Skip to content

अत्यंत कठीण काळामध्ये सुद्धा एक सोपा मार्ग दडलेला असतो.

अत्यंत कठीण काळामध्ये सुद्धा एक सोपा मार्ग दडलेला असतो.


हर्षदा पिंपळे


आयुष्य सुंदर आहे असं आपण नेहमीच म्हणतो.पण आयुष्याच्या एका टप्प्यावर “सध्या माझा कठीण काळ चालू आहे.” असही आपण सहजतेने म्हणतो.

तर हा कठीण काळ म्हणजे नेमका कोणता काळ ?

आयुष्यात जसे चंदेरी सोनेरी क्षण असतात तसेच काहीसे काळे,डागाळलेले क्षणही असतात. काही क्षण आठवले तरी नकोनकोसं होतं.पहा,आयुष्य कधी कधी खूप चांगलं चाललेलं असतं आणि अचानक आयुष्यात एखाद्या वादळाप्रमाणेच काही गोष्टी अचानक घडतात. एखादं वादळ जसं निसर्गातील सगळ्या गोष्टी उध्वस्त करू पाहतं तशाच काही गोष्टी या आयुष्य उध्वस्त करायलाच आल्या आहेत अशी भावना आपल्या मनात घर करायला लागते.आयुष्यात कोणत्याच समस्या या कमी नाहीत.

सुखासोबत दुःखाचा आधारही या आयुष्याला असतोच.कधी कौटुंबिक कलह, काही आर्थिक वाद,सामाजिक वाद आयुष्यात घडत असतात. कधी कुणाचं आर्थिक चणचणीमुळे सगळं आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर असतं.कुणाचं शिक्षण थांबतं तर कुणाच्या आरोग्याची हेळसांड होते. कर्जबाजारीपणा तर अतिभयंकर असतो.कर्जाने तर आयुष्य पोखरून निघतं.बँकेच्या नोटीसांचा तगादा,सावकाराची भीती,नैराश्य, जबाबदाऱ्यांची ओझी, घरातील प्रॉपर्टीचे वाद वगैरे.आणि नाही म्हंटलं तरी प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील कठीण काळ वेगवेगळा असतो.जसं की—

★विद्यार्थी – एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात असणारा कठीण काळ हा वेगळा असतो.त्याच्या मनात करिअरविषयी गोंधळ असतो.आपल्या करिअरला घरचे सपोर्ट करतील का ? मी हे करू शकेन का ? मी अयशस्वी झालो तर ? मला प्रत्येक वेळी फेल्युअर आलं तर ? या जगाच्या स्पर्धेत माझा टिकाव लागेल का ? असे असंख्य प्रश्न एकाच वेळी विद्यार्थ्याच्या मनात गोंधळ घालत असतात.कधी कधी अपयश आल्यामुळे इतरत्र लक्ष लागत नाही.चुकीच्या निर्णयामुळे स्वतःला दोष देऊन वाईट सवयी जवळच्या वाटतात.प्रेशर ,भविष्याची जबाबदारी वगैरे वगैरे अनेक प्रकारे तो काठिण्यातून जात असतो.

खरं तर एक विद्यार्थी म्हणून त्याच्या मनात काय चालू असेल आणि काय नाही हे वेगळं सांगायची गरज नाही. प्रत्येकाला त्याचा निश्चितच अनुभव असेल

★आई-वडील –

बेसिकली मुलांच्या भविष्याच्या चिंता यांना सतावत असतात. मग ते लग्न असो वा करिअर असो.मग हे सगळं करताना जाणवणारी आर्थिक चणचण, घरातील इतर जबाबदाऱ्या, घरातील इतर कौटुंबिक कलह या सगळ्यामुळे जी काही उलथापालथ होते ती भयंकर असते.

★एखादी हानी – आता ही हानी किंवा लॉस कोणत्याही प्रकारची असू शकते. मानसिक, सामाजिक ,आर्थिक कोणत्याही प्रकारची असू शकते.घरातील कर्ता करविताच जर अकाली मृत्यू पावला तर घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो. डोक्यावर असणारं कर्ज,मुलांच अर्धवट शिक्षण वगैरे अशावेळेस सरकन् डोळ्यासमोर येतं.इतकच नाही तर कधी बिझनेस मध्ये होणारा लॉस म्हणजे कठीणच. इतक्या मेहनतीने केलेलं सगळं क्षणात उध्वस्त होतं तेव्हा प्रचंड धक्का बसतो.करोडोंच नुकसान हे सहजासहजी परवडण्यासारखं नसतं.

