Skip to content

अनेक सुख-दुःख येऊन गेलेत, पण मी माझ्या पद्धतीनेच जगत गेले.

अनेक सुख-दुःख येऊन गेलेत, पण मी माझ्या पद्धतीनेच जगत गेले.


अपर्णा कुलकर्णी


सुनंदा आज तिच्या घट्ट बळमैत्रिनीला भेटायला निघाली होती. तिची बळमैत्रिन विमला आणि सुनंदा दोघी सातवीपर्यंत गावच्या शाळेत एकत्र शिकलेल्या होत्या. सुनंदा शाळेत खूपच हुशार मुलगी होती. सुनंदा आणि विमला तब्बल ३० वर्षांनी एकमेकींना भेटणार होत्या. विमलाने सुनंदाला पाहिले आणि तिने लगेच सुनंदाला घरात घेतले. सुनंदाला पाहून तिला आठवले सातवीत असतानाची सुनंदा. आणि सगळा भूतकाळ क्षणात सूनंदाच्या डोळ्यासमोरून जायला लागला. आठवायला लागले शाळेत असल्या पासून चे क्षण. सुनंदा शाळेत असताना दुपारच्या वेळी एकदा तिच्या आई बाबांना शेतात साप चावला आणि ती पोरकी झाली. पुढे तिच्या काकांनी तिची शिक्षणाची जबाबदारी घेण्यापेक्षा सरळ लग्न लावून दिले ते ही तिच्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठ्या मुलाबरोबर.

बिचारी सुनंदा आई बाबांच्या जाण्याचा धक्का पचवते ना पचवते तोच तिच्या काकांनी मनाविरुध्द लग्न लावून दुसरा धक्का दिला होता. लग्न म्हणजे काय याची समजच नसलेल्या सूनंदला तो अनुभव घेण्याची वेळ आली होती. नवरा तिच्याशी शारीरिक संबंधाची मागणी करत तेंव्हा कोवळ्या वयाची सुनंदा घाबरून, भांबावून जात होती, नकार देत होती पण तिच्या इच्छेला न जुमानता प्रसंगी मारहान करून तिचा नवरा हवे ते, हव्या त्या पद्धतीने ओरबाडून घेण्याचे काम करत होता. सूनंदाच्या कोवळ्या मनाच्या चिंध्या चिंध्या झाल्या होत्या त्यामुळे. त्यातच तिला दोन मुले झाली होती. नवरा कसलीही जबाबदारी न घेता दारू पिऊन येत होता, नशेत नको तितके नको त्या पद्धतीने मारत होता. इतका की भिंतीवर तिचे डोके आदळत होता आणि चक्कर येऊन सुनंदा बेशुध्द पडत होती.

हळू हळू मुले मोठी होत होती पण तिच्या नवऱ्याचा छळ काही केल्या कमी होत नव्हता. सुनंदा लोकांचे धूनी, भांडी, स्वयंपाक वाट्टेल ते काम करत होती आणि मुलांची आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरत होती. कित्येकदा ती मुलांना घेऊन कामाच्या ठिकाणीच एखाद्या घरी रहात होती. नवऱ्याला ते कळताच तो ही तिथे येत होता, खूपच प्रेमाने वागून गोड बोलून पुन्हा घेऊन जात होता आणि परत मारहान करत होता.

असे जवळपास १०-१२ वेळा घडून गेले होते. सुनंदा काम करत होती तेथील बायका तिला खूप समजावत, परत जाऊ नको म्हणत पण तो कपाळाच कुंकू होता ना तिच्या. शिवाय त्याच्या सोबत राहिले की समाज नावे ठेवत नव्हता. त्यामुळे तीच चूक ती पुन्हा पुन्हा करत होती. पण आता मात्र तिची सहनशक्ती संपली आणि तिने घर सोडले. गावात काही ओळखीच्या विश्वासू लोकांच्या जवळ पत्र्याचे शेड उभारून राहिली सुनंदा.

सुरुवातीचे काही दिवस तर अन्न शिजवायला भांडे, गॅस काहीच नव्हते. कारण नवऱ्याच्या घरचा चमचा ही तिने सोबत घेतला नव्हता.. त्यावेळी तिच्या मालकीण बाईंनी तिला बरीच मदत केली. हळू हळू तिने स्वतःचा संसार उभा केला. घरात तर प्रत्येकच गोष्ट घेतलीच शिवाय स्वतःला नीट शिकता आले नसल्याने दोन्ही मुलांना इंग्लिश स्कूलमध्ये शिकवले होते तिने. आताही तिचा नवरा अधून मधून येत होता गोड बोलत होता पण ती मात्र कोणत्याच बोलण्याला भुलत नव्हती.

स्वतःचे मन ही तिने इतके खंबीर बनवले होते की कोणत्याच गोष्टीचा त्यावर परिणाम होत नव्हता. तिच्या दुर्दैवाने तिच्या मुलाने सगळे गुण त्याच्या बाबांचे घेतले होते. पण तरीही कधीच तिने मुलाचा राग राग केला नव्हता. जितके जमेल तितके प्रेमच दिले होते तिने. संस्कार करण्याचा प्रयत्न केला होता. मुले मोठी होत होती आणि नवऱ्याने ही तिच्याकडे येणे बंद केले होते.

त्यामुळे सुनंदा आता निर्धास्त झाली होती. तिने सगळे प्रसंग विमलाला सांगितले तेंव्हा विमलाचा ऊर अभिमानाने भरून आला. विमला म्हणाली, सुनंदा तुझ्या आयुष्यात इतक्या अडचणी येऊन गेल्या, इतक्या कठीण प्रसंगाला तू सामोरी गेली पण खचली कशी नाहीस ?? त्यावर सुनंदा म्हणाली, खचून गेले असते तर उभीच राहू शकले नसते कधी. सुरुवातीला मी अनेकदा रडले, त्याला संधी दिली पण त्याच्यात काहीच फरक पडला नाही. शेवटी माझ्याच पद्धतीने जगायचे ठरवले आतापर्यंत माझ्या आयुष्यात अनेक सुख दुःख येऊन गेले, पण मी माझ्या पद्धतीनेच जगत गेले.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!