जिज्ञासाजिज्ञासा अशी वाढवा की तुम्ही जे भोगलंय, तेथे दुसरं कोणी असतं तर जीवन संपवलं असतं.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“कमाल वाटते मला या बाईची, खरच दुसर कोण हिच्या जागी असत तर कधीचं हार मानली असती. इतक्या बिकट परिस्थितीत अनेकांनी आपला जीव गमवलेला मी पाहिला आहे. पण सावी मात्र मुळातच धीट बाई. म्हणूनच तर तग धरून राहिली इतकी वर्ष.” निर्मला बोलत होती. “हो ना, खूप खंबीर मनाची बाई आहे ती, एकटीने मुलांना वाढवणं, त्यांना चांगले संस्कार देणं ही साधी गोष्ट नाही. ते सुद्धा त्यांच्यासोबत कायम स्वरुपी राहता येत नसताना. वाईट परिस्थितीत पण कस भक्कम राहायचं, आनंदी राहायचं हे तिने मुलांना शिकवलं आणि त्यांनी देखील आईच्या कष्टाचं चीज केल. पाहिलास ना सुभाषने तिच्या नावाचं हॉटेल सुरू केलं आहे. चांगल नाव झालय त्याच आता. छोटा मुलगा बँकेत नोकरीला लागला आहे. काहीही म्हण स्त्री असावी तर अशी! दुसऱ्यांना हेवा वाटावा असे तिचे गुण आहेत.”
सावी, म्हणजे सावित्री हीच लग्न खूप कमी वयात झालं. त्यावेळी लवकर लग्न कारण तरी काय? तर हिच्या मागे तीन बहिणी होत्या त्यांच पण लग्न लवकर होईल. शेवटी मुलगी ही परक्याच धन हीच समजूत. सावित्रीला शिकायची खूप आवड. हट्टाने ती शाळेत शिकत होती पण नंतर लगेच तिचं लग्न लावण्यात आलं. तरी त्यात तिच्या दोन इयत्ता शिकून झाल्या होत्या. लिहायला, वाचायला येत होत. लग्नाला तिची संमती कोणी विचारली नाही आणि तिच्या मनात नसल तरी विरोध करायचं तिचं वय नव्हत. लग्न झाल्यावर नवीन घरात आली तशी तिथे ती हळू हळू रमली. वय लहान असल तरी समजूतदार असल्याने नवीन गोष्टी पण लगेच तिला समजत. करता येत.
लग्नानंतर काही वर्षातच सुभाष आणि गिरीश झाले. तिच्या जगण्याला एक नवीन उत्साह आला. दिवसभर घरातली कामे, तसच मुलांमध्ये तिचा वेळ जायचा. ती परत तिच्या लहानपणामध्ये गेली. सावी आणि तिचा नवरा यांच्यामध्ये तस वयाच अंतर खूप होत. लग्न होऊन जेव्हा ती आली तेव्हा सुरुवातीचे खूप दिवस लहान असल्याप्रमाणे वागे, अजूनही तिचा अवखळपणा, अल्लडपणा गेला नव्हता. तिचं हे वागणं सासू सासऱ्याना, घरातील इतर माणसांना रुचत नसे आणि समजून घेण्याची त्यांची वृत्ती देखील नव्हती. पण तरीही तो तिला समजून घेई. त्यामुळे इतर कोणाला काही बोलता येत नसे.
त्याचा तिला खूप आधार वाटे. अगदी आपल्या जवळच्या मित्राशी बोलावं तस ती त्याच्याशी बोलत नसे. खूप छान नात होत त्यांच. तिच्या हाताला खूप छान चव होती. त्यामुळे तो नेहमी म्हणायचा, “सावी शहरात खूप मोठ मोठ्या खानावळी, हॉटेल असतात. कितीतरी लोक तिथे जेवायला जातात. अगदी लांब लांबची लोक पण येतात. आपण तुझ्या नावाने पण तिथे हॉटेल काढू. बघ कस चालेल!” त्यावर ती हसून म्हणायची. “हॉटेल आणि माझ्या नावाचं. ते पण शहरात. जे मी कधी बघतील पण नाही. हे घरचं माझी खानावळ आहे. इथल्या सर्व लोकांना आणि तुम्हाला मी केलेलं जेवण आवडत इतकचं पुरेस आहे मला.” त्या दोघांच्या अश्या खूप साऱ्या आठवणी होत्या, स्वप्न होती. आणि महत्वाचं म्हणजे दोघांचही आयुष्यावर खूप प्रेम होत. दोन मुल देखील होती त्यामुळे जगण्याला एक अर्थ पण होता.
