समाधानी आयुष्य जगण्याच्या या life skills तुम्हाला माहितीयेत का?
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
आपल्या सर्वांना एक समाधानी चांगल आयुष्य हवं असतं. प्रत्येकाची तिचं इच्छा असते. पण हे अस आयुष्य आपल्याला कधीही आपोआप मिळत नाही. ते कोणालाच मिळत नाही. त्यासाठी आपल्यालाच काही प्रयत्न करावे लागतात. काही गोष्टी जाणीवपूर्वक शिकाव्या लागतात. जेणेकरून त्या गोष्टींचं कौशल्य आपल्याला प्राप्त होईल. आता कौशल्य म्हणजे काय? तर एखादी गोष्ट चांगली पद्धतीने अगदी सहजपणे करता येण्याची व्यक्तीची क्षमता. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कौशल्य ही असतात.
काहीजणांना छान नाच करता येतो, तर काहींना एखाद्याची नक्कल म्हणजेच मिमिक्री करता येते. काहीजणांना दोन्ही हातांनी लिहिता येते तर काहींना खूप छान जेवण बनवता येते. ज्याचे त्याचे ते कौशल्य असते. बरेच जणांना कौशल्य म्हणजे खूप मोठं काहीतरी कठीण अस वाटत. पण अस काही नाही. जी गोष्ट सततच्या सरावाने आणि परिश्रमाने प्राप्त होते ते त्या व्यक्तीचं कौशल्य बनून जात. त्यामुळे आपल्याला पण एखाद्या गोष्टीचं कौशल्य मिळवायचं असेल तर त्याची सतत प्रॅक्टिस करावी लागते व त्यात सातत्य असावं लागत. ही झाली काही कौशल्य जी व्यक्तीनुसार बदलतात. पण आपण आता अशी दहा जीवन कौशल्य पाहणार आहोत की जी प्रत्येक व्यक्तीला येणे गरजेचे आहेत. कारण ही कौशल्य आपल्याला एक चांगल, सक्षम आणि समाधानी आयुष्य जगायला मदत करतील. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ही दहा जीवन कौशल्य सांगितली आहेत. ती कोणती ते पाहू:
१. स्व- जाणीव: स्व- जाणीव म्हणजेच self awareness. हे खूप महत्वाचं कौशल्य आहे. स्व – जाणीव म्हणजेच स्वतःची स्वतः ला असलेली माहिती. आपण आपल्याला, स्वतः ला किती ओळखतो यावर आपण येणारी परिस्थिती किंवा अडथळा कसा हाताळतो हे ठरतं. मी मला ओळखण म्हणजेच काय तर मला काय आवडतं, मला काय आवडत नाही, माझ्या काय क्षमता आहेत, माझ्या कमकुवत बाजू काय आहेत हे माझं मला चांगल्या पद्धतीने माहीत असणे. हे माहीत असणे का गरजेचे आहे?
कारण जेव्हा आपण जर एखाद्या समस्येत अडकलो आणि तिथे आपल्याला आपल्या strength, आपले weakness माहीत नसतील तर आपल्याला ती समस्या सोडवताना अडचणी येणार. हे समस्यांच्या बाबतीत नाही तर सगळीकडेच लागू होत. अनेक मुल करीअर साठी काही क्षेत्र निवडतात पण नंतर जाऊन त्यांना ती गोष्ट जमत नाही. का? कारण स्व – जाणीव नसते. मला काय आवडत, काय नाही, काय जमत हे नीट माहीतच नसत. स्वतःची नीट माहिती नसल्याने पुढे खूप समस्या निर्माण होतात म्हणून स्व जाणीव खूप गरजेची आहे. यासाठी SWOT Analysis हे तंत्र खूप फायदेशीर ठरतं.
