जेव्हा काहीतरी वाईट घडतं, तेव्हा तुमच्याकडे हे तीन पर्याय उपलब्ध असतात.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
एक गाव होत. गावात बरीच घर होती. शाळेत जाणारी मुलं होती. पण ते गाव अगदी छोट होत. फार सोयी सुविधा नव्हत्या. शाळा पण नव्हती. त्यामुळे ही मुल त्यांच्या बाजूच्या गावातल्या शाळेत जात. तिथे शाळा होती. आता या शाळेत जायची वाट कुठून जाई? तर जंगलातून. त्या दोन्ही गावांना एक जंगल जोडत होत. शहरात जायचं असेल, बाजूच्या गावात; तिथल्या शाळेत जायचं असेल किंवा कोणताही प्रवास करायचा असेल तरी गावकऱ्यांना त्या जंगलातून जावं लागत असे. ती वाट देखील काही सोपी नव्हती. कारण जंगल म्हटल्यावर जंगली श्वापद आली, मोठ मोठी झाड झुडप, काट्याकुट्यांनी भरलेली पायवाट आली आणि नदी ती देखील असतेच. या सर्व गोष्टी पार करून मग कुठे माणसं दुसरीकडे पोहोचत असत. त्यांच्याकडे तोच पर्याय होता. आणि आता त्यांना त्याची सवय देखील झाली होती. छोटी छोटी मुलं देखील एकमेकांच्या सोबतीने शाळेत जात आणि एकत्रच सोबत येत.
त्या जंगलात जी नदी होती त्यावर एक लाकडी पूल होता. पलीकडे जाताना तो पुल पार करायचा आहे जायचं. त्या पुलाला पण आता खूप वर्ष झाली होती. तो खूप जुना झाला होता. कितीतरी वर्षांपूर्वी लाकडाच्या पट्ट्या घालून तयार केलेला तो पुल. अगदीच काही नाही तर त्याचा आधार लोकांना होत होता. पण तो पण आता जीर्ण झाला. लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करण आवश्यक होत. कारण सर्व गावकऱ्यांचे आयुष्य त्यावर होते. आता बाहेरून जरी नीट दिसत असला तरी मोठा पाऊस किंवा वारा आला तर तो कोसळण्याची, मोडण्याची शक्यता जास्त होती. आणि झालं देखील तसच. मध्ये एक दोन दिवस खूप मोठा पाऊस पडला. मुलांना तोपर्यंत सुट्ट्याच होत्या. त्यामुळे जाण्याचा काही प्रश्न नव्हता. पण आता शाळा सुरू झाली होती. दिनेश, रवी आणि मंगेश हे तिघे मित्र. ते नेहमी शाळेत जाताना सोबत जात आणि येताना पण सोबत येत. शाळा सुरू झाल्याचा आनंद होतच. तिघे पण तयारी करून आज शाळेला निघाले. गप्पा मारत मारत ते निघाले होते आणि अस करत ते पुलापर्यंत येऊन पोहोचले. दोन दिवस मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे पुल देखील हलल्यायासारखा झाला होता. जरा जोराचा दाब पडण पुरेस होत तो पुल तुटायला. नेमक तसच काहीस झालं. ती तिघही पुलावरून जाऊ लागली. सुरवातीला इतकं काही जाणवलं नाही, कारण त्यांनी नुकतीच सुरुवात केली होती. पण जसं ते तिघही पुलावर आले, त्यावर दाब पडला तसा तो पुल जोरात हलू लागला. त्याच्या पट्ट्या आधीच खराब झाल्या होत्या पाय ठेवल्यावर त्या मोडू लागल्या.
त्या तिघांना त्याची कल्पना नव्हती. ते नेहमीसारखे इकडे तिकडे लक्ष देत जोरात पाय वाजवत चालू लागले होते. जसा तो पुल हलला, पट्टी मोडली तसे ते तिघही घाबरले. कारण अचानक अस झाल होत. मंगेश तर इतका घाबरला की तो आला होता तसाच मागे गेला. तो पुढे यायला तयारच नव्हता. रवी एक क्षण स्थब्धच झाला. अचानक अस झाल्याने त्याला काही समजलंच नाही. तो गांगरून गेला.
