वाईट घडलं यामध्ये कुढत बसण्यापेक्षा आता कुठून नवीन सुरूवात करूया, याचा जास्त विचार व्हायला हवा.
हर्षदा पिंपळे
“Life is too short to start your day with broken pieces of yesterday, it will definitely destroy your wonderful today and ruin your great tomorrow! ” [ – unknown ]
सुंदर आणि अगदी आयुष्याला रिलेट होईल असेच काहीसे हे शब्द !
काल काय घडलं यामध्ये आपण आपला आजचा दिवस वाया घालवतो. इतकच नव्हे तर मित्रांनो आपण सातत्याने कालचा विचार करत राहतो आणि आजच्या दिवसाबरोबर उद्याचाही एक सुंदर दिवस असाच वेस्ट करत असतो.आयुष्य प्रत्येकाला मिळाळेलं आहे. फक्त प्रत्येकाच्या जीवन जगण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या आहेत.चांगल्या गोष्टींप्रमाणेच वाईट गोष्टीही प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचं अपयश असो,भीती असो वा कोणतही दुःख असो.यापैकी काही ना काही आयुष्यात घडतच असतं.पण तरीही ते आपण मोकळ्या मनाने स्वीकारत नाही.
आपल्याकडे जसं काही खूप सारा वेळ आहे असं वागून आपण आयुष्यात घडणाऱ्या किंवा घडलेल्या प्रत्येक वाईट गोष्टीला कोसत बसतो.वारंवार तेच दुःखं उगाळत राहतो.आतल्या आत त्याच गोष्टींमध्ये कुढत राहतो.बरं मग,असं किती दिवस कुढत रहायचं?पुढे काही आयुष्य नाही का?तेच तेच कुढत राहण्यापेक्षा काहीतरी नवीन विचार करायला हवा नं?तेच घडलं तर तेच धरून बसण्यात काहीही अर्थ नाही. याउलट काहीतरी नवीन करायला हवं हा विचार करणं आवश्यक आहे. तरच आयुष्य पुढे जाईल. नाहीतर आयुष्य पुढे कधी सरकणारच नाही.
काल अपयश आलय याचा अर्थ उद्याही अपयश येईल असं नाही. उद्या काहीतरी नक्कीच चांगलं घडू शकतं यावरही आपण थोडा विश्वास ठेवायला हवा.यावरही थोडा विचार नक्कीच करायला हवा.कालच्या घडलेल्या वाईट घटनांचा सातत्याने विचार करण्यापेक्षा काहीतरी नवीन सुरुवात कशी करता येईल याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.त्याचीच गरज ही प्रत्येकाला आहे.काल चुकलं तर चुकूद्या.आज पुन्हा नवी सुरुवात महत्त्वाची आहे हे लक्षात असूद्या.
कितीतरी छोटेमोठे प्रसंग आपल्या सभोवताली सहजपणे दिसतात.मान्य आहे की मनाला खिन्न करणारे असे प्रसंग नकोनकोसे वाटतात.सहजपणे त्या वाईट घटनांमधून एखाद्याला बाहेर पडणंही शक्य होत नाही. कितीतरी अथक परिश्रमानंतर काही व्यक्ती या त्या त्या घटनांमधून बाहेर पडत असतात. पण मग इथे गरज कशाची आहे तर या प्रयत्नांचीच!
“आपल्याला इथून बाहेर पडायचय, काल गेला,आता नवीन सुरुवात करायची आहे.” अशा विचाराला मनात खोलवर रूजवायला हवं.कारण कधी कधी कळत असूनही आपण न कळल्यासारखं वागत असतो.अशा या वागण्याला काय म्हणावं..?
मित्रांनो, कालच्या गोष्टी कधी कधी कालच सोडून दिल्या तर आयुष्यातील अनेक प्रश्न लवकर सुटतील. कालच्या प्रसंगामुळे आज आणि उद्या दोन्हीही हातून निसटतात. जगायच राहून जातं.आणि मग पुन्हा पुन्हा आपण रडत राहतो.
आयुष्य जगण्याचा उद्देश काय केवळ कालच्या वाईट गोष्टींमध्ये कुढत बसणं हा आहे का…?नाही नं?वाईट गोष्टी का घडल्या असा प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे. त्यावर चर्चा करणंही काही अगदीच चुकीचं आहे असं नाही. परंतु त्यालाही काहीतरी मर्यादा हवी.आपला संपूर्ण वेळ,आपली संपूर्ण मानसिक ,शारीरिक ऊर्जा आपण केवळ त्या एका गोष्टीसाठी खर्च करतो.परंतु त्याने मात्र काहीच साध्य होत नाही.
म्हणूनच जुन्या गोष्टींमध्ये अडकून पडू नका.कुढत बसू नका.नव्या क्षितीजाची स्वप्न सजवायला सुरुवात करा.त्या दिशेने विचार करायला पावलांना सज्ज करा.नाहीतर पुढे जाऊन आयुष्य जगायला वेळच मिळाला नाही असं म्हणण्याची वेळ यायलाही वेळ लागणार नाही.
काय मग…समजतय नं? मागचं सोडून पुढे जाणार नं?
अरे फुलपाखरू सुद्धा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जायला तयार होतं.मग आपण कोण आहोत…? ते फुलपाखरू करू शकतं तर आपणही निश्चितच नव्याने सुरुवात करू शकतो.
पहा,कुठून नवीन सुरुवात करायची आणि मुळातच नवीन सुरुवात करायची…. हा विचार करायला जमतोय का? आणि तो कृतीतही आणला जातोय का? याचा विचार नक्की करा.
शेवटी काय…सुरुवात महत्वाची असते.रडल्यावरही पुन्हा पुन्हा पावलं उचलणं गरजेचं असतं.आपल्याच पंखात पुन्हा नवं बळ निर्माण करणं आवश्यक असतं.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