२. समानुभुती: समानुभुती म्हणजेच empathy. या नावातच सर्व काही दडल आहे. सम+ अनुभूती. समोरच्या माणसाला जे काही वाटत आहे, जाणवत आहे त्याची त्याच तीव्रतेने जाणीव करून घेणे, ते अनुभवणे म्हणजे empathy. त्याचं सुख दुःख, त्याच आयुष्य त्याच्या डोळ्यातून पाहण्याची क्षमता. Empathy आपल्याला माणसांशी जोडण्याचं काम करते. आपण जितकं चांगल्या पद्धतीने लोकांच्या, समाजाच्या सुख दुःखाला समजून घेऊ, दुःखातून बाहेर काढायला मदत करू तितके आपले नातेसंबंध चांगले, सुदृढ होत जातात. आणि यानेच एक चांगला समाज तयार होतो. समाजात अनेक प्रकारची, अनेक वेगवेगळ्या पार्श्र्वभूमीची लोक राहत असतात. त्यांच्याबद्दल जर आपल्याला प्रेम, कळकळ आस्था असेल तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी करणार. नाहीतर एक स्वतंत्र माणूस म्हणून आपण कदाचित यशस्वी होऊ पण समाजाचा एक भाग, नात्याचा एक भाग म्हणून आपण यशस्वी नाही होऊ शकत. जा व्हायचं असेल तर आपल्याला empathetic असण गरजेचं आहे.
३. क्रिटिकल थिंकिंग: कोणत्याही गोष्टीचा नीट सर्व बाजूंनी विचार करून, त्यातून जी काही माहिती मिळते त्याच मूल्यमापन करून विश्लेषण करण्याची म्हणजेच त्यातून अर्थ काढण्याची क्षमता म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. ही विचारसरणी माणसाला समस्येचे उत्तर शोधायला मदत करते. तसच एखादा माणूस काहीतरी सांगतो आहे म्हणून आपण ते ऐकायचे अस न करता त्यामागे काय विचार आहे, लॉजिक आहे का? हे सर्व प्रश्न विचारायला भाग पाडते. यामध्ये आपण आपल्याला वाटत म्हणून नाही तर खरच तथ्य काय आहे? फॅक्ट काय आहे? याचा शोध घेतो. बऱ्याचदा आपण एखाद आव्हान आल तर नेहमीच्या जुन्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करतो, त्यावर उलट सुलट वेगळा विचार करत नाही. कारण आपलं मेंटल फिक्सेशन तस झालेलं असतं. पण तीच गोष्ट आपण क्रिटिकली सोडवायचा प्रयत्न केला तर शक्यता जास्त असते की समस्या सुटेल.
४. क्रिएटिव्ह थिकिंग: सृजनात्मक विचारसरणी. हे एक अस कौशल्य आहे ज्यात माणूस नेहमीची गोष्ट पण अजून छान, वेगळ्या पद्धतीने काहीतरी नाविन्य आणून करतो आणि हे कौशल्य असणाऱ्या लोकांनी इतिहास घडवलेला आहे. जितके आपले विचार सृजनात्मक असतील तितकं जास्त आपण नविण्याच्या नवीन काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असणार, शोधात असणार. यातून आपलं आयुष्य पण खूप सुंदर होत आणि आपल्या एकूण मानसिकतेवर याचा चांगला परिणाम होतो. एका चांगल्या आरोग्यासाठी छंद जोपासायला सांगितले जातात ते यासाठी. कारण त्यातून आपण सर्जनशील होतो. आपल्याला नवनवीन कल्पना सुचतात. काहीतरी मिळवल्याची जाणिव निर्माण होते ज्यातून आपल्याला खूप समाधान मिळत.
