व्याप्ती नाही.ह्यापालिकडे देखील काही गोष्टी असतात ज्या प्रेमाचा आयुष्यातील खरा अर्थ सांगून जातात.

प्रेम ही भावनाच ‘निरपेक्ष’ असते. जिथे प्रेम असते तिथे काळजी असते. मग ही काळजी प्रत्यक्ष बोलण्यातून दिसत नसेल तरी काही हरकत नाही.पण माणसाच्या वागण्यातून ही काळजी आणि त्या कळजीमगील प्रेम दिसत असते. आणि हे समजून घेता येणे म्हणजे ‘प्रेम’.आणि हे समजून केव्हा घेता येईल,जेव्हा फक्त वरवरचा विचार न करता, आंतरमनाचा विचार केला जाईल.म्हणजेच जेव्हा एक स्त्री किंवा एक पुरुष समोरच्या व्यक्तीला आतून समजून घेऊ शकेल, तिला वाचू शकेल , तिचे मन समजू शकेल आणि त्या व्यक्तीच्या अंतर्मनाला ,आत्म्याला स्पर्श करू शकेल.

प्रेम दाखवायची गोष्ट नाही.किंवा एक पुरुष आणि एक स्त्री आली म्हणजे प्रेम असे मुळीच नाही.हे खरे आहे,जेव्हा भिन्न लिंगी व्यक्ती जवळ येतात तेव्हा त्यांच्यात एक भावनिक नाते तयार होण्याच्या संधी जास्त असतात.मग हे नाते मैत्रीचे असू शकते, लग्नाचे असू शकते किंवा फक्त लैंगिक देखील असू शकते.नाते कोणतेही असो,ते प्रेमाशिवाय पुढे जाऊच शकत नाही.प्रेम जेव्हा दोन व्यक्तींमध्ये निर्माण होते तेव्हा एक प्रकारची गरज त्यात उत्पन्न व्हायला लागते.ती गरज असते ,आंतरिक आत्म्याशी भेट घडवून आणणे.

जेव्हा स्वत्व विसरले जाते, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या मनाला भिडता येते.जेव्हा माणूस स्वतःला काही काळ विसरतो,तेव्हा ज्याच्यावर प्रेम आहे त्याला, त्याच्या मनाला,त्याच्या इच्छेला स्वतःपेक्षा जास्त महत्व देतो.आणि हेच प्रेम असते.हाच तो प्रेमळ आत्मा असतो.आपुलकी जिथे निर्माण होते,एकमेकांच्या अस्तित्वाची जिथे जाणीव होते ते आत्मे प्रेमळ असतात.जिथे फक्त ‘मी’ नसतो, तर ‘आपण’ असतो,ते खरे प्रेमाचे नाते असते. अशी अनेक प्रेमाची अंगे आहेत.

जिथे कोणतीच अपेक्षा नसते,फक्त आणि फक्त एकमेकांची मने,विचार जपणे असते ,आदर असतो ते प्रेमळ आंतरिक आत्मे असतात. फक्त पुरुष-स्त्री ह्या लिंगापर्यतचा हा विषय नसतो.तर दोन मने, आत्मे,दोन हृदय ह्याचा हा संगम असतो. स्त्री-पुरुष म्हटले की शारीरिक संबंध आले.शारीरिक संबंध ही देखील एक भावना आहे,प्रेमाचा तो एक भाग आहे.पण इथपर्यंतच ते मुळीच मर्यादित नाही.प्रेम म्हणजे शारीरिक संबंध अशी व्याख्या करणारे महाभाग अनेक आहेत.पण जिथे शरीर संमेलनाबरोबर ,मनाचे ,अंतर्मनाचे,आत्म्याचे मिलन होते ते चिरकाल टिकणारे प्रेम असते.

आणि ह्या आंतरिक प्रेमाचीजाणीव होण्यासाठी गरज असते ती एकमेकांना सर्वांगाने समजून घेण्याची, ना की काही न जाणता तर्क-वितर्क लावण्याची.गरज असते,भावना समजून घेऊन त्या व्यक्त करण्याची.गरज असते एकमेकांचा प्रत्येक गोष्टीत आदर करण्याची.गरज असते ती विना-अपेक्षा ठेवता एकमेकांसाठी जगण्याची. कुठलाही देखावा न करता एकमेकांच्या सुखासाठी धडपडण्याची.प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीत एकमेकांना समजून घेऊन साथ आणि पाठिंबा देण्याची.

प्रेम हे निरागस असते. प्रेम शांतताप्रिय असते.प्रेमात नसतो एकमेकांविषयी अहंकार, नसते ईर्षा,नसतो स्वार्थ, आणि ना एकमेकांना कमी लेखणे. प्रेमात असतात ,फक्त आणि फक्त दोन प्रेमळ आत्मे ,जे जगत असतात फक्त आणि फक्त एकमेकांसाठी..प्रत्यक्षपणे आणि अनेकदा अप्रत्यक्षपणे……


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “प्रेम म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री नव्हे, तर दोन प्रेमळ आंतरिक आत्मे!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!