Skip to content

सुखाच्या मोठमोठ्या पायऱ्यांपेक्षा समाधानाचे छोटेछोटे उंबरे जास्त आनंद देऊन जातात.

सुखाच्या मोठमोठ्या पायऱ्यांपेक्षा समाधानाचे छोटेछोटे उंबरे जास्त आनंद देऊन जातात.


हर्षदा पिंपळे


‘आनंद’ हा शब्द छोटासा असला तरी तो मिळवण्यासाठी माणूस कोणकोणत्या दिव्यातून जातो याची कल्पना न केलेलीच बरी!प्रत्येकाच्या आनंदाची व्याख्या ही निरनिराळी आहे. कुणाचा आनंद सुखात असतो तर कुणाचा आनंद समाधानात असतो.आणि कुणी छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो तर कुणी मोठ्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो.थोडक्यात,सर्वांचा केंद्रबिंदू एकच.आणि तो म्हणजे आनंद !

आता मला सांगा तुमचा आनंद कशात आहे? सुखात आहे की समाधानात आहे?छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहे की मोठमोठ्या गोष्टींमध्ये आहे?

असेल, प्रत्येकाचं उत्तर नक्कीच वेगवेगळं असेल. पण खरं सांगायचं झालं तर,आपण नं उगाचच आनंद शोधण्यासाठी जीवाची पर्वा न करता दिसेल त्या दिशेने सैरावैरा धावत सुटतो.पण मला सांगा,इतकं धावूनही तो आनंद मिळेल याची काय शाश्वती? खरंतर इतकं जीवाची तगमग करून धावण्यात काही अर्थ नाही.

आनंद हा शोधला तर आजुबाजूलाच असतो.तो आपण शोधायला हवा.प्रत्येक वेळी मोठ्या गोष्टी म्हणजेच सुखसमृद्धी असते असं नाही. मोठ्या गोष्टींमध्येच आनंद दडलेला असतो असं नाही. आयुष्यात आपल्या सभोवती असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीही कधी कधी प्रचंड आनंद देऊन जातात. पण आपण मात्र सुखाच्या मोठमोठ्या पायऱ्यांमध्येच आनंद शोधत राहतो.त्यातून आनंद मिळाला तर चांगलच आहे. परंतु यामध्ये आपण समाधानाच्या छोट्या छोट्या उंबऱ्यांना मात्र सहजच विसरतो.

असं का बरं?

प्रचंड संपत्ती, अतिउच्च प्रतिचे कपडे,चप्पल,मोठी गाडी,आलिशान बंगला,काचेची घरं,मोठमोठ्या हॉटेलमध्ये सातत्याने उठणं-बसणं,महागड्या वस्तू खरेदी करणं,सातत्याने पिझ्झा बर्गर खाणं,प्रशस्त थिएटरमध्ये मुव्हीला जाणं,सोन्या-चांदीवर प्रचंड खर्च वगैरे वगैरे.

खरं तर एकामागोमाग एक यादी वाढतच जाईल. आजकाल सुख म्हणजे याच गोष्टी अशी व्याख्या झाली आहे. आनंद केवळ या सुखामध्ये असतो अशी व्याख्या रूजताना दिसते. या सगळ्या सुखाच्या मोठ्या पायऱ्या आहेत असं नाही म्हंटलं तरी कित्येकांना वाटतं.यातून जो आनंद मिळतो तो आनंद जास्त आहे असही कित्येकांना वाटतं.पण खरचं या सगळ्या सुखाच्या मोठमोठ्या पायऱ्या तुम्हाला प्रचंड आनंद देतात? आणि केवळ सुख असण्यात काय अर्थ आहे? सुख असूनही समाधानच नसेल तर त्या सुखाचा तरी काय उपयोग? मित्रांनो, केवळ सुखी असून चालत नाही, माणसाने समाधानी असणंही तितकच महत्वाचं आहे.

या सुखाच्या मोठ्या पायऱ्या आनंद देत असतीलही पण यामध्ये समाधानाचे छोटे छोटे उंबरे कळत नकळतपणे मागेच राहतात असं वाटत नाही का?

