तुमच्यामागे तुमच्याविषयी बोलणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका आणि नंतर काही जाणूनही घेऊ नका.
टीम आपलं मानसशास्त्र
आपल्या अवती भवती , अगदी आपले जवळचे मित्र मैत्रीण , नातेवाईक असतील तरी ही बरेचवेळा ते तुमच्या तोंडावर एक बोलत असतात आणि तुमच्या मागे तुमच्याविषयी वेगळेच बोलत असतात.
म्हणजे खूप वेळा तोंडावर गोड गोड बोलणारे लोक पाठीमागे खंजीर खुपसणारे असतात. शब्दशः अर्थ घेवू नका पण असेच होते काही लोकांच्या संदर्भात.
साधारणपणे ही मानसिकता का होत असेल विचार करा.
तुमचे यश , आर्थिक सुबत्ता , स्थावर , मालमत्ता मग अगदी घर , घरातल्या वस्तू ,गाडी , तुमचे राहणीमान , तुमच्या कडच्या ब्रँडेड वस्तू या बघून उगीचच त्यांच्या मनात तुमच्या बद्दल जेलसी निर्माण होते.
अर्थात ही निर्माण होण्याचे ही कारण असते ते म्हणजे त्यांच्याकडे या गोष्टी नसतात. दुसरे म्हणजे त्यांच्या कडे या गोष्टी मिळविण्याकरिता क्षमता नसतात. आणि म्हणूनच मनात एक असूया तयार होते. की माझ्याकडे या गोष्टी नाहीत त्याच्याकडे आहेत. अगदी थोडक्यात तुलना.
पुरुषांच्या मध्ये या असूया , द्वेष स्त्रियांच्या पेक्षा कमी प्रमाणात दिसून येतात. पण तरीही पुरुषांमध्ये ही ती असतेच.
श्री इलेक्ट्रिकल इंजिनिअर होता. सरकारी ऑफिसमध्ये चांगल्या हुद्द्यावर होता. अतिशय हर हुंनरी , संगीत , adventure सगळ्यात पुढं पुढं असायचा. त्याचमुळे वरिष्ठ साहेबांच्या पासून सगळ्यांचा लाडका आणि चहेता , बायको पण त्याची सरकारी नोकरी मध्ये वरिष्ठ अधिकारी त्यामुळे दोघांचे मिळून भरपूर पगार घरी येत होते. खर्च तसे फारसे काही नाहीत कारण आई वडिलांच्या सोबत राहत होते. घरभाडे नाही . किंवा इतर खर्च फारसे नाहीत. किरकोळ रक्कम घरी दिली की बाकी सगळे पैसे शिल्लक , त्यातून दोन घरे , दोन मोठ्या गाड्या , सोने , चांदी हिर्याचे दागिने सगळे गडगंज होते. परदेशी अनेक वेळा फेऱ्या. पर्यटनाची आवड. खाण्याची आवड.
श्री चा जवळचा मित्र शिवाजी त्याचे तोंडावर प्रचंड कौतुक करायचा, स्तुती करायचा ,आणि इतर लोकांच्या कडे मात्र सतत कुजबुज करायचा. साहेबांना कसे गुंडाळले आहे. बायकोचा पगार पण भरपूर म्हणून ऐश परवडते . असे आणि तसे काही ना काही बोलत असायचा. पण तोंडावर मात्र एकदम मी किती चांगला मित्र असे दाखवत असे.
आणि बरेचवेळा श्री सोबत राहून त्याच्या सारखेच वागण्याचा प्रयत्न करत असे. तसाच रुबाब मारण्याचा प्रयत्न . आणि मी श्री चा मित्र म्हणजे तसाच असे attitude होते त्याचे. कौआ चला हंस की चाल. असे काहीसे. पण म्हणून श्री मध्ये काहीच फरक पडला ही नाही आणि त्याने तो असा का वागतो हे जाणून. घेण्याचा प्रयत्न ही केला नाही.
पण एकदा श्री ला त्याच्याच ऑफिस मधल्या दुसऱ्या मित्राने शिवाजी विषयी सांगण्याचा प्रयत्न केला. पण श्री ने जाणून बुजून दुर्लक्ष केले. आणि काही जाणून घेण्याचा प्रयत्न ही केला नाही. कारण त्याच्या दृष्टीने हा फुकट आणि विनाकारण वेळ वाया घालवणे आहे. आणि ते जाणून घेवून काय करायचे. त्यापेक्षा आपला आनंद कशात आहे त्या गोष्टी करण्यात तो गुंतून पडायचा. रमून जायचा. आपल्या सोबत इतरांनाही आपल्या संगीताचा आस्वाद घेण्यास आणि उत्साही राहण्यास मदत करायचा.
दुसरी गोष्ट अशी असते की काही लोकांचा स्वभवच असा असतो की तुमचे चांगले कसे होवू शकते. दुसऱ्याचे चांगले बघवत नाही थोडक्यात.
म्हणून त्यांच्या विषयी कधी कट कारस्थाने तर कधी खोटे नाटे बोलले जाते. तर कधी त्यांच्या विषयी अफवा ही उठवल्या जातात.
पण ज्या व्यक्तीला स्वतः विषयी खात्री असते. आपण काही चुकीचे वागत नाही यावर ठाम विश्वास असतो. जी मनाने खंबीर असते ती त्याच्या मागे बोलणाऱ्यांकडे लक्ष देत नाही आणि नंतर काही जाणूनही घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि आपला वेळ आणि energy फालतू गोष्टीत वाया ही घालवत नाहीत.
त्याऐवजी सकारात्मक गोष्टी मध्ये, आपल्या आवडत्या गोष्टी , छंद जपण्यात , नावीन्य मिळविण्यात , creativity मध्ये आणि सगळ्यात महत्वाचे आपल्याला आनंद आणि सुख , शांती , समाधान देणाऱ्या गोष्टीत आपली energy लावते.
श्री ने एका वर्षीच्या ऐसी अक्षरे या दीपावली विशेषांकातील शांताबाई शेळके यांचा एक लेख वाचला होता आणि तो ते भरभरून जगत होता. अमलात आणत होता.
*सहावे सुख*
चिनी लोकांत एक प्रथा आहे. ते परस्परांचे अभिष्टचिंतन करतात त्यावेळी ” तुला सर्व सहा सुखे मिळोत ” असा आशीर्वाद देतात. पाच सुखे म्हणजे – आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, चांगला जोडीदार व चांगली मुलं.
सहावे सुख म्हणजेच ज्याचे त्याला कळावे असे सुख. ते त्याचे त्यानेच आयुष्यात शोधून काढायला हवे. ते सहावे सुख समोरच्या माणसाला सापडावे, लाभावे असे अभिष्टचिंतन करणारा म्हणत असतो.
आपल्याकडे तर ज्ञानेश्वरमाऊलींनी सांगितले आहेच “जो जे वांछील तो ते l लाहो प्राणिजात ”
प्रत्येकाचं हे सहावे सुख निराळे असेल.
समाजात प्रत्येकाचे राहणीमान वेगळे, आर्थिक स्तर वेगळे, गरजा वेगळ्या. ह्या सगळ्याचा विचार केल्यावर वाटलं त्याचं त्याचं सहावे सुख वेगळे.
आजच्या टप्प्यावर ज्या गोष्टी मला व्हायला हव्या आहेत त्या त्या माझं सहावे सुख असू शकतात.
पण त्या सहाव्या सुखामागे पळायला मला आवडणार नाही. जे आहे, जे मिळतंय ते माझं सहावं सुख आहे.
छान कार्यक्रम बघायला मिळावेत, ट्रिपला जायला मिळावं, आरोग्यपूर्ण असावं – निदान तब्येतीची तक्रार नसावी. चांगलं चांगलं लिहायला सुचावं. ही माझी सहावी सुखं आहेत. तसं तर यादी करू तितकी कमी वा जास्त होईल.
आत्तापर्यंत राहिलेल्या गोष्टी करायला मिळाल्या तर ते ही सहावं सुख असेल. ह्या लेखाच्या शेवटाकडे येताना शांताबाई ते सुख कसे सापडेल हे सांगतात. त्या म्हणतात, त्याचा शोध आपोआपच लागतो.
खरं आहे ते. सुखाच्या खूप मागे लागण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीच्या मागोमाग जाण्यातच खरं सुख आहे. त्या वाटेवर चालताना आनंदाचं झाडं मिळेल, खळाळणारा झरा लागेल, कधी ऊन कधी सावलीचा लपंडाव असेल, गाणारी वाट असेल…. स्वतःची चित्तवृत्ती समाधानी ठेवणं हे सहावं सुख सगळ्यांना लाभावं.
आणि म्हणूनच तो कोण त्याच्याविषयी किंवा इतरांच्या विषयी काय म्हणते याच्याकडे कायम दुर्लक्ष तर करत होताच पण नंतर ही काही जाणूनही घेण्याचा प्रयत्न करत नव्हता.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
