Skip to content

इथे माझं कोणीही नाही, पण मी कोणाचा तरी आहे.. म्हणून जगा !

इथे माझं कोणीही नाही, पण मी कोणाचा तरी आहे.. म्हणून जगा !


हर्षदा पिंपळे


एका फुटपाथवर एक साधारणपणे बावीस-तेवीस वर्षाचा तरुण खाली मान घालून ,पुस्तकावर डोकं ठेवून रडत बसला होता.त्याच्या वेदना,त्याच्या दुःखाची कुणालाही काहीच खबर नव्हती.येणारे जाणारे केवळ त्याच्याकडे बघत बघत पुढे निघून जायचे. एकानेही त्या तरूणाला काहीच विचारलं नाही.

कुणाला वाटलं तो पैशासाठी,भीकेसाठी वेगळं सोंग करतोय.कुणाला वाटलं तो वेडा वगैरे आहे. पण खरं तर यापैकी कोणतच कारण त्यामागे नव्हतं.आणि याचा उलगडा झाला तो एका वृद्ध मनुष्यामुळे.इतक्या गर्दीमध्ये केवळ एका वृद्धाला त्या तरूणाची विचारपूस करावीशी वाटली.त्याने सहज जाता जाता त्या तरूणाला पाहिलं.तो रडतोय हे त्या वृद्ध मनुष्याला सहन झालं नाही.त्यांनी त्या तरूणाला

“ए बाळा,उठ, रडू नको.काय झाल ? मला सांग.” असं म्हणत त्यांनी त्याला उठवायचा प्रयत्न केला. त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला.एक अर्धा तास तरी तो तरुण काही उठायला तयार नव्हता.काही बोलायला तयार नव्हता.पण तरीही तो वृद्ध मनुष्य कोणतीही लाज न बाळगता अर्धा तास तिथेच त्या तरूणापाशी बसून राहिला.आणि अर्थात त्या अर्धा तास बसण्याचा फायदा झाला.तो तरूण शेवटी उठला आणि त्याने त्या वृद्ध मनुष्याला गच्च मिठी मारली.त्या वृद्ध मनुष्याच्या कुशीत तो धाय मोकलून रडू लागला.त्या वृद्ध मनुष्यानेही त्या तरूणाला मोकळेपणाने रडू दिलं.नंतर आपोआपच तो तरूण रडायचा थांबला.

“आजोबा,Thank You! पण, मला पुन्हा कधी वाटलं तर मी या कुशीत येऊन रडू शकतो का? ” असा केविलवाणा प्रश्न त्याने त्या वृद्ध मनुष्याला विचारला.हे ऐकून वृद्ध मनुष्य पेचात पडला.त्याने त्या तरूणाला “ते आपण नंतर बोलू,आधी मला सांग तुला झालय तरी काय? असा रडत का होतास?कुणी काही बोललय का तुला?तु चांगला तरूण दिसतोय.तुझे हात-पाय चांगले आहेत.तुझा पोशाख चांगलाय.लिहीता-वाचता येतय.तु नक्कीच पैशासाठी इथे बसलेला नाही. मग मला सांग तुझं दुःखं काय आहे बाळा..?” असा प्रश्न विचारला.

“आजोबा, मी पैशासाठी नाहीच बसलो इथे.पण मी जाऊ तरी कुठे?माझं या जगात कुणीही नाही.लहानपणीच आईबाबांनी अनाथ आश्रमात सोडून दिलं.तिथे मी चार-पाच जण सोडले तर कुणालाच नकोसा होतो.सगळेच माझा राग राग करायचे.नंतर मोठा झालो.कळायला लागलं तसं आश्रमातून धूम ठोकली. शिक्षण जेमतेम बारावी झालं होतं.म्हणून कुठेतरी नोकरी शोधत भटकत राहिलो.नशीबाने छोटी नोकरी कशीबशी मिळाली.

पण नोकरीच्या ठिकाणी मी काही फार काळ टिकलो नाही. तिथेही मी कुणालाच नकोसा होतो.नंतर शहरात आलो.नवं काहीतरी शोधत राहिलो.रहायला म्हणून रूममध्ये राहिलो.तिथे मला खूप लोकांनी अक्षरशः छळलं.माझा विनाकारण राग राग केला.मला कळेनासं झालं की माझं काय चुकतय…कुठे चुकतय.अशा अनेक उलथापालथी झाल्या आयुष्यात. वाटलं आता सगळं संपलं.जगून काय करायचं हाच प्रश्न पडला.सकाळ पासून इथेच बसलोय…माझ्या दुःखाचा बाजार मांडून!”

आजोबांच्या त्या प्रश्नाला त्या तरूणाणे असं उत्तर दिलं.मग आजोबा हे ऐकून काही शांत बसले नाही.त्यांनी त्या तरूणाला खूप छान शब्दात आयुष्य कसं जगायचं,का जगायचं? याचं उत्तर दिलं.