पहा,ही केवळ उदाहरणं आहेत.पण अशा प्रकारेच असंख्य उलथापालथी आयुष्यात घडत असतात.आणि यामुळे आयुष्यावर, मनावर,मानसिकतेवर याचा भयंकर वाईट परिणाम होतो.त्यानंतर आयुष्याचा कठीण काळच सुरू होतो.आयुष्यात चारही बाजूंनी फक्त प्रॉब्लेम्सच दिसत राहतात.आणि आपणही फक्त प्रॉब्लेम्सवर,त्या कठीण काळावरच फोकस करतो.जास्त कॉन्सनट्रेट करतो.

काही मार्ग सुचत नाहीये.आता सगळं अवघड होऊन बसलय असच आपण बोलत राहतो.पण खरचं सगळं इतकं अवघड झालेलं असतं का ?

आणि जरी झालचं असेल सगळं अवघड तरी त्यावर एखादा मार्ग तर आपण निश्चितच काढू शकतो नं ?

कोण म्हणतं? कठीण काळात काही मार्ग सापडत नाही.

मित्रांनो,खरं तर अत्यंत कठीण काळामध्ये सुद्धा एक सोपा मार्ग दडलेला असतो.आपलं मात्र त्याकडे लक्ष नसतं.आपण त्या कठीण काळातच इतके गुंग झालेले असतो की काही विचारायलाच नको.तर तो सोपा मार्ग आपणच शोधायचा असतो.आणि त्यात काहीही अवघड नाही.अशावेळेस मनाला फक्त एकच प्रश्न विचारून पहायचा.

“यातून बाहेर पडायचं आहे की नाही?”

निश्चितच आतून आवाज “हो” असाच येणार.गरज फक्त स्वतःला शांतपणे विचारण्याची असते.आपण काय करतो आधीच हातपाय गाळून बसतो.मला जमणारच नाही असं आपण आधीच ठरवून टाकतो.त्यापेक्षा मला हे जमू शकतं असा विचार करून पहा.या आधी आलेल्या कठीण काळातून कसा मार्ग काढला ते आठवून पहा.

आजुबाजूला असणारी काही उदाहरणं पहा.त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाचा अंदाज घ्या. त्यांनी कोणत्या प्रकारे मार्ग शोधले एकदा जाणून घ्या.डोकं शांत ठेवून काम केलं तर सगळं सुरळीत होऊ शकतं.मार्ग सापडत नसेल तो निर्माण करा.आयुष्यात पसरलेल्या अंधाराला उजेडाची वाट फक्त आपण स्वतःच दाखवू शकतो.साधं सरळ आहे.

एखादी गोष्ट जमत नसेल तर आपण ती शिकतो.त्यासाठी मेहनत घेतो आणि यशाची, सुखाची पायरी सर करतो.अगदी तसच आयुष्यात कोणताही कठीण काळ आला तरी खचून जाणं हा पर्याय असू शकत नाही. याउलट कठीण काळातही एखादा सोपा मार्ग दडलेला असु शकतो हे स्वीकारून पुढे जायला हवं.तेच खरं आयुष्य असतं.असंख्य उदाहरणं आहेत त्यातूनच प्रेरणा घ्या.

◆एखादी अपंग व्यक्ती डोळ्यासमोर आणा.जिला हाताने लिहता येत नाही ती पायाने लिहायचा प्रयत्न करते.

◆ज्यांना मुलांच सुख नाही ते एखादं मुल दत्तक घेतात.

◆सिग्नलवर फुलं विकणारी, पेन विकणारी मुलं आठवा.

◆कॉलेजमध्ये काम करून शिकणारा विद्यार्थी.

◆आयुष्यात प्रचंड उलथापालथ होऊन सतत हसणारी व्यक्ती आठवून पहा.

आयुष्यातील अशा काही गोष्टींच निरीक्षण करा.आयुष्य किती कठीण आहे आणि किती नाही याचा अंदाज आल्याशिवाय राहणार नाही.आणि कठीण काळातही मार्ग दडलेला असतो याची जाणीवही नक्कीच होईल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!