पण नवरा असा जेव्हा एकाएकी निघून गेला तेव्हा सावित्री कोसळली. जो माणूस लग्न झाल्यापासून सावलीसारखा तिच्या मागे आधार म्हणून होता तो जेव्हा गेला तेव्हा ती एकटी पडली. हा धक्का सहन न होण्यासारखा होता. त्यांनी त्यांच्या संसारासाठी, मुलांसाठी खूप काही ठरवलं होत, स्वप्न पाहिली होती ती एका क्षणात नाहीशी झाली. खूप दिवस सावित्री या धक्क्यात होती. हे दुःख कमी होतच की घरातले नवऱ्याचा जाण्याचा दोष पण तिलाच देऊ लागले. ज्याला काही अर्थ नव्हता. पण अजूनही समाजात काहीही झालं तरी आधी बाईला दोषी ठरवलं जातं. तेच तिच्या बाबतीत झालं. आधी मुलगा होता त्यामुळे कोणाला काही बोलता येत नसे. पण आता छोट्या छोट्या गोष्टींवरून काहीतरी बडबडणे, भांडणे, मुलांना उगाच रागावणे अस होऊ लागलं. सावित्री स्वतःच्या बाबतीत होणाऱ्या सर्व गोष्टी सहन करत होती. पण मुलांना त्रास झालेला तिला सहन होत नसे. नवरा गेल्यानंतर तेच तिच्या जगण्याचं कारण होते.
खूप दिवस वाट पाहून तिने मनाशी काही ठरवल. मुलांचे हाल तिला नको होते आणि अश्या वातावरणात तिला त्यांना वाढवायचं देखील नव्हत. म्हणून तिने मुलांना घेऊन शहरात यायचं ठरवलं. तिथे जाऊन काय काम करायचं हे देखील तिला माहीत होत. घरातली लोक कधीच तिच्याशी मनाने जोडली गेली नव्हती त्यामुळे तिने निर्णय सांगितला तेव्हा त्यांना त्याच काही वाटलं देखील नाही. तिच्या बाबतीत काळजी तर नाहीच उलट “आमचा विचार नाही, स्वतःच आयुष्य जगायचं आहे” अस काहीबाही त्यांनी तिला ऐकवलं.
पण तिने या सगळ्याचा विचार केला नाही. ती आपल्या निर्णयावर ठाम होती. हाताशी साठवलेले थोडेसे पैसे, स्त्रीधन म्हणून असलेले काही दागिने घेऊन ती बाहेर पडली. वय कमी, मुल पण लहान; पण ती डगमगली नाही. शहरात आल्याबरोबर तिने एक छोटीशी खोली भाड्याने घेतली व तिघ तिथे राहू लागली. इथे येऊन कोणत काम करायचं हे तिला माहीत होत त्याप्रमाणे तिने एका खानावळीत काम करायला सुरुवात केली. तिथे ती जेवण बनवायला जाऊ लागली. मुलांना शाळेत घातलं. इतकं सर्व करताना तिला वाईट अनुभव आले नसतील का? आले.
पण तिला माहित होत की आपल्याला का जगायचं होत. तिला तिच्या आयुष्याचा अर्थ मिळाला होता. तोच तिला जगायला प्रेरणा देत होता. जेवण बनवायला जायची तेव्हा नवऱ्याशी केलेलं बोलण तिला नेहमी आठवायचे. मुलांशी बोलताना ती म्हणायची देखील, “तुमचे बाबा फार गमतीशीर बोलायचे. मला म्हणायचे, आपण शहरात तुझ्या नावाचं हॉटेल काढू.” अस म्हणताना तिच्या डोळ्यात पाणी यायचं. तेव्हा सुभाष उठून तिच्या जवळ यायचा आणि तिचे डोळे पुसत म्हणायचा, “आई बाबा खरच बोलत होते.
आणि ते नसले म्हणून काय झालं? आम्ही आहोत ना! मी एक दिवस काढेन तुझ्या नावाने मोठ हॉटेल.” इतक्या लहान मुलाच्या तोंडून असे धीराचे शब्द ऐकून सावित्रीला भरून यायचं आणि ती देवाचे आभार मानायची की, तिला त्याने गोजिरवाणी मुल दिली. त्यांच्याकडे पाहून तिने आपले कष्ट चालू ठेवले. मुलांना चांगल शिकवलं, मोठ केलं. आता सुभाषने तिच्या नावाने हॉटेल काढल होत.
त्यांचं स्वतःच घर होत. दोघही मुल कामाला लागली होती. सावित्री आता कुठे चांगले दिवस पाहत होती. पण या मागे तिचे इतक्या वर्षांचे कष्ट देखील होते, तिने खूप काही पाहिलं होत भोगलं होत. फक्त त्याचा कांगावा न करता त्याला तरुन ती पुढे आली होती आणि मुख्य म्हणजे तिचं तिच्या जगण्यावर प्रेम होत. त्यामुळेच आता एखाद्याने तिच्या जगण्यातून प्रेरणा घ्यावी अस आयुष्य ती जगत होती.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

खूपचं प्रेरणादायी ! धन्यवाद !!
Khup chan ahe