Skip to content

आपण स्वतःला दिलेली किंमत ही इतरांनी न दिलेली किंमत आपोआप दिसायचे बंद करते.

स्वतःला दिलेली किंमत ही इतरांनी न दिलेली किंमत आपोआप दिसायचे बंद करते.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


माणसाचं संपूर्ण आयुष्य हे विविध अपेक्षांनी भरलेलं आहे. एकंदरीतच आपल्या आयुष्याचा आढावा घेतला तर हे आपल्या सहज लक्षात येईल. लहान बाळाची अपेक्षा असते माझ्या आईने मला घ्यावं. मुल जरा मोठी झाली की त्यांना मोकळेपणा हवा असतो. अश्या वेळी अपेक्षा बदलते. वाटत आई बाबांनी मला खेळायला सोडावं, मला मजा करू द्यावी.

वय वाढेल तस अपेक्षा बदलतात आणि त्या नात्यानुसार बदलतात. जी अपेक्षा आपण आपल्या पालकांकडून करतो ती आपण आपल्या मित्रांकडून करत नाही. आपल्या कामाच्या ठिकाणी बॉसने मला नीट वागवाव अशी एखाद्याची अपेक्षा असू शकते. शिक्षकांनी जसं माझ्या मित्राचं कौतुक केलं तस माझदेखील करावं अस एखाद्या विद्यार्थ्याला वाटू शकत.

मी जर या व्यक्तीला जोडीदार म्हणून निवडते किंवा निवडतो आहे तर याने माझी साथ द्यावी अशी अपेक्षा निर्माण होऊ शकते. नात्यानुसार, माणसानुसार आपल्या अपेक्षा आपल्या इच्छा या बदलतात. पण या सगळ्यामध्ये एक अपेक्षा मात्र सगळीकडे दिसून येते जी आपल्याला माणूसपणाला धरून असते. ती आपल्या व्यक्तीवाशी संबंधित असते. ती म्हणजे समोरच्या व्यक्तीने, रादर सर्व माणसांनी मला किंमत द्यावी. माझ्या कामाला किंमत द्यावी.

किंमत द्यावी म्हणजे नेमक काय करावं? तर मी जे काही करत आहे किंवा केल आहे त्याची जाण ठेवून त्यानुसार वागावं. गृहिणी असेल तर तिला, तिच्या कामाला किंमत दिल्यासारखे कधी वाटेल? जेव्हा नवरा, मुल घरातली बाकीची माणसं तिच्या कामाबद्दल तिची विचारपूस करतील, जेवण केलं तर वेळेवर येऊन जेवणं, तिच्या कामात न सांगता जरा हातभार लावणं, जरा काही मागे पुढे झालं असेल तर समजावून घेण. या एका गृहिणीच्या अपेक्षा असू शकतात. एकंदरीतच आपल्या कष्टाला, आपल्या श्रमाला काहीतरी नाव असल पाहिजे. त्याची जाणीव लोकांमध्ये असली पाहिजे आणि ती असण, त्यानुसार वागणं म्हणजे किंमत देणं.

आता जोपर्यंत आपण अपेक्षा करतो तोपर्यंत हे सर्व ठीक असत. कारण आपल आयुष्यच वेगवेगळ्या अपेक्षांवर चाललेलं असत. पण जर या अपेक्षा पूर्ण होत नसतील आणि त्यातून आपल्याला जर त्रास होत असेल तर मग या फक्त अपेक्षा राहत नाहीत. हा अट्टाहास होऊन जातो. कोणता अट्टाहास? तर सर्वांनी मला किंमत दिलीच पाहिजे. माझ्याशी चांगल वागलच पाहिजे. का? कारण मला वाटत म्हणून. आणि तस नाही झालं तर काय? तर एकतर ती व्यक्ती वाईट आहे किंवा मग माझ्यातच काहीतरी खोट आहे. हे जे माझ्यातच काहीतरी खोट आहे, माझ्यातच काहीतरी कमी आहे हा विचार पुढे अनेक समस्या निर्माण करतो.

