प्रेम आणि माया न मिळत असलेली माणसं आणि त्यांची मानसिकता!
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
‘प्रेम’; जगात क्वचितच किंबहुना नसल्यात जमा अशी एखादी व्यक्ती असेल ज्याला हा शब्द माहीत नाही. ज्याला ही जाणीव, ही भावना, ही गरज माहीत नाही. अगदीच क्वचित असेल हे! पण त्यालादेखील काही शरीरशास्त्रीय, मानसशास्त्रीय कारण असू शकतील. सामान्य माणूस त्याला ही भावना कधी जाणवली नाही अस होणार नाही. अब्राहम मेस्लोच्या गरजांच्या वर्चस्व श्रेणीमध्ये प्रेम, नाती, बांधिलकी ही गरज दिलेली आहे. कारण ही एक वैश्विक भावना आहे.
नवजात बालक देखील सगळयात आधी या जगात आल्यावर आपल्या आईची कुस शोधत. कारण आईच्या कुशीत जी माया, जे प्रेम, जो जिव्हाळा असतो तो जगातल्या कोणत्याही गोष्टीत असू शकतं नाही. इतकं प्रेम, मायेचं महत्त्व आहे. प्रेम म्हणजे फक्त मुलगा, मुलगी एकत्र येणं, त्यांनी सोबत राहणं नाही. ते फक्त या दोघांपुरत मर्यादित नाही. जसं मैत्री ही सर्व नात्यांमध्ये गरजेची आहे, जशी ती सर्व नात्यांमध्ये असते तसच प्रेम हे कोणत्याही नात्याचा एक पाया आहे.
जर आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल प्रेम नसेल, माया नसेल तर आपण त्याच्यासोबत राहत तर असू, बोलत तर असू पण त्यात एक प्रकारचा कोरडेपणा जाणवत राहील. अनेक जणांना प्रेम म्हणजे फक्त शारीरिक जवळीकता, छान छान बोलण, एकत्र राहण इतकच आहे अस वाटत. पण प्रेम इथपर्यंत मर्यादित नाही. ते त्याच्या पल्याड आहे. एखाद्या विशाल समुद्रसारखी आहे. वर वर समुद्राच्या लाटा दिसतात पण खोलवर गेल्यावर आतली वेगवेगळी रत्न दिसतात.
तसच प्रेमाच आहे. यात आधार असतो, विश्वास असतो, बांधिलकी असते, धीर देण्याची क्षमता असते. म्हणूनच अगदी काहीच नसलेला व्यक्ती जवळ प्रेमाच माणूस असलं तरी धीराने प्रत्येक गोष्टीचा सामना करतो. तेच सगळ्यातल सगळं कमावलं तरी एकटाच आहे. माझं म्हणून म्हणणार कोणी नाही अशी व्यक्ती श्रीमंत असून गरीब असते. शेवटी माणूस इतके कष्ट करतो, इतकं कमावतो ते कोणासाठी? कुटुंब म्हणून जी काय संस्था अस्तिवात आहे त्याचा मुख्य हेतू हाच आहे की माणसाला एकट वाटू न देणं. माणसाला जितकी प्रेम, माया मिळते तितका तो आतून भक्कम होत जातो. पण अस सर्वांच्या बाबतीत होत नाही. अस असत तर जगात कोणत्याच समस्या उद्भवल्या नसत्या, कोणतेच आजार निर्माण झाले नसते.
अशी अनेक लोक आपल्या आजूबाजूला असतात ज्यानं लहानपणापासून प्रेम, जिव्हाळा, आपुलकी हे माहीतच नसत. त्यांना ते अनुभवायला मिळालेलं नसत. आई वडिलांपैकी कोणाकडूनही जवळीक न मिळणं, त्यांचा सहवास जास्त न लाभणे, लहानपणी सावत्रपणा वाट्याला येणं अस बऱ्याचदा होत. मोठ झाल्यावरही अस होत की काही माणसं प्रेमाला, मायेला मुकतात. सतत परकी वागणूक मिळत असते. आपली असणारी माणसं पण अनोळखी आल्यासारखी वागतात.
आता जे प्रेम, जी माया माणसाला भक्कम बनवत तेच न मिळाल्याने माणूस काय होणार? तो मनाने कमकुवत होतो. कारण प्रेमात असलेला एकप्रकारचा विश्वासच मिळत नाही. एकटेपणाची भावना मनात निर्माण होते. आपलं म्हणून कोणाही नाही ही भावना खूप दुःख देणारी असते. अशी माणसं नेहमी प्रेमाच्या एका शब्दाला, स्पर्शाला आसुसलेली असतात. त्याच्यासाठी ती काहीही करतात. आणि इथेच अनेकदा धोका मिळण्याचा संभव असतो.
कारण समोरचा माणूस करा प्रेमाने बोलला, करा विश्वास दाखवला तरी तो आपला वाटू लागतो आणि त्याच्यासाठी या व्यक्ती काहीही करायला तयार होतात. ज्यातून अनेकदा गैरफायदा घेत जातो. चिंता, नैराश्य यासारख्या आजारांना बळी पडतात. नैराश्याने मध्ये तर व्यक्तीला कोणाकडूनच आशा नसते. ना स्वतःकडून, ना दुसऱ्याकडून, ना परिस्थितीकडून. इथे वास्तवात पण असच झालेलं असते की मायेचा हात फिरवणार कोण नसत. या गोष्टीचा माणसाच्या मनावर प्रभाव पडतो.
सगळीकडे सगळं आहे तरी नाही अशी ही एक अवस्था असते. जे काय करत आहोत ते सर्व व्यर्थ वाटू लागतं. कारण आपलं यश, आपलं अपयश सांगायला आपल्याला कोणतरी हवच असत. तस कोणी आपल्या आयुष्यात नसेल तर दुःख होऊच शकत. आपण येताना एकटे येत असतो जातानाही आपण एकटेच जाणार. मधल हे जे आयुष्य आहे त्यात मात्र आपल्याला अनेक अनुभव अनेक माणसं अनेक जाणीव मिळत जातात. त्यातूनच आपण समृध्द होत जातो.
अश्यामध्ये जर हा एकटेपणा आला तर हे आयुष्य नकोस वाटत. निरस वाटत. आणि अस वाटू शकत कारण आपण शेवटी माणसं आहोत. यांत्रिक रोबोट नाही. आपल्याला मन आहे. पण माणसाने हे लक्षात घेतले पाहिजे की या सर्व गोष्टी आपल्याला बरेच काही शिकवून पण जातात. ठीक आहे आपल्याला समोरून प्रेम नाही मिळत, माया नाही मिळत. पण म्हणून त्यासाठी आपलं सर्वस्व देणं बरोबर नाही. उलट आपण आधी आपल्यावर प्रेम करायला शिकलं पाहिजे.
या एकटेपणाला एकांतात आपल्याला बदलता आलं पाहिजे. एकटेपणात आपल्याला कोणाची तरी गरज असते. तो नाईलाजाने आलेला असतो. पण एकांत तो मात्र आपण स्वतः निवडलेला असतो. त्यावेळी आपल्याला स्वतःची सोबत करायची असते. हा एकांत शोधायला शिका. दुसऱ्या कोणामुळे आपल आयुष्य संपवणं हे तर्काला धरून असत नाही. कारण आपल आयुष्य हे एकदा गेलं की ते दुसरा तर नाहीच पण आपण स्वतः पण मिळवू शकत नाही.
आपल्याला मायेची, प्रेमाची गरज असते आणि ती असणारच आहे पण ती पूर्ण नाही झाली म्हणून जीवन निरस करून टाकण्याची गरज नाही. निसर्गावर प्रेम करा, स्वतः वर प्रेम करा, ही जाणीव स्वतः मध्ये रुजवा. जग तुमच्यावर प्रेम करू लागेल.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
लेख आवडला