चूक ही एक नवीन संधी आहे कधीही न शिकलेले शिकण्याची.
मेराज बागवान
चूक प्रत्येकाकडून होते.मी ती चूक कोणतीही असू शकते.जसे की एखाद्या कामामध्ये झालेली चूक, नातेसंबंधांमध्ये झालेली चूक,किंवा इतर कोणतीही.चुकतो तो शिकतो.पण फक्त चुकणे योग्य नाही.तर चूक केल्यानंतर ती सुधारणे,आणि त्याच चुकीची पुनरावृत्ती न करणे महत्वाचे असते.प्रत्येक चूक आयुष्यात खूप काही शिकवून जाते.आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देते.आणि म्हणूनच चूक ही एक नवीन संधी आहे कधीही न शिकलेले शिकण्याची.
शुभम एक खूप चांगला, गुणी मुलगा.शिक्षण संपल्यानंतर चांगल्या नोकरीला लागला.घरचे वातावरण देखील अगदी सुशिक्षित आणि सुसंस्कृत.असेच एकदा शुभम ची पूर्वा शी मैत्री झाली.दोघेही अगदी छान राहत असत. पूर्वा देखील एक चांगली, हुशार मुलगी होती.हळूहळू शुभम पूर्वा मध्ये गुंतत गेला.त्याला तिच्याशिवाय राहवत नसे.करमत नसे.तिची जणू त्याला सवयच होऊन गेली.तो तिच्या प्रेमात पडला होता.आणि आता तो विचार करीत होता , की पूर्वा ला देखील मी आवडतो.
शुभम पूर्वा ची खूप मदत करीत असे.तिच्या अडचणीत नेहमी हजर असे.तिच्यासाठी काय करू आणि काय नको असे त्याला होत असे.पूर्वा ला कोणतीही अडचण आली तरी ह्याला चैन पडत नसे.पूर्वा देखील शुभम च्या संपर्कात होती.पण तिच्या मनात प्रेम असे नव्हते.पण शुभम चा दिवसेंदिवस गैरसमज होत होता.त्याने जणू गृहीतच धरले होते की पूर्वा देखील आपल्याला पसंत करते.
दिवस जात होते. पूर्वा आता पूर्वी पेक्षा जास्त तिच्या कामात व्यस्त होती.शुभम शी बोलायला देखील तिला पूर्वीसारखा वेळ नव्हता.मात्र शुभम खूप भावनिक होत होता.आणि त्याच भावनांच्या आहारी जाऊन ,त्याने एकदा पूर्वा कडे आपल्या प्रेमाची कबुली दिली.त्याला तिच्याबद्दल जे जे वाटते ते सर्व त्याने तिला सांगितले.पूर्वा बिनधास्त मुलगी होती आणि स्पष्टपणे बोलणारी देखील.पूर्वा ने शुभम ला सांगितले,”तू माझा खूप चांगला मित्र आहे.पण मला या पुढे जायचे नाही.आपण कायम मित्र राहू यात वाद नाही, पण जर तू माझ्याकडून वेगळी अपेक्षा ठेवत असशील तर मला ते जमणार नाही.कारण मला अशा नात्यात अडकायचे नाही,सॉरी.”
शुभम साठी हे खूप अनपेक्षित होते.पूर्वा च्या ह्या उत्तराने तो खूप दुःखी झाला.दिवसामागून दिवस जात होते. पण शुभम अजूनही तिथेच होता.त्याला पूर्वा ची सतत आठवण होत असे.पण आता काहीच उपयोग नव्हता.शुभम आता खूप शांत झाला होता.काही दिवस लोटले.आणि तो स्वतःच विचार करू लागला.”माझे पूर्वा वर प्रेम आहे.पण तिच्या मनात तर माझ्याविषयी काहीच नाही.आणि ह्यात चुकीचे असे काहीच नाही.आणि मी देखील इतका काळ दुःखी राहण्याचे काहीच कारण नव्हते.मी उगाच गोष्टी उगाळत बसलो.
माझे प्रेम आहे खरे,पण मी पूर्वा वर कोणतीच जबरदस्ती करू शकत नाही.मग ती मला किती जरी आवडत असली तरी देखील.प्रेम हे अपेक्षा विरहित आहे.मला ती आवडते म्हणून तिला पण मी अवडलेच पाहिजे असे मुळीच नाही.मला तर ती फक्त खुश असलेली हवी आहे.मग काय झालं, ती माझ्यासोबत नाही म्हणून.प्रत्येकाला निवडीचा अधिकार,हक्क आहे ,स्वातंत्र्य आहे.मग मी कोण,तिला माझ्यावर प्रेम कर म्हणून सांगणारा.इतकी साधी गोष्ट मला समजली नाही.प्रेम एकतर्फी जरी असले तरी संपत नाही.मग ती व्यक्ती आपल्यासोबत असो वा नसो.सो, मी आता ठरवलं आहे, नकारात्मक कोणतेच विचार मनात आणायचे नाहीत.मी खूप लकी आहे, मला पूर्वा च्या निमित्ताने आयुष्य कसे जगावे, प्रेम म्हणजे नक्की काय,नाते म्हणजे काय हे समजले.आता माझी कोणतीच तक्रार नाही”.
वरील उदाहरणात, शुभम चे पूर्वा वर खरे प्रेम होते.प्रेम करणे ही त्याची चूक नव्हती.पण त्याने जे काही गृहीत धरले होते, ते चुकीचे होते.आणि काही काळानंतर का होईना त्याला त्याची ही चूक समजली आणि तो त्या गोष्टींमधून बाहेत पडला,त्याने वास्तव स्वीकारले आणि एक शांतीमय आयुष्य तो आज जगत आहे.यातूनच इतकेच सांगायचे आहे की , जेव्हा कधी आपल्या हातून चूक होते,तेव्हा दुसरीकडे हीच चूक आपल्याला आयुष्यातील खूप सध्या,सोप्या पण तितक्याच महत्वाच्या गोष्टी शिकवून जाते.ज्यामुळे आपले आयुष्य मार्गी लागते.
आयुष्य जगत असताना, एकही चूक न होणे हे अशक्य आहे.कधी आपल्याकडून कोणी दुखावले जाते, कधी कामात चूल झाल्यामुळे नुकसान सहन करावे लागते.कारणे, घटना काहीही असू शकतील.पण हे मात्र नक्की की, ह्या सर्व चूका आपल्याला संधी देत असतात नवीन शिकण्याची ,जे आपण ह्या आधी कधी शिकलेले नसतो.
मग हे शिकणे काहीही असू शकते.जसे की ,’इतरांशी कसे वागावे,बोलावे, समोरच्या व्यक्तीचा मान ठेवणे किती गरजेचे आहे,संयम किती जरुरी आहे, व्यक्त होणे किती गरजेचे आहे, कोणतेही काम करताना ते काळजीपूर्वक करणे किती जरुरी आहे, विश्वास कोणावर आणि किती ठेवावा, भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे, स्वतःबरोबर इतरांचा देखील विचार करणे किती महत्त्वाचे आहे,कृतन्यता ठेवणे किती गरजेचे आहे’ अशा काही नवीन गोष्टी चुका आपल्याला शिकण्याची संधी देत असतात.
मग आता आपण ठरवायचे की , चुकांमधून शिकायचे की काय कारायचे? चूक आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यास खूप मदत करते.आयुष्यात पुढे पुढे जात राहणे किती गरजेचे आहे, हे सांगत असते.आयुष्य शांततेत व्यतीत करायचे असेल तर चुकांमधून शिका, चुका सुधारा, स्वतःमध्ये योग्य ते बदल करा आणि आयुष्य भरभरून जगा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
