स्वतःच्या महत्वकांक्षा विषयी रोज काहीतरी लिहा, त्या गोष्टी हळूहळू तुमच्यात उतरतील.
मेराज बागवान
कोणती ना कोणती ‘महत्वाकांक्षा’ आयुष्यात असणे फार गरजेचे असते.कारण यामुळे आयुष्याला एक दिशा प्राप्त होते आणि आयुष्य हळूहळू एक प्रकारे आकार घेऊ लागते.ही महत्वाकांक्षा म्हणजे काय? तुम्हांला आयुष्यात काय करायचे आहे, काय मिळवायचे आहे म्हणजे तुमची महत्वाकांक्षा.यालाच आपण ‘ध्येय’ देखील म्हणू शकतो.
जे जे करायची तुम्हाला इच्छा आहे ते म्हणजे तुमची महत्वाकांक्षा.ती कोणतीही असू शकते जसे की ,’परीक्षेत पहिला नंबर मिळवणे, स्वतःचा व्यवसाय उभा करणे, सरकारी नोकरी मिळविणे, कॉर्पोरेट क्षेत्रांत उच्च पदावर पोहचणे, क्रीडा क्षेत्रांत यश मिळविणे , जगभर भटकंती करणे,एखादी कला आयुष्यभर जोपासता येणे इत्यादी.मग ह्या सगळ्या महत्वाकांक्षा तुमच्यात उतरवायच्या असतील आणि त्या सत्यात देखील आणायच्या असतील तर काय केले पाहिजे?
तुमची जी काही महत्वाकांक्षा असेल त्या विषयी रोज विचार करा, त्याविषयी चिंतन,मनन करा आणि त्या गोष्टी कागदावर उतरविण्याचा प्रयत्न करा.तुम्हाला समजा स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल आणि तेच तुमचे ध्येय असेल तर तुम्ही त्या विषयीची रणनीती आखली पाहिजे.ह्या परीक्षेत पास होण्यासाठी मी काय काय केले पाहिजे, दिनचर्या कशी ठेवली पाहिजे, कोणती पुस्तके वाचली पाहिजेत, वैयक्तिक आयुष्य कसे जपले पाहिजे,कोणाकडून आणि कसे मार्गदर्शन घेतले पाहिजे हे सगळे लिहिले पाहिजे.म्हणजे तुम्हाला तुमची महत्वाकांक्षा अगदी समोर दिसू लागेल.तुम्ही ती जगू शकाल आणि लवकरच तुमचे ध्येय साध्य होण्यास याची मदत होईल.
मला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे, जी माझी ‘पॅशन’ आहे , ती मी मिळवणारच हा विश्वास स्वतःवर ठेवला पाहिजे आणि मी त्या दिशेनेच वाटचाल करेल असे रोज लिहिले पाहिजे.रोज असे केल्याने तुम्ही तुमचे ध्येय कल्पनेत पाहू शकाल. तसेच तुम्ही हे केले पाहिजे याची तुम्हाला रोज आठवण होत राहील.आणि त्या त्या गोष्टी तुमच्यात उतरू लागतील.
मला फुटबॉल खेळात माझे आयुष्य घडवायचे आहे ,असे जर तुम्ही ठरवीत असाल तर, मी यासाठी काय काय प्रयत्न केले पाहिजे जे रोज लिहिले पाहिजे.मी कोणते गुण आत्मसात केले पाहिजेत याचा विचार करावा.रोज काही ना काही याविषयी तुम्ही लिहिले तर त्या लिहिण्यातुन तुम्हाला स्वप्रेरणा मिळत जाईल आणि स्वप्रेरणा खूप मोठी असते.ती तुमची स्वप्ने सत्यात उतरवायला नेहमीच मदत करते.
आयुष्यात कोणतीही महत्वाकांक्षा असली तरी चालेल.पण ती फक्त मनात असून चालत नाही.किंवा मला हे करू वाटते, ही करायची इच्छा आहे असे म्हणून देखील काही होत नाही.जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय, किंवा इच्छा कुठेतरी लिहिता म्हणजेच पक्के करता की मला हे मिळवायचेच आहे तेव्हा ती गोष्ट खऱ्या अर्थाने तुमच्यात वाहू लागते.आता इथे लिहिणे म्हणजे अगदी काही ‘ब्लॉग’ वगैरे नाही.तुम्ही तुमच्या मनाने कसेही ते लिहू शकता.जसे की , तुमच्या खोलीत, एखादा बोर्ड असेल तर तुम्ही रोज त्यावर तुमच्या महत्वाकांक्षा विषयी काही वाक्ये लिहू शकता.किंवा तुमच्या डायरीत काही ना काही नोंदवून ठेवू शकता.कारण जेव्हा तुमची महत्वाकांक्षा तुम्ही कुठे कुठे ना टिपून ठेवाल तेव्हा खरेच ती तुमच्यात उतरेल आणि त्यामुळे तुम्ही वास्तविक कृती करायला सज्ज व्हाल.
ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही अनेक जणांची मदत घेत असाल.मग ते तुमचे पालक, शिक्षक,मित्र कोणीही असू शकते.ते तुम्हाला मार्गदर्शन देखील करतील.पण इतके करून भागत नाही.कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः काहीतरी करीत नाही तोपर्यंत काहिच साध्य होत नाही.म्हणून कोणतीही महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ,तुम्ही स्वतः पुढाकार घेणे खूप गरजेचे आहे. आणि याची सुरुवात ही लिहिण्यातुन साध्य होऊ शकते.
त्यामुळे रोज तुमच्या महत्वाकांक्षा विषयी लिहा . अगदी न चुकता.मग हळूहळू तुम्ही त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी मनाची पूर्ण तयारी करू शकाल. स्वतःला मानसिकरित्या कणखर बनवू शकाल.आणि एकदा का तुम्ही मानसिकरित्या खंबीर झालात की एक एक कृती आपोआप होऊ लागेल.आयुष्यात ही गोष्ट मिळवायची असेल तर मला काय केले पाहिजे,कोणते प्रयत्न केले पाहिजेत हे तुमच्या हळूहळू लक्षात येऊ लागेल. आणि मग यश फक्त आणि फक्त तुमचेच असेल.
पण या सगळ्यासाठी प्रथम तुम्ही तुमची महत्वाकांक्षा आणि त्याविषयीच्या सर्व गोष्टी कुठे तरी लिहून,टिपून,नोंद करून ठेवणे गरजेचे आहे.ह्या लिहिण्यामुळे त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील.खूप साऱ्या गोष्टी स्पष्ट होतील.चूका सुधारता येतील, चुकांमधून शिकता येईल ,कार्यपद्धती लक्षात येईल आणि यशाकडचा मार्ग देखील सोपा होईल.
तुम्हाला तुमच्या महत्त्वाकांक्षेसाठी भरभरून शुभेच्छा!!!!
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
