Skip to content

‘मी’ एकटी राहू शकते का?? एक सतावणारा प्रश्न.

राहणं.. सिंगल लिव्हिंग- (१)


वर्षाबाशू ,

पत्रकार( लोकमत,नागपूर) .


एकट्याने राहणं यावर खूप आधीपासूनच लिहावसं वाटत होतं. असं एकट्यानं राहणं आयुष्याच्या विविध टप्प्यात वारंवार समोर आलेलं होतं… आहे.

त्याची सविस्तर ओळख होऊन, त्याचे असंख्य पैलू पाहून, त्याच्या काटेरीपणातून स्वत:ला थोडंफार बाहेर काढण्याचं कसब कमवेपर्यंत बरीच वर्ष जावी लागली.

एकट्याने राहणं पूर्णत: सुखावह किंवा पूर्णत: दु:खदायक आहे असं वाटत नाही. ते तुम्ही कसं घेता यावरच बरंचसं निर्भर आहे. आणि हे आपण कसं घेतो, किंवा कसं घेऊ शकतो हे शिकण्याचा जो काही प्रवास झाला तो थोडाफार शेअर करावासा वाटतोय..

एकटं राहणं ही एक स्थिती आहे. कधी ठरवून तर कधी अपरिहार्यतेचा भाग म्हणून समोर आलेली. त्या परिस्थितीला एक दु:खाची वा उदास, नैराश्येची किनार प्रसंगी जाणवणारी. आला दिवस भरत रहाणे हे तसे अवघडच काम. तो तर कामात, गडबडीत निघून जातो. संध्याकाळी किंवा रात्री दिवसभर निग्रहाने बाजूला सरकवलेला एकटेपणा, एकाकीपणा समोर येतो तेव्हा, एकटं राहणं म्हणजे काय असतं याची प्रचिती येत राहते.

एकटं राहणं हे एखाद्या स्त्रीच्या वाट्याला जेव्हा येतं तेव्हा त्याचे सामाजिक, मानसिक, शारीरिक व अन्य पातळ्यांवरील अनुभव हे खूपच वेगळे असतात. त्या अनुभवांतून आलेले आकलन वेगळे असते. आपलं कुणीतरी असावं.. मनाची ही मागणी शांत होत नाही. कायमच काट्यासारखं ते टोचत राहतं. ती टोचणी फक्त मनालाच विद्ध करत नाही. ती आयुष्याच्या अनेक चांगल्या, उमेदीच्या कडांना आतल्याआत करपवत जात असते.

मुळात हा सगळा आपल्या संस्कृतीचा आणि कंडिशनिंगचा भाग आहे. आपण स्वत: एकटं आनंदानं का नाही जगू शकत? तसं आपल्याला लहानपणापासूनच कां नाही शिकवलं जात? का बरं आपल्या आनंदाला कुणा दुसऱ्याच्या अस्तित्वाची गरज पडावी ? कुणाच्या साक्षीनेच आपल्या आनंद वा सुखाच्या कल्पना खऱ्या व्हाव्यात? एकटं राहण्याला असे अनेक प्रश्न कायम लगडलेले असतात.

खरंतर एकटे आपण कधी नसतोच. आपण आपल्यासोबत तर नक्कीच असतो. फक्त त्याची जाणीव व्हावी लागते. एकदा ती जाणीव झाली की मग एकटेपणा हा आनंदाचा व समृद्धीचा ठेवा होऊन जातो. स्वत:ची स्वत:सोबत नवी ओळख होत जाते. कुणा दुसऱ्याच्या संदर्भाविना आपण खऱ्या अर्थाने स्वत:वर प्रेम करू लागतो. स्वत:साठी जगू लागतो.

एकटं राहताना अनेक कवडसे गवसत जातात. घेऊन येईन एखादा त्यातला लवकरच..



online counseling घेऊन मिळालेली प्रतिक्रिया नक्की वाचा आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !


Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 हा क्रमांक आपल्या मोठ्या व्हाट्सएप समूहात ऍड करा.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!