कुणाच्या तरी चेहऱ्यावर असलेलं हसू पाहूनही आपल्याला कळत नकळतपणे समाधान मिळत असतं.कुणाच्या तरी छोट्या यशातही आपला आनंद असतो.आपल्याला त्यातूनही निराळं समाधान मिळत असतं.इतकच नव्हे तर,अंगणातील मोगऱ्याला रोज पाणी घातल्यावर कितीतरी दिवसांनी तो मोगरा फुलतो..आणि तो फुलल्यावर स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा ओसंडून वाहत असतो.इतके दिवस पाणी घातलं त्याचं काहीतरी झालं याचं समाधान तिला मिळतं.मुलांनी, नवऱ्याने टिफिन संपवला की घरच्या बाईला जे समाधान वाटतं ते बाकी कशातही नाही.

अडलेल्या नडलेल्याला आपल्याकडून मदत झाली तर त्याचही आपल्याला समाधान वाटत राहतं.एखाद्या भुकेल्या मनुष्याला चार घास प्रेमाने खाऊ घातले तरीही आपल्याला समाधान वाटतं.एखादा आपल्या उपकारांची जाणीव ठेवतो त्यातील समाधानही वेगळचं.एखाद्याचं वाईटातून काही चांगलं होत असेल तरीही ती समाधान वाटण्यासारखीच गोष्ट असते.अशा असंख्य छोट्या छोट्या समाधानाच्या उंबऱ्यांचा आपल्या आनंदामध्ये खरच खूप मोठा वाटा आहे.पण आपण मात्र याचा साधा विचारही करत नाही. आनंद शोधताना सुखाच्याच मोठ्या पायऱ्यांवर लक्ष ठेवून राहतो.समाधानाचे छोटे छोटे उंबरे मात्र दुर्लक्षितच राहतात.

मित्रांनो,कुणाचा आनंद कशातही असू शकतो हे जरी खरं असलं तरी माणसाचा खरा आनंद सुखी असण्यापेक्षा समाधानी असण्यात जास्त असतो असं वाटतं. कारण,सुखी असणं वेगळं आणि समाधानी असणं वेगळं.भौतिक गोष्टीच म्हणजे सुख नसतं.केवळ ते सुखच म्हणजे आनंद असं नाही.आज गाडी आहे तर ती गोष्ट चांगलीच आहे. आता गाडी आली की तिचा पेट्रोल किंवा डिझेलचा खर्च हा आलाच.पण रोज रोज खर्च नकोसा होतो. त्यामुळे पुन्हा चिडचिड होते.असलेलं सुख त्यावेळी मात्र नकोसं होतं.पण मग विचार करा,तरीही आपण सातत्याने त्याचाच पाठपुरावा करत राहतो.कशासाठी?

मित्रांनो, या झाल्या सुखसोयी.पण समाधानाच्या व्याख्या या खरच खूप वेगळ्या आहेत. आणि जोपर्यंत मनुष्य समाधानी होत नाही तोपर्यंत मनुष्य आनंदी असणं कठीणच. सुखी मनुष्यापेक्षा समाधानी मनुष्य जास्त आनंदी जीवन जगू शकतो.

त्यामुळेच सुखाच्या मोठ्या पायऱ्यांबरोबरच समाधानाच्या छोट्या छोट्या उंबऱ्यांवरही लक्ष ठेवा.त्यामध्येच जास्त आनंद आहे. तो वेचायला शिका.सुख येतं आणि जातं.परंतु समाधान मात्र कायमस्वरूपी आपल्या चेहऱ्यावर राहतं.आपल्या मनात त्या समाधानाच्या फुलांचा सुगंध अविरतपणे दरवळत राहतो.

आता तुम्हीच ठरवा, कुठे आणि किती धावायचं?


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “सुखाच्या मोठमोठ्या पायऱ्यांपेक्षा समाधानाचे छोटेछोटे उंबरे जास्त आनंद देऊन जातात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!