५. निर्णय क्षमता: आपल्याला आपल्या आयुष्यात वेळोवेळी निरनिराळे निर्णय हे घ्यावेच लागतात आणि ते योग्य असावे लागतात. नाहीतर पुढे पश्चाताप करण्याची वेळ येते. चांगली निर्णय क्षमता असण्यासाठी काय करावं लागत? तर जी काही गोष्ट आपल्यासमोर आहे जी आपल्याला सोडवायची आहे किंवा त्यातून बाहेर पडायचं आहे तर ती आधी समजून घेणे, त्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत, परिस्थिती कशी. आहे, सर्वात महत्त्वाचं स्व जाणीव. बघा इथे स्व जाणीव खूप महत्त्वाची ठरते. पर्याय खूप आहे. आपण कोणता निवडू शकतो? आपल्याला तो जमेल का हे सर्व पाहून तो पर्याय निवडणे आणि पुढे जाणे. अस अनेकदा होत की आपला निर्णय चुकू शकतो. त्याची अनेक कारण असतात. पण त्याचा अर्थ असा होत नाही की आपण परत निर्णय घेऊ शकत नाही की बदलू शकत नाही. आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपला निर्णय बदलू शकतो तो चॉईस आपल्याकडे राहतो. आपण घेतलेले निर्णय हे आपलं आयुष्य घडवत असतात आणि एक चांगल समाधानी आयुष्य जगायला योग्य निर्णय घेता येणे आवश्यक आहे.
६. समस्या निराकरण: हे कौशल्य आपल्याला आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांना चांगल्या पद्धतीने हाताळायला मदत करते. त्यासाठी आधी समस्या म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. समस्या म्हणजे अशी गोष्ट ज्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही, अशी गोष्ट जी आपल्याला अजून सोडवता येत नाही, त्यातून पुढे जाता येत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात अचानक निर्माण होणे ही समस्या नसते त्याच उत्तर आपल्याला मिळत नसत ती खरी समस्या असते. ते मिळवण्यासाठीच आपल्याला बाकीची कौशल्य येणं गरजेचं आहे. कारण ही सर्व कौशल्य एकमेकांना जोडलेली आहेत. जर आपल्यामध्ये स्व जाणीव आहे, आपल्याला समस्या नीट समजते आहे, पर्याय शोधून त्यातली योग्य निवडून त्याचा वापर करता येत असेल तर आपली समस्या सुटते. तसच तो पर्याय वापरून जर यश नाही आलं तर परत मागे येऊन दुसऱ्या पद्धतीने गोष्ट हाताळणे म्हणजे उत्तम समस्या निराकरण असणे. ही गोष्ट काय शिकवते आपल्याला? तर काहीही झालं तरी आपण थांबून राहायचं नाही. तसच आयुष्य म्हणजे नेहमी पुढेच जाण अस नाही. ते चांगल होण्यासाठी कधी कधी दोन पावलं मागे पण यावं लागतं.
७. संवाद कौशल्य: आपण इतरांशी कसं बोलतो, कसा संवाद साधतो यावर आपली नाती तयार होतात. संवाद म्हणजे फक्त आपण जे तोंडाने बोलतो ते नाही. तर आपण कसे व्यक्त होतो. यात आपली body language पण येते. कारण जितके आपले शब्द बोलत नाहीत तितकी आपली देहबोली बोलत असते. समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकत असते. म्हणून आपलं बोलण प्रभावी लागत. कुठे, कसं, कश्या पद्धतीने बोलायच हे माणसाला समजलं तरी खूप गोष्टी सोप्या होतात. अनेक जण मनात असत एक तरी बोलत नाही कारण तेव्हढा ठामपणा नसतो. समोरचा दुःखात असला तरी पटकन अस काहीतरी बोलतात ज्याने ती व्यक्ती अजून दुखावेल कारण तेवढी empathy नसते. म्हणून चांगल संवाद कौशल्य येण्यासाठी आपल्या बोलण्यात ठामपणा म्हणजेच assertiveness असायला लागतो. म्हणजेच आपलं म्हणण समोरच्याला न दुखवता योग्य पद्धतीने सांगणे. जेणेकरून नाती चांगली होतील. संवाद कौशल्य म्हणजे थोडक्यात आपल्या मनातील विचार, भावना योग्य आणि स्पष्ट शब्दात,पद्धतीने सांगण्याची कला.
