Skip to content

खरंच ‘लाल’ बॉटल पाहून कुत्री घाबरतात का?? यामागचं मानसशास्त्र काय??

लाल बॉटल


मनोज लेखनार


काही दिवसांआधी सालासार मंदिरात गेलो असता मुख्य प्रवेश द्वारासमोर कुंकवाचे पाणी भरलेल्या बऱ्याच लाल बॉटल ठेवलेल्या दिसल्या. तिथल्या सुरक्षा रक्षकाला विचारले असता त्याने कुत्र्यांपासून सुटका करून घेण्यासाठी प्लास्टिक बॉटल मध्ये कुंकवाचे लाल पाणी भरून त्या बॉटल ठेवल्याचे सांगितले.

दर्शन करून बाहेर आलो असता त्याच बॉटल भोवती कुत्रे खेळताना दिसली. त्या नंतर ही बऱ्याच ठिकाणी असे प्रकार पाहण्यात आले. बरेच जण याला शास्त्रीय आधार असल्याची पुष्टी करतात तर काही जण याची अंधश्रद्धा वा मेंढी पळण म्हणून खिल्ली उडवतात. खरेच असे होत असेल का???? खरंच कुत्रे त्या बॉटल ला घाबरत असतील का?? की हा ही अफवेचा प्रकार आहे? मुळात कुत्री त्या बॉटल ला का घाबरतील हा प्रश्न मला पडतो? शेतात पाखरांना घाबरवण्यासाठी बागुलबुवा लावला जायचा हे लक्षात येते कारण पाखरांना तो बागुलबुवा शेतकरी असल्याचा भास होत असावा. आता तो ही प्रकार कालबाह्य झालाय.

एखादी नवीन वस्तू दिसल्यानंतर माणूसही त्या वस्तूला पाहून घाबरतो. त्याचप्रमाणे कुत्रीही त्या बाटल्यांना किंवा त्यातील लाल रंगाला पाहून घाबरत असावेत.पण इथे या प्रकारात कुत्र्याला कशाचा भास होत असावा? कारण बॉटल प्लास्टिक ची असल्यामुळे तिला अथवा कुंकवाच्या पाण्याला वास नसतो. असला तरी तो इतका तीव्र नसतो की त्यामुळे कुत्रा पळून जाईल आणि विज्ञानाच्या मते माणूस जसे इंद्र धनुषातले सातही रंग पाहू शकतो तसे कुत्रा पाहू शकत नाही अथवा त्याची रंग पाहण्याची मर्यादा कमी आहे.

जो रंग आपल्याला गर्द लाल( red)दिसतो तो त्याला काहीसा तपकिरी(sort of brown ) दिसतो. त्यामुळे हाही प्रश्न निकालात निघतो. मग ह्या प्रकारा चा शोध लागला कसा व त्याला आधार काय? आणखी खोलात गेल्यावर या प्रकारा बाबतीत बऱ्याच “लोक”प्रिय दैनिकात बातम्या दिसल्या. त्या बातम्या केवळ मनोरंजनात्मक पद्धतीने, चर्चा होईल वा वर्तमान पत्राचे रकाने भरल्या जातील अश्या रीतीने लिहिण्यात आले होते त्यात कोणत्याही तज्ञाचे मत घेण्यात आलेले नव्हते. उलट बातमी ‘चटपटी’ कशी होईल याचाच जास्त विचार करून छापण्यात आली होती. हा प्रकार पसरवण्यात माध्यमाचा ही मोठया प्रमाणात वाटा आहे. कारण जो प्रकार मला माझ्या भागापर्यंत मर्यादित वाटत होता त्याचे लोण सम्पूर्ण महाराष्ट्र भर पसरल्याचे दिसून आले. आणि असा प्रकार चालू असून याची कोणीही शास्त्रीय दृष्ट्या पुष्टी करत नाही अथवा ती खोडून काढत नाही याचेही नवल वाटते.

हा प्रकार काही दिवसांनी बंद सुध्दा होईल अथवा काही वर्षांनी पुन्हा सुरु पण होईल. असले प्रकार फायदा नाही तर किमान तोटा पण नाही, करून पहायला काय हरकत आहे या तत्वामुळे चालू राहतात. ‘करून पहायला काय हरकत आहे??’ या वृत्ती मुळे आज एकविसाव्या शतकात ही शेकडो अंधश्रद्धा आपण पाळतोय. हे सर्व याच वृत्ती चा परिपाक होय. जो पर्यंत ही ‘वृत्ती ‘ मोडीत निघत नाही तो पर्यंत असे अनेक प्रकार आपण ‘करून पाहणार आहोत’. कारण आपल्यात असलेली प्रश्न विचारण्याची जन्मजात चिकित्सक वृत्ती घर, शाळा आणि समाजात मारून टाकण्यात येते, तिचा निर्दयी पणे खून करण्यात येतो. आणि मग उरतो तो केवळ ‘करून पहायला काय हरकत आहे ‘या वृत्तीचा अंध अनुयायी.

‘लाल बॉटल’ हा प्रकार जर विज्ञानाच्या कसोटीवर खरा उतरत असेल तर आपण त्याला सकारण स्वीकारु पण तो पर्यंत आपण त्याला तीव्रतेने नाकारुया.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

3 thoughts on “खरंच ‘लाल’ बॉटल पाहून कुत्री घाबरतात का?? यामागचं मानसशास्त्र काय??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!