Skip to content

तुम्ही जसे आहात तसेच रहा, कोणाहीमुळे तुमचे नैसर्गिक नेचर बदलू नका.

तुम्ही जसे आहात तसेच रहा, कोणाहीमुळे तुमचे नैसर्गिक नेचर बदलू नका.


मेराज बागवान


नेचर म्हणजेच स्वभाव,तुम्ही कसे बोलता, वागता म्हणजेच तुमचे नेचर.प्रत्येकाचे नेचर निरनिराळे असते. प्रत्येकामध्ये काही ना काही वेगळे हे असतेच.काहींचे स्वभाव आपल्याला पटतात तर काहींचे पटत नाहीत.तसेच आपला स्वभाव देखील प्रत्येक व्यक्तीला पटत असतोच असे नाही.यातून अनेक वादविवाद देखील होतात.पण ह्या वेगळेपणात देखील एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, तुम्ही जसे आहात तसेच रहा, कोणाहीमुळे तुमचे नैसर्गिक नेचर बदलू नका.’नैसर्गिक नेचर’ म्हणजेच काय तुम्ही वास्तविक रित्या कसे आहात. तुमचा स्वभाव, दृष्टिकोन कसा आहे हे सगळे यात सामील असते.आणि हेच नैसर्गिकपण जपणे गरजेचे आहे. परंतु हे नैसर्गिक नेचर जपत असताना स्वतःमधील नकारात्मक नेचर मात्र प्रत्येकाने काळानुरूप बदलायला शिकले पाहिजे.

अनेक मंडळी तुमच्या आयुष्यात येत असतात.तुमचे मित्र-मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, आई-वडील असतील, मुले असतील किंवा मग जोडीदार.प्रत्येकाशी तुम्ही वेगवेगळे वागता. तुमच्यापैकी काहींचा स्वभाव खूप अबोल असतो तर काहींचा खूप बोलका स्वभाव असतो.पण अबोल व्यक्तींमध्ये खूप संयम असतो.तर बोलक्या व्यक्तीच्या मनात एक आणि बाहेर एक असे नसते.त्यामुळे ह्या अशा व्यक्तींनी त्यांचे हे स्वभाव कायम टिकवून ठेवावेत.हे त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी योग्य असते.मग कोणी म्हणत आहे म्हणून बोलायचे याला काही अर्थ नसतो आणि कोणी शांत बस म्हणून शांत बसायचे याला देखील काही अर्थ नसतो. त्यामुळे मूळ स्वभाव कुठे ना कुठे जगला गेला पाहिजे.

काहींना खूप लवकर राग येतो.पण अशा व्यक्ती खरे तर खूप भावुक असतात.कोणतीही गोष्ट त्यांच्या मनाला लगेच लागते.फरक इतकाच असतो की ते ही गोष्ट थोड्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त करीत असतात.आणि इतरांना मात्र वाटत राहते की किती रागिष्ट व्यक्ती आहे.पण खरे तर तसे नसते.अशा व्यक्तींनी त्यांचा हा स्वभाव जपला पाहिजे,पण परिस्थिती बघून हा स्वभाव नियंत्रित मात्र करता यायला हवा.

नाती जपत असताना तर अनेक अनुभव येतात.काही लोक स्पष्ट वक्ते असतात, पण समाजात ते फटकळ व्यक्ती म्हणून हिनवले जातात.मग अनेक माणसे त्यांच्यापासून दूर होतात.पण ही माणसे खरे तेच बोलत असतात.म्हणून त्यांनी हा स्वभाव जगला पाहिजे.कारण ते जे बोलत असतात ते अनेकदा खरे असते.नवरा-बायको यांचे तर स्वभाव अनेकदा विभिन्नच असतात मग ते लग्न प्रेमविवाह असो किंवा अरेंज.पण दोघांनी एकमेकांचे हे वेगळेपणच स्वीकारणे गरजेचे असते. आणि यातच सुखी संसाराचे रहस्य दडलेले असते.

तुमचा मूळ स्वभाव काहींना आवडत नाही.पण दुसरीकडे अशीही तुमच्या आयुष्यातील माणसे असतात जी तुमचा हा स्वभाव देखील स्वीकार करतात आणि तुम्हाला आयुष्यात कायम जपून ठेवतात.मग कोणाला आवडत नाही म्हणून तुम्ही तुमचे नैसर्गिक नेचर का बदलायचे? आणि जर का तुम्ही ते बदलण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही मुक्तपणे जगू शकणार नाही.तुम्ही कृती इतर जण म्हणत आहेत तशी कराल मात्र मनातून तुम्हाला ते करावे असे अजिबात वाटणार नाही.आणि मग तुम्ही आनंदी राहू शकणार नाही.

तुम्हाला आयुष्यात जे करायचे आहे, जे मिळवायचे आहे ते तुम्ही तेव्हाच मिळवू शकता जेव्हा तुम्हाला आतुन ती गोष्ट खुणावत असते.कोणाच्या सांगण्यावरून काहीच साध्य होत नाही.त्यामुळे कोणी तुम्हाला तुमच्या नैसर्गिक नेचर विरुद्ध काही करायला सांगत असेल तर तुम्ही स्पष्टपणे त्या गोष्टीला नकार दिला पाहिजे.तुमचे मन जोपर्यंत एखादी गोष्ट करण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही ती कदापि केली नाही पाहिजे.मग कोणी कितीही आग्रह केला तरी.

पण याचा अर्थ असाही नाही की तुम्ही कोणाचे काहीही न ऐकता स्वतःच्याच धुंदीत जगले पाहिजे. तुम्हाला जे आवडते ते खा,प्या.तुम्हाला जी नोकरी,व्यवसाय करू वाटतो तो करा,जिथे फिरायला जायचे आहे तिथे जा, जे छंद जोपासू वाटत आहेत ते जोपासा.पण ह्यात कोणाला दुःखी मात्र करू नका.तुमच्या जवळच्या व्यक्ती नेहमी तुमचे चांगलेच चिंतीत असतात.त्यामुळे तुम्ही त्यांना विश्वासात घेऊन तुम्हाला काय वाटते ते बोलले पाहिजे.कारण आपले आयुष्य घडविण्यामागे अनेक व्यक्तींचा हातभार असतो.आपण एकटे कधीच स्वतःचे आयुष्य घडवू शकत नाही.प्रत्येक वळणावर कोणी ना कोणी खूप काही शिकवून जाते जे आयुष्यात पुढे जाण्यासाठी गरजेचे असते.त्यामुळे स्वतःचे आयुष्य जगत असताना, स्वतःची स्पेस अनुभवत असताना जे तुम्हाला आपले वाटतात त्यांना मुळीच विसरू नका.

आणि विशेष म्हणजे ही तुमची आपली माणसे तुम्हाला काहीही झाले तरी अंतर देत नाहीत.ते तुम्हाला कधी डिस्टर्ब देखील करीत नाहीत.कारण कुठे ना कुठे त्यांनी तुमचा मूळ स्वभाव स्वीकारलेला असतो. आणि त्याचाच ते आदर करीत असतात आणि तुमच्यावर प्रेम करीत असतात.

प्रत्येकामध्ये गुण-दोष असतात.तुम्ही तुम्हाला तुमचे आयुष्य जसे जगायचे आहे तसे जरूर जगा.तुमचा मूळ स्वभाव जपा. पण स्वभावातील दोष जसे की अति एकटे राहणे, जवळच्या व्यक्तींची मने दुखावणे ह्याला मात्र वेळीच आवर घाला.कोणाला दुखावू नका.तुम्ही एखाद्यला दुखावून पुढे जाल देखील पण आयुष्यात कुठे ना कुठे तुम्हाला ही खंत कायम वाटत राहील.यामुळेच स्वतःचा स्वभाव जगता जगता इतरांचा स्वभाव देखील समजून घेण्याचा प्रयत्न करा.इतकेच या लेखातून सांगायचे आहे.

जोपर्यंत तुमचे मन एखादी गोष्ट कारणासाठी तयार होत नाही तोपर्यंत काहीही करू नका.तुम्ही जसे आहात तसेच राहा.प्रत्येकाने फक्त स्वतःकडूनच अपेक्षा ठेवावी , इतरांकडून नाही.नैसर्गिक आयुष्य जगा. ओढून ताणून कुठलीच गोष्ट करू नका.आणि कोणी ते तुमच्याकडून करून घेण्याचा आग्रह करीत असेल तर वेळीच स्पष्टपणे त्या गोष्टीविषयी व्यक्त व्हायला शिका,नकार द्यायला शिका.

आयुष्य तुमचे आहे.तुम्ही स्वतंत्र आहात. पण तितकेच जबाबदार देखील.त्यामुळे आयुष्यात काहीही करताना सर्व बाजूंनी विचार करा आणि त्याप्रमाणे आयुष्य जगा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “तुम्ही जसे आहात तसेच रहा, कोणाहीमुळे तुमचे नैसर्गिक नेचर बदलू नका.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!