Skip to content

पुष्कळ वेळेस आपल्याला काही माणसांपासून वेगळं राहण्याची गरज असते, आयुष्यापासून नव्हे.

पुष्कळ वेळेस आपल्याला काही माणसांपासून वेगळं राहण्याची गरज असते, आयुष्यापासून नव्हे.


अपर्णा कुलकर्णी


अर्पिता ग्राजुएट झालेली मुलगी. लग्न झाले आणि लगेच आईपण आल्याने आयुष्य बदलून गेले. तिची मुलगी नीरा आणि ती दोघीच दिवसभर घरात असत. नवरा ऑफिसमध्ये जात असल्याने शिवाय घरात बाकी कोणी नसल्याने मुलीला म्हणजेच निराला सांभाळणे हेच तिचे काम होते. तिच्या खाण्यापिण्याच्या वेळा, आरामाची वेळ, तिच्या रूटीनमध्ये झालेला बदल सगळं काही तिला तोंडपाठ झाले होते. अर्पिता आणि अजयचे अरेंज मॅरेज पण नीरा झाली तसे त्याच्या वागण्यात सूक्ष्म पण विचित्र बदल जाणवू लागले अर्पिताला. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले पण नंतर मात्र त्याच्या वागण्याचा त्रास व्हायला लागला अर्पितला.

नीरा रडली तर तो अर्पिताला वाट्टेल ते बोलायचा, कधी ती आजारी असल्यामुळे किंवा तिला खाऊ घालताना डबा करणे जमले नाही तर भांडायचा, कधीच अर्पिताला नीट बोलत नव्हता, नीराच्या अंगावर ओरडून जात होता. नीरा अशाने घाबरत होती शिवाय आजारी पडत होती. पण तिला दवाखान्यात घेऊन जाण्याचे कष्टही अजय करत नव्हता. अशाने नेहमीच अर्पिता आणि अजयमधे वाद होत होते. एकदा तर अर्पिता उगाच वाद घालते म्हणून अजयने तिच्या अंगावर रिमोट फेकून मारला शिवाय मारायला लागला. त्यामुळे मात्र अर्पिताने निराला घेऊन घर सोडले.

माहेरी आल्यावर अर्पिताने सगळा प्रकार घरच्यांना सांगितला आणि घरच्यांनी काही दिवस वाट पाहून अजयला बोलावून घेण्यासाठी फोन केले. पण अजय फोन घ्यायलाच तयार नव्हता. तरीही घरच्यांनी अर्पिताला समजावून सांगून, नीराला आई आणि बाबा दोघांचीही गरज आहे म्हणून अजयकडे सोडले. दोघांच्यात काही छोट्या कुरबुरी झाल्या असतील हळू हळू विसरतील दोघेही आणि लागेल संसार रांकेला असेच सगळ्यांना वाटत होते. पण अजयच्या मनात भलतेच काहीतरी सुरू होते.

काही दिवसानंतर अर्पिताच्या त्याच्या वागण्यामागचे मुळ कारण समजले ते असे होते की, अजयला मुलगा हवा होता. त्यात पहिल्याच वेळी अर्पिताची परिस्थिती नाजूक असल्यामुळे दुसऱ्यांदा आई होण्याची संधी घेता येणार नव्हती आणि अर्पिता वंशाला दिवा देऊ शकणार नसल्यामुळे अजयचे बाहेर लफडे सुरू होते.

म्हणूनच नीरा आणि अर्पिताचा तो इतका द्वेष करत होता. अर्पिता हे समजल्यावर शॉक झाली होती. आजकाल अजय कोणत्याही कारणावरून तिला मारहाण तर करतच होता पण एके दिवशी त्याची हिंसक वृत्ती इतकी बळावली की अर्पिताला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न त्याने केला. त्याच वेळी कसाबसा स्वतःचा आणि नीराचा जीव वाचवून अर्पिता पुन्हा माहेरी आली.

आता अर्पिताला कायमस्वरुपी घरात सांभाळावे लागणार याच भीतीने आईने धुसफुस करायला सुरुवात केली. स्वतःच्याच घरात परक्या सारखी वागणूक मिळायला लागली. त्यात तिचा भाऊ अविवाहित होता त्याच्या लग्नात अडथळे येतील म्हणून सगळेच कुजबुजत होते. एकंदरीतच माहेरचे लोक, शेजारी पाजारी, समाज, नातेवाईक अनेक प्रश्न करू लागले. इकडे माहेरी लोक जगू देत नव्हते आणि नवरा कधीच तिला सोडून रिकामा झाला होता.

शेवटी तिच्या अनुभवातून शहाणी होऊन तिला इतके मात्र समजले की, जगात कोणीही कोणाचे नाही. सल्ला द्यायला शंभर लोक असतात पण संघर्ष आपला आपणच करावा लागतो. त्यामुळे कोणावरही अवलंबून न राहता, सगळ्यांपासून लांब कुठेतरी जाऊन नोकरी करण्याचा निर्णय तिने घेतला.

कारण मुलीसाठी जगणे भागच होते. तिच्या घरच्यांनी आणि समाजाने दिलेले अनुभव तिला सांगत होते पुष्कळ वेळेस आपल्याला काही माणसांपासून वेगळं राहण्याची गरज असते, आयुष्यापासून नव्हे. त्यामुळे तिने तिला नावं ठेवणाऱ्या समाजाला लांब केले आणि निश्चयाने स्वतःच्या पायावर उभे राहून नीराला मोठे केले.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!