“बाळा,कुणासाठी जगायचं म्हणजे काय..?खरच आपलं या पृथ्वीवर कुणीच नाही का?आणि इतक्यात कंटाळलास तर कसं होणार तुझं? इतक्यात कंटाळून जाऊ नकोस राजा,आयुष्यात अनेक उलथापालथी होत राहतात म्हणून काय जगण्याला कंटाळायचं?आणि इथे माझं कोणी नाही असं म्हणण्याला काही अर्थ नाही बाळा.आणि असं म्हणून तरी कसं चालेल? आपलं कुणी नाही म्हणून काय झालं?कुणासाठी तरी आपण नक्कीच असतो.आणि म्हणूनच आपण जगायचं असतं.हेच तर आयुष्य असतं.त्यावेळी जर मीही तुझ्याचसारखा विचार केला असता तर आज मीही इथे नसतो बाळा.केव्हाच आकाशात मी लुप्त झालो असतो.

मित्रा,माझ्या आयुष्यातही असचं काहीसं घडलं.मलाही माझं इथे कुणी नाही असचं वाटायचं.आणि कुणी नव्हतही.पण खरं सांगू,त्या दिवशी मी एका मुलाचा जीव वाचवला.त्याने मला “बाबा”अशी हाक मारली.त्या एका शब्दाने माझे डोळे अक्षरशः पाण्याने डबडबले. मीही त्याला तुझ्यासारखीच घट्ट मिठी मारली होती. नंतर आमच्या गप्पा झाल्या. एकमेकांच्या आयुष्याच्या कहाण्या कळाल्या.आणि त्या मुलाने शेवटी मला दत्तक घेतलं.त्या मुलाला लहानपणापासून वडील असूनही वडिलांच प्रेम मिळालं नव्हतं.पण माझ्यामुळे त्याला त्याचं हक्काचं छप्पर मिळालं होतं.आणि मलाही माझं कुणीतरी गवसल्याचा प्रचंड आनंद झाला होता. त्याक्षणी मला माझ्या असण्याची जाणीव झाली होती.आपलं कुणी नसलं तरी आपण कुणासाठी तरी असतो याचा मला अनुभव आला होता.

त्या दिवसापासून मी मागे वळून पाहिलं नाही.जगत राहिलो त्या एका व्यक्तीसाठी,जिला माझी गरज आहे.आयुष्य खूप सुंदर आहे. त्याचा अर्थ कळायला हवा.” असं काहीसं त्या आजोबांनी त्या तरूणाला सांगितलं.हे सगळं ऐकून त्या तरूणाच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं.

शेवटी त्या तरूणाच्या तोंडून “आजोबा तुम्ही खरचं ग्रेट आहात.आपणही कुणासाठी तरी आहोत आणि असतो याची जाणीव आज तुमच्यामुळे झाली.त्यावेळी तुम्ही माझ्यासारखाच विचार केला असता तर निश्चितच तुम्ही आज इथे माझ्यासाठी नसता.कदाचित!

थँक् यु व्हेरी मच आजोबा……जगण्याचा नवा अर्थ आज तुमच्यामुळे कळला.” असे उद्गार बाहेर पडले.

आजोबा आणि त्या तरूणाची सुंदर मैत्री झाली.एक नवा प्रवास त्यावेळी सुरु झाला.

तर वाचकहो,

“माझं या जगात कुणीच नाही. माझ्यावर कुणीही प्रेम करत नाही.” असे संवाद आपल्या कानावर नेहमीच पडत असतात.आणि हे संवाद कधी कधी वास्तव आहेत असचं वाटतं.कधी कधी हा संवाद आपण आपल्याशीच रिलेट करायला लागतो.मग जगायचं तरी कुणासाठी असा प्रश्नही आपल्याला सहज पडतो.पण यात अवघड असं काही नाही. या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलं तर सहजच सापडतं.अगदी वरील गोष्टीसारखचं !

फक्त ते आपण शोधायला हवं.आपलं ईथे कुणी नाही असं म्हणत न जगण्यापेक्षा आपण कुणाचेतरी आहोत असं म्हणत जगायला काय हरकत आहे?कित्येकांना माझं इथे कुणी नाही असं म्हणताना आपण पाहतो.मग किमान त्यांच्यासाठी तरी आपण जगायला हवं.आयुष्याच्या वळणावर असंख्य लोकं आपल्याला भेटत असतात.त्यांच्याही आयुष्यात वेदना वगैरे असतात.

सगळेच सगळं दुःख मोकळं करत नाहीत.म्हणून जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला.आपल्यासाठी कुणी नसलं म्हणून काय झालं आपण दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे. आपल्यामुळे कुणाचंतरी आयुष्य सहज सुंदर होत असेल तर अजून काय हवं ? यापेक्षा अजून सुंदर भावना काय असू शकते?

मित्रांनो, (आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.फुलांसाठी कुणीही नसतं, पण फुले ही सर्वांसाठी असतात आणि सर्वांना सारखाच सुगंध देतात, अगदी आनंदाने… !!-unknown )

आपणही कुणासाठी तरी जगूयात का?आपणही कुणाच्यातरी आयुष्यातील सोनचाफा, मोगरा,बकुळ होऊयात का?


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!