ह्या ४ चुका केल्यामुळे स्वतःमध्ये मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
मानसिक समस्या निर्माण होण्याची अनेक कारण असतात. ज्यामध्ये आनुवंशिकता पण येते. बरेचदा कुटुंबामध्ये कोणत्या व्यक्तीला मानसिक समस्या असेल तर ती पुढच्या पिढीकडे येण्याची शक्यता असते. पण याव्यतिरिक्त देखील अशी अनेक कारण आहेत जी आपण निर्माण करतो. अश्या काही चुका ज्या आपल्याकडून घडतात ज्यातून मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. अश्या बऱ्याच चुका आपण करतो पण चार चुका ज्या बहुतेकदा दिसून येतात ज्यांनी मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्या कोणत्या ते पाहू:
१. विचारांना खर मानणे: वास्तवता आणि कल्पना यात जेव्हा गफलत होते तेव्हा समस्या निर्माण होतात. आपण अनेकदा फक्त विचार करत असतो, प्रत्यक्षात तस काही घडलेलं पण नसत तरी ते विचारच आपण खरे मानून बसतो आणि स्वतः भोवती नसलेल्या समस्या तयार करतो. अतिरिक्त चिंता निर्माण होण्याच सर्वात मोठ कारण हेच आहे. जी गोष्ट अजून घडलीच नाही, पुढे जाऊन घडू शकते असा फक्त विचार करून व्यक्ती चिंतित होते आणि आताचा क्षण खराब करून टाकते. इंटरव्ह्यूला जाताना देखील पोटात गोळा येणे, घाम फुटणे, हात पाय थंड पडणे याच कारण विचारलं तर बऱ्याच जणांचं उत्तर हे असते की मला कठीण प्रश्न विचारतील, मला बोलताच येणार नाही. आता हे अस घडलेलं पण नसत, याउलट पण घडू शकतं. पण आधीचे चुकीचे विचार करून ते विचारच खरे मानायचे. अस केल्याने आपण अनेक मानसिक समस्या निर्माण करतो. झोपेवर याचा परिणाम होतो. आपल्या व्यक्तिमत्वावर आपल्या विचारांचा खूप मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे ते जितके आरोग्यदायी असतील, वास्तववादी असतील तितकं चांगल. आणि सर्वांत महत्त्वाचं आपले विचार खरे नाहीत ते फक्त आपल्या डोक्यात आहेत इतकं आपण लक्षात ठेवलं तरी आपल्या बऱ्याच समस्या सुटतील.
२. गोष्टी अर्धवट ठेवणे, टाळणे: ही माणसाची प्रवृत्ती आहे. आपल्याला ज्या त्या क्षणी गोष्टी पूर्ण करण्यापेक्षा अर्धवट ठेवायची जास्त सवय असते. अजून खूप वेळ आहे, करू सावकाश अस म्हणून बरेचदा आपण गोष्टी टाळतो. तात्पुरतं सोल्युशन काढून मोकळे होतो. पण अस केल्याने वास्तव बदलत नाही. जे अर्धवट राहत ते राहतच. आणि त्याला आपल्याला कधीतरी सामोरं जावं लागतं. जे जास्त त्रासदायक ठरत. शाळेत जाणाऱ्या मुलांना याचा चांगला अनुभव असेल. वर्षभर अभ्यास न करता परीक्षेच्या अगदी काही दिवस आधी अभ्यास करायला घेणे, ज्यातून टेन्शन वाढत, गोष्टी अर्धवट पण रहातात आणि भीती पण वाढते. जितकं आपण एखादी गोष्ट पुढे ढकलतो तितकी आपली समस्या वाढते. आपल्या या चालढकलपणातून आपण स्वतःसाठी अडथळे निर्माण करतो. आधी गोष्टी ढकलणे, त्या पुढे गेल्या याचा अपराधीपणा, पूर्ण करू अस ठरवलं की कदाचित होणार नाही अस वाटून येणारी चिंता आणि हे सतत झालं की आपल्याकडून काहीच होणार नाही अस म्हणून येणार नैराश्य. चालढकलपणा हा एक slow poison आहे. सुरवातीला आपल्याला काही जाणवत नाही. पण नंतर नंतर आपल्याला गोष्टी लक्षात येऊ लागतात. म्हणून गोष्टी ज्या त्या वेळी पूर्ण करणे, त्यांना सामोरे जाणे आपल्यासाठी चांगले आहे. त्यावेळी ते आपल्याला त्रासदायक वाटू शकत पण पुढे जो मोठा त्रास आपल्याला होऊ शकतो तो मात्र होणार नाही.
३. भूतकाळात अडकून राहणे: प्रत्येकाच्या भूतकाळात काही ना काही घडलेलं असतच. काही चांगल्या तर काही वाईट गोष्टी घडलेल्या असतात. ज्याचा त्याचा तो अनुभव असतो. आणि त्यातूनच आपण शिकत असतो. हे अनुभव आपल्याला पुढे कसं वागावं हे शिकवत असतात. पण काही लोक भूतकाळात अडकून बसतात. इतके की त्या वेळी जे काही घडल असेल तेच परत घडू शकत अस त्यांना वाटत. त्या घटनेतून योग्य ती शिकवण न घेता तिथेच स्वतः ला थांबवतात. उदा. रिलेशनशिप प्रोब्लेम, म्हणजेच नात्यात असताना त्याचा वाईट अनुभव येणं, पार्टनर चांगला नसण. ही समस्या आता बरेच प्रमाणात जाणवते. नात तुटण ही त्रासदायक गोष्ट आहे. पण यातून पण दोन प्रकारच्या व्यक्ती पुढे तयार होतात. जसं positive psychology मध्ये म्हटल आहे. जेव्हा एखादा trauma घडतो तेव्हा त्याचे दोन इफेक्ट दिसून येतात. सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक पद्धतीने या अनुभवाला घेणारी व्यक्ती काय करेल तर पुढच्या वेळी कोणत्याही नात्यात पडताना विचार करेल, त्या माणसावर पटकन आंधळा विश्वास न टाकता आधी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करेल. मागच्या वेळी ज्या काही चुका झाल्या असतील त्या लक्षात ठेवून यावेळी त्या होणार नाही याची काळजी घेईल.
याउलट जी अजून भूतकाळ मध्ये पूर्णच अडकून बसली आहे जी या घटनेला निगेटिव्ह पद्धतीने पाहत आहे ती नवीन नातच तयार करणार नाही. कारण तिच्या मते मागे आला तसच अनुभव पुन्हा येऊ शकतो. सर्व माणसं एकसारखी असतात अस ती त्या एका अनुभवावरून ठरवेल. अश्या व्यक्ती आपलं आयुष्य एका जागी थांबवून टाकतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे होऊन गेलं ते बदलू नाही शकत. त्यावेळी जे काही झालं त्याला अनेक कारण असू शकतात. त्या घटनेवरून आपलं आपण पुढचं आयुष्य थांबवु शकत नाही. भूतकाळ फक्त आपल्याला जागृत ठेवण्याचं काम करतो. त्यातून योग्य तो धडा घेऊन आपलं पुढे जायचं असत.
४. दीर्घकालीन आनंदापेक्षा तात्पुरत्या आनंदाच्या मागे धावणे: पुढचं कोणी पाहिलय, आता आपण जागून घ्यायचं अशी अनेकांची वृती असते. यातून आपण स्वतः ला पण संकटात टाकतो आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना पण. काहीही विचार न करता पैसे खर्च करणे, तेलकट तुपकट खाणे, झोप, व्यायाम बाजूला ठेवून करमणूक करून घेणे ही सर्व याचीच उदाहरण आहे. आता या क्षणी या सर्व गोष्टी आपल्याला आनंद देतात. पण पुढे जाऊन याचे काय परिणाम होतील याचा आपण विचार केलेला नसतो. बऱ्याच जणांना डाएट करता येत नाही, त्यामध्ये अडथळे येतात ते याच गोष्टीने. आता समोर जे काही छान, चमचमीत दिसत ते खावस वाटत आणि वाटणं इथपर्यंत ठीक आहे पण नाहीच खाल्ल तर सहन न होण्यासारखं आहे अस वाटून खाल्ल जात. होत काय? तर डाएट बिघडत ज्यातून नंतर आपल्यालाच अपराधीपणा येतो.
खाण्याच्या बाबतीत अस नाही तर कोणत्याही बाबतीत जर फक्त आताचा विचार केला तर तो आपल्याला मानसिक त्रास देणारा आहे. आपल्याला ज्या नकारात्मक भावना जाणवतात त्यातून जे आपण वागतो नंतर त्याचे परिणाम वाईटच होतात. उदा. राग आला, ओरडलो, मारलं. तेव्हा ते बरोबर वाटत पण त्याचे परिणाम, ते चांगले असतात का? नाही. म्हणूनच आपण जे काही करत आहोत ते करताना आपला आताचा फायदा आणि दीर्घकालीन फायदा यांच्यामध्ये समतोल ठेवून करावी. तरच आपल्याला कमी तर होईल.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
खूप उपयोगी
अतीशय उपयुक्त धन्य वाद जो माणूस मानसिक समस्यात गुरफटून गेलेले असतो जो स्वतः च आयुष्य हरवून बसलो असतो.अगदी ही अवस्था व्यसनाधीन माणूस व्यसनी होतो आणि त्याच कुटुंब उध्वस्त होते त्या पेक्षा ही वाईट अवस्था आहे .