८. आंतरवैयक्तिक संबंध: आपले इतर लोकांशी असलेले नाते संबंध. जितकं आपण लोकांशी मैत्रीपूर्ण नात्याने, स्नेहाने वागू तितके आपले हे संबंध बळकट होत जातात. मदत करण्याची वृत्ती, समाज लोकांप्रती असलेली आपुलकी, समोरच्या माणसाशी कनेक्ट होण जे असत. ते याने शक्य होत. मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये हे कौशल्य तर खूप गरजेचं असते. कारण खूप सारे प्रोजेक्ट एकत्र करायचे असतात. तिथे जर हे कौशल्य नसेल तर प्रोजेक्ट वर त्याचा परिणाम होतो. तसच एक चांगल आयुष्य जगण्यासाठी देखील आपल्याला याची गरज असते. कारण अडीअडचणीला लोकच आपल्या मदतीला येतात. म्हणून आपले त्यांच्याशी चांगले संबंध असावे लागतात.
ताण व्यवस्थापन: नको असलेली किंवा आपल्याला आवडत नसलेली एखादी गोष्ट जेव्हा घडते, जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते ज्याचा आपल्याला सामना करावा लागतो तेव्हा निर्माण होतो तो ताण. ताण गरजेचा नसतो का? तर असतो. पण किती? जेवणात जितकं मीठ लागत तेव्हढा. परीक्षेचा जर अजिबातच ताण घेतला नाही तर आपण अभ्यासाचं करणार नाही आणि खूप घेतला तर कदाचित आजारी पडू. त्यामुळे कोणत्याही टोकाला न जाता मधला मार्ग काढणे म्हणजेच त्याच व्यवस्थापन करणे. ताण व्यवस्थापन जर करायचे असेल तर आपल्याला आधी आपल्या भावनांचे व्यवस्थापन नीट करता आले पाहिजे जे देखील एक कौशल्य आहे.
१०. भावना व्यवस्थापन: हे खूप महत्त्वाचे असे कौशल्य आहे. आपल्याला वेगवेगळ्या भावना या जाणवत असतात. आणि त्या आपण व्यक्त करत असतो. काही चांगल्या असतात तर काही नकारात्मक. पण हे ठरतं कशावरून? तर आपण कोणत्या प्रसंगात किती तीव्रतेने कोणती भावना व्यक्त करतो. गरजेचं नाही आपल्याला चांगली वाटणारी भावना आरोग्यदायी असेल आणि चुकीची वाटणारी अनारोग्यादयी असेल. आपण ती किती प्रमाणात व्यक्त यावर ते अवलंबून आहे. यालाच भावना व्यवस्थापन म्हणतात. सुख, आनंद या भावना चांगल्या आहेतच. पण प्रसंगानुरूप वापरल्या तर त्या चांगल्या ठरतात. म्हणजेच काय तर आपण आता जी भावना व्यक्त करतो त्याचे भविष्यात काय परिणाम होतील यावर ती भावना चांगली का वाईट ते ठरतं. चिंता जर योग्य प्रमाणात जाणवली तर ती काळजी होते. जी आपल्याला गोष्ट नीट करण्यासाठी मदत करते. आणि चिंता खूप वाढली तर मग त्याचा आपल्याला ताण येऊ लागतो. म्हणून ताण कमी करायचा असेल तर भावना व्यवस्थापन यायला लागते. आणि ते येण्यासाठी विचार नीट असावे लागतात. कारण आपल्या विचारांचा आपल्या भावना, वर्तनावर खूप प्रभाव पडतो. म्हणून विचार योग्य पद्धतीने असेल तर भावना व्यवस्थापन नीट जमते.
अशी ही जीवन कौशल्य आपल्याला समाधानी आयुष्य जगायला मदत करतात.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