पण दिनेश तो तसा सुरुवातीपासून धाडसी होता. कल्पना नसताना अस झालं त्याने तो ही पटकन घाबरला पण मागे पळून गेला नाही की अगदीच रविसारखा गांगरून गेला नाही. त्याने हलकेच पुढच्या पट्टीवर पाय देऊन पाहिला तर ती दाबली गेली पण मोडली वगैरे नाही. बाजूला आधाराला दोऱ्या होत्याचं. याचा अर्थ असा होता की समजा त्यावरून सावकाश गेलं असतं, तर जाता येत होत. जीवाला काही धोका नव्हता. त्याने रवीला सांगितल की माझा हात पकड आपण सावकाश जाऊ, पण तो इतका घाबरला होता की तो धड मागे पण जात नव्हता आणि दिनेश सोबत पुढे पण जात नव्हता.
शेवटी दिनेश सावकाश सावकाश पुढे गेला आणि त्याने सरतेशेवटी त्याने तो पुल पार केला. पुल मोडकळीला आला नव्हता का? तर हो! पण त्यावरून कोणी पुढे जाऊच शकत नव्हत अस नाही. कारण तस असत तर दिनेश पुढे जाऊ शकला नसता. काय करावं लागलं पुढे जाण्यासाठी? तर दोरीचा आधार घेऊन सावकाश पाऊल टाकावी लागली, आधी अंदाज घ्यावा लागला, कोणतीही घाई गडबड न करता त्यावरून जावं लागलं आणि तेच त्याने केल. पुल असा अचानकपणे हलणे, त्याच्या पट्ट्या मोडणे हे एकप्रकारे त्या तिघांवर आलेलं संकटच होत, एकप्रकारे ती वाईट घटना होती. पण, सर्वांनी एकसारखी प्रतिक्रिया दिली का? तर नाही. एक मागे पळून गेला, एक तिथेच अडकून पडला आणि एक हळू हळू त्याचा सामना करत पुढे गेला.
काय समजत या गोष्टीतून? तर जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी वाईट घटना घडते तेव्हा आपल्याकडे देखील तीन पर्याय असतात. त्या घटनेपासून पळून जाणं, तिथेच अडकून पडण किंवा मग सावकाश त्याचा सामना करण. यांनाच flight, fight or freeze असं म्हणतात. व्यक्ती या तीन पर्यायांपैकी एकाची निवड करत असते. आपल्याला असा अनुभव असेल किंवा आपण हे पाहिलं देखील असेल की अनेकदा जेव्हा आपल्या आयुष्यात जेव्हा वाईट घटना घडते किंवा घडणार असते तेव्हा त्यापासून आपल्याला काही होऊ नये म्हणून त्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा जाणून बुजून विसरण्याचा प्रयत्न केला जातो जी देखील एक पळवाटच आहे. काही लोक त्या घटनेत इतके अडकतात की आताच आयुष्यच विसरून जातात. पण काही जण मात्र त्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी त्याचा सामना करतात, प्रसंगी इतरांची मदत घेतात पण तो मोडकळीला आलेला पुल पार करतात.
निवडीच स्वातंत्र्य आपल्याकडे नेहमी राहणारच आहे. पण त्या गोष्टीपासून पळ काढून, त्यात अडकून राहून त्रास करून घेणं योग्य आहे का त्याचा सामना करून स्वतः ला मनाने भक्कम करण योग्य आणि फायदेशीर आहे याचा आपण विचार केला पाहिजे. कारण अश्या घटना होत राहणार. आपण किती वेळा पळ काढणार? कधीतरी आपल्याला सामना करावाच लागतो. मग तो सामना स्वतः तून, तयारीने केला तर काय वाईट आहे?
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

एक नवीन दिशा देणारा लेख सुपर्ब