Skip to content

आपल्या अस्तित्वाचा आनंद घ्या, दुःख तर आपलीच स्वनिर्मिती आहे.

आपल्या अस्तित्वाचा आनंद घ्या, दुःख तर आपलीच स्वनिर्मिती आहे.


मेराज बागवान


‘अस्तित्व’ म्हणजे आपले ह्या जगातील स्थान, आपली प्रतिमा,आपले व्यक्तिमत्त्व आणि आपण स्वतः.विधात्याने दिलेली ही एक अमूल्य भेटवस्तू.आपण ह्या जगात का आहोत, इथे राहून काय करायचे आहे, जगायचे कसे आणि का आहे ह्या प्रश्नांची उत्तरे म्हणजे आपले ‘अस्तित्व’.आणि ह्या अस्तित्वाचा आनंद घेणे म्हणजेच खरे जगणे.पण आपण ह्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करीत असतो आणि फक्त आणि फक्त दुःखाकडे लक्ष देतो, त्याचे कौतुक करीत राहतो.

विधात्याने मनुष्य प्राण्याला अनेक वरदान दिलेले आहेत.जसे की , बुद्धी, विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता.ह्या आधारे, मनुष्य शिक्षण घेतो, नोकरी-व्यवसाय करतो, यश मिळवतो आणि समाजात आपले एक स्थान निर्माण करतो.स्वतःचे अस्तित्व निर्माण करून समाजाचे देणे पूर्ण करणे म्हणजेच मनुष्यजन्म होय.ह्या प्रवासात अनेक गोष्टी घडतात.अनेक घडना घडतात.

अनेक माणसे भेटतात.अनेक अनुभव येतात.काही सुखे मिळतात तर काही दुःखे.कधी यश मिळते तर कधी अपयश.आणि हेच जीवनाचे चक्र आहे.ह्या सगळ्यात सर्वात मोठी भूमिका बजावते ते म्हणजे स्वअस्तित्व.पण अनेकदा माणूस आयुष्याच्या ह्या प्रवासात आहे त्या क्षणाला आनंद न घेता, घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करीत राहतो आणि स्वनिर्मित दुःखे ओढवून घेतो.

आपले अस्तित्व हे फक्त दुःख दुःख करीत बसण्यासाठी नाही.प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही वाईट घडत असते, घडून गेलेले असते आणि घडणार देखील असते.दुःख आहे म्हणून तर आयुष्याला अर्थ आहे. पण म्हणून त्यातच गुरफटून किती काळ जगायचे हा एक महत्त्वाचा प्रश्न ठरतो.आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कोणती ना कोणती समस्या असतेच.असणारच आहे. पण असलेले दुःख आणखीन वाढविण्याकडेच अनेक जणांचा कल असतो.माझेच दुःख किती मोठे ह्याचे कौतुक अनेकजण करीत राहतात.कधी मनातल्या मनात तर कधी चार चौघात.आणि मग ह्या सगळ्यात अस्तित्व बाजूलाच राहते.

प्रत्येक व्यक्ती एकमेव असते.कोणाच्यातरी काही गुण असतात तर कोणाच्यात आणखीन काही चांगले गुण असतात.कोणी कलेत पारंगत असतो तर कोणी खेळत. कोणी अभ्यासु तर कोणी समाजशील.म्हणजेच काय तर प्रत्येकामध्ये काही तरी वेगळे दडलेले असते.आणि त्या आधारे ती व्यक्ती आयुष्यात मोठे यश संपादन करू शकते.स्वतःचे एक स्थान निर्माण करू शकते.आणि समाजाला देखील उपयोगी पडू शकते.आणि हेच तर खरे जगणे होय.अस्तित्वाचा आनंद घेणे होय.बाकी दुःखे तर आपले पाय खेचण्यासाठीच आहेत.

अस्तित्व म्हणजे आपण.पण याकडे लक्ष देत असताना, समाज विसरून जाता कामा नये.आपल्या जडणघडणीत समाज खूप मोठी भूमिका बजावतो.आपल्या यशात समाजातील विविध घटकांचा खूप मोठा वाटा असतो.मग ती आपल्या घरातील माणसे असोत ,मित्र असोत, शिक्षक असोत,सहकारी असोत किंवा सामाजिक जीवनातील इतर कोणतेही घटक.प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या ही सर्व मंडळी आपल्या आयुष्याला एक प्रकारचा आकार देत असतात.आयुष्याला दिशा देण्याचे काम करीत असतात.पण अनेकदा काही जण कोणाकडून तरी आलेल्या वाईट अनुभवांवरून संपूर्ण समाजाला दोष देत राहतात आणि दुःख स्वनिर्मित करून टाकतात.

आयुष्यात कोणीच कोणाबरोबर कायम नसतो.त्यामुळे जो कोणी भेटेल त्याकडून काही ना काही गोष्ट शिकून घेणे गरजेचे आहे.प्रत्येक जण आपल्या स्वभावसारखा नसतो, आपले विचार त्यांचे विचार जुळतीलच असे नाही.पण प्रत्येकजण अमूल्य असतो.त्यामुळे स्वतःचे अस्तित्व जपताना इतरांचे देखील अस्तित्व स्वीकारले पाहिजे.त्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे.प्रवास तर कायमचा नाही पण तरी देखील कुठे तरी एक प्रकाराचे बंध टिकवून ठेवले पाहिजेत.या साठी गरज असते ती स्वतःचे आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये गरजेचे बदल करण्याची.आणि जेव्हा माणूस स्वतःला बदलेल तेव्हा तो खऱ्या अर्थाने स्वतःचे आणि इतरांचे अस्तित्व जाणून घेऊ शकेल.आणि मग दुःखाशी दोन हात करायला सज्ज असेल.

आपले यश आणि संपूर्ण अस्तित्व निर्माण होण्यामागे अनेक जणांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या पाठिंबा असतो.त्यामुळे मनात ‘कृतन्यतेची’ जाण ठेवणे खूप गरजेचे आहे.आणि हे ‘ग्र्याटीट्युड’ असेल तर अस्तित्वाचा आनंद पुरेपूर घेता येईल.दुःख हे आयुष्यातील सत्य आहे.त्यामुळे दुःख स्वीकारता आले पाहिजे.

जीवनात जे जे काही वाईट, नकारात्मक घडत असते त्यामागे काही ना काही कारण असते.एखादी दुसरी चांगली गोष्ट घडणासाठी ते दुःख घडणे गरजेचेच असते आणि त्याशिवाय आयुष्याच समतोल साधला जात नाही. त्यामुळे जेव्हा कधी तुमच्या किंवा इतरांच्या आयुष्यात दुःख येते तेव्हा त्याचे फार लाड करीत न बसता ,त्यातून धडा घेऊन आयुष्यात पुढे जाणे गरजेचे असते.

आयुष्यात घडणाऱ्या, अनुभवास येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा मनमुराद आनंद घ्या.भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्ती बरोबर प्रवास करा,जे आपल्या साठी आहेत ते शेवटपर्यंत साथ देतील, जे आपल्या साठी नाहीत ते एखाद्या ‘थांब्यावर’ थांबतील आणि आपला त्यांच्याशी असणारा प्रवास देखील थांबेल.फक्त वास्तव स्वीकायला हवं.यश मिळाले तर आनंद घ्या, अपयश मिळाले तर धडा घ्या.सुख आले तर नाचा ,दुःख आले तर पचवा.स्वतःची ध्येये मिळवा. आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करता करता समाजाचे एक घटक बनून मात्र जरूर जगा.एकांत जरूर अनुभवा, पण आपल्यांना विसरून नाही.

दुःख स्वनिर्मित आहे.आणि ते दूर करायचे असेल तर आपल्या अस्तित्वाचा आनंद घ्या आणि आयुष्य सोपे करा.आणि मुख्य म्हणजे वर्तमानात जागा आणि त्याचा मनमुराद आनंद घ्या.कारण ‘आताचा क्षण माझा आहे’ आणि तोच जगा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!