अनेक जणांना नैराश्य येण्याचं कारण हेच आहे की दुसऱ्याने केलेल्या मुल्यमापनावरून आपण आपलं मुल्य ठरवतो. स्वतःच्या क्षमतांवर शंका घेऊ लागतो. आपलीच किंमत कमी करून टाकतो. समोरच्याने आपल्याला चांगलच म्हटल पाहिजे, आपल्या प्रत्येक कामाला इतरांच अप्रूवल मिळालच पाहिजे असा जो आपला हट्ट असतो तो आपल्याला नडतो.

कारण यातून होत काय की आपण खूप काही करतोय, आपल्या सर्व जबाबदाऱ्या नीट पार पाडतोय पण फक्त समोरचा माणूस किंमत देत नाही, त्याला त्याची जाणीव नाही म्हणून आपल्याला केलेल्या कामातून आनंद मिळेनासा होतो. इतकं सर्व करून जर अस होत असेल तर हे का करावं? कोणासाठी करावं अशी दुःखाची भावना मनात निर्माण होते. आणि हे स्त्री, पुरुष दोघांमध्ये दिसून येत. फक्त कामावरून मन उडत अस नाही तर आधी म्हटल्याप्रमाणे आपला स्वतः वरचा विश्वास कमी होतो, आपणच आपल्याला काहीतरी नाव ठेवून मोकळं होतो.

पण हे योग्य नाहीये. कारण इतरांनी आपली किंमत कितीही कमी केली, आपल्याला जरी नाव ठेवली तरी आपलं मूल्य हे कमी होत नाही. कारण जगातल्या सर्व व्यक्तींच स्व मूल्य हे समान आहे. आपण माणूस आहोत हेच आपलं सर्वात मोठ मूल्य आहे जे कोणीही काहीही बोललं तरी बदलू शकत नाही. सुधारणा करायची असेल तर आपल्याला आपल्या कौशल्यांमध्ये करावी लागते.

आपलं कुठे काय चुकतय हे तटस्थपणे पाहून त्यात सुधारणा केली तर आपलं त्या कामात कौशल्य निर्माण होत. ही एकच गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं आपण स्वतःला एक माणूस म्हणून स्वीकारलं पाहिजे. आपण स्वतःची किंमत ठेवली पाहिजे. मीच जर माझा आदर करत नाही, मीच माझ्यावर प्रेम करत नाही तर दुसरा कसा करेल? ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.

जेव्हा तुम्ही स्वतःला एक गुंतागुंतीचा, चुकू शकणारा असा माणूस म्हणून स्वीकारायला शिकाल तेव्हा समोरचा आपली किंमत ठेवुदेत अगर न ठेवूदेत आपल्याला त्यातून फरक पडणार नाही. आपल्या माणूसपणात त्यात फरक पडणार नाही. माणूस हा त्याच्या अंगी असलेल्या कौशल्याने बदलत जातो. ती आपण वेळोवेळी निपुण केली तर आपण चांगला विकास होऊ शकतो. म्हणूनच समोरचा कसाही वागला तरी ती गोष्ट आपल्या संपूर्ण व्यक्तित्वावर न घेता त्यात माझं कोणत कौशल्य कमी पडत ते पाहून सुधारणे. अगदी अनेकदा ठामपणे बोलणे, स्वतःची बाजू घेणे हे ही कौशल्य कमी पडू शकत. ते पुन्हा मिळवणे अस केल तर आपण आपल्या सोबत राहू शकतो. इतकं करूनही लोक त्यांना हवं तस वागतात तर

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना

छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना

लव्ह यू जिंदगी म्हणा आणि पुढे जात रहा…


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपण स्वतःला दिलेली किंमत ही इतरांनी न दिलेली किंमत आपोआप दिसायचे बंद करते.”

  1. खरंच खूप छान लेख आहे तुमचा खूप छान वाटलं तुमचा लेक वाचून मला मध्ये खूप प्रेरणादायी भावना निर्माण झाली आपलं कुठे चुकतंय याची जाणीव झाली असेच अनेक तुम्ही आम्हाला पाठवत जा ते वाचून आम्ही नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न करू

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!