Skip to content

“आपला फोकस विचलित करणाऱ्या या १० गोष्टी लक्षात असू द्या.”

“आपला फोकस विचलित करणाऱ्या या १० गोष्टी लक्षात असू द्या.”


मधुश्री देशपांडे गानू


माणसाचं मन ना! फार चंचल असतं. एका जागी स्थिर फार काळ नाहीच रहात. तरीही अगदी लहानपणापासूनच आपल्याला मनाची एकाग्रता, आपलं लक्ष्य, आपला फोकस असे वाक्प्रचार ऐकू येतात. विशेषतः एकदा का शालेय शिक्षणाची सुरुवात झाली की हे सगळं सुरू होतं. आणि बरोबरच आहे म्हणा.. कोणतीही गोष्ट शिकणं, पूर्णपणे आत्मसात करणं, न चुकता ती गोष्ट करणे यासाठी तुमच्या मनाची सर्वप्रथम तयारी असायला लागते. तरच त्यासाठी लागणारे अंतर्बाह्य कष्ट, मेहनत, प्रयत्न तुम्हीं करू शकता. यशस्वी होऊ शकता.

तुम्हांला नक्की काय करायचं आहे? कसं करायचं आहे? याचा फोकस पक्का तयार हवा. नाहीतर बरेचदा होतं काय की मन संभ्रमावस्थेत असतं. नक्की आपल्याला काय जमेल? हेच कळत नाही. मग फोकस हलतो. कित्येकदा वेगळ्याच विषयाची आवड असतानाही मुलं, मुली इंजिनिअर, डॉक्टर होतात. स्वतःची आवड, मनाजोगते क्षेत्र निवडायला मनातील विचार अत्यंत सुस्पष्ट हवेत. फोकस पक्का हवा. बाह्य अडचणी आणि कारणांनी हा फोकस विचलित होता कामा नये. तरच आपण ठरवलेलं उद्दिष्ट पूर्ण करू शकू.

उदाहरणार्थ, लहान मुलं घरात अभ्यास करत असताना मोठ्या माणसांनी टीव्ही लावला तर त्यांचे लक्ष विचलित होतं. किंवा कार्यालयात ठराविक वेळेत एखादं काम पूर्ण करायचं असतं पण घरचं वातावरण बिघडलेलं असेल तर कामातील फोकस हलतो. माणसाचं मन नकारात्मक गोष्टींकडे, कारणांकडे जास्त ओढलं जातं. आपलं लक्ष विचलित होण्याकरता क्षुल्लक कारणही पुरतं. मग आपण काहीही सबबी देतो. “कारण मनाची चंचलता”

कोणतीही लहान मोठी गोष्ट, एखादं काम, आवडता छंद करताना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला विचलित करू शकतात ते आता पाहू.

१) मुळात आपला फोकस विचलित होण्यास आपलं मन जास्त कारणीभूत असतं. मनातील विचारांची बैठक ठाम नसणे हे पहिलं कारण आहे. ही संपूर्ण पणे आपली जबाबदारी आहे.

२) बहुतेक वेळा आपण आपला फोकस निश्चित ठेवून काम करत असतो. पण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांच्या वागण्याचा स्वतःला त्रास करून घेतो. तुम्हांला नाउमेद करणारी माणसंच जास्त असतात, हे लक्षात ठेवा. पण त्यांच्या वागण्याचा आपण जास्त विचार करतो. आणि इथेच आपला फोकस हरवून बसतो.

३) एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचे धोके ओळखा. अगदी लहान मुलांकडेही हल्ली सेलफोन असतात. अभ्यास करताना, कार्यालयात काम करताना किंवा अगदी एखादा आवडता छंद जोपासतानाही आपण एकाग्रतेने करतो का?? सतत फोन वाजणे, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप कितीतरी गोष्टी आहेत ना मनाची एकाग्रता ढळायला!! अशावेळी तुम्हीच ठरवू शकता काय करायचं ते..

४) तुमचं लक्ष विचलित झालं तर तुमचा मेंदू default mode वर जातो. पुन्हा तेच काम तेवढ्याच एकाग्रतेने करण्यासाठी तुम्हांला दहा ते अठरा मिनिटांचा अवधी लागतो. म्हणजे वेळेचा अपव्यय होतोच पण कामाचा दर्जाही कमी होतो.

५) तुमचा मूड.. मान्य आहेच की मानवी भावना असणारच. रोज घडणाऱ्या बर्या वाईट घटनांनी तुम्हीं आनंदी दुःखी होणारच. कोणतेही काम करताना तुमच्या मनाची एक अवस्था असणारच. पण जर तुमचा मूड खराब असेल किंवा तुमच्या नकारात्मक भावना तुम्ही स्वतः बरोबर वागवत असाल तर मात्र तुमचा फोकस विचलित होणारच.

६) तुम्ही कामाच्या ठिकाणी, शाळेत, आवडीचं काम छंद करताना कोणत्या व्यक्तींच्या सानिध्यात येता हे महत्त्वाचं आहे. जिथे टीम वर्क गरजेचं आहे तिथे लक्ष केंद्रित होण्यास अडचणी येऊ शकतात. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. ते तुम्हांला त्यांच्या वागण्याने विचलित करू शकतात.

७) जेव्हा तुम्हीं स्वतःच्या शरीराची, आरोग्याची संपूर्ण काळजी घेत नाही, तेव्हा तुम्ही लवकर थकता. तुम्हीं सतत आजारी पडता. तुमचा स्टॅमिना कमी असतो. अशावेळी कामाच्या ठिकाणी तुमची एकाग्रता विचलित होऊ शकते.

८) काम महत्त्वाचं आहेच. पण स्वतःपेक्षा महत्त्वाचं नक्कीच नाही. पौष्टिक अन्न, वेळेवर आवश्यक तेवढी झोप हे अत्यंत गरजेचे आहे.

९) स्वतःसाठी नियम तयार न करणे स्वतःवर काही बंधन न घालणे , स्वयंशिस्त नसणे यामुळे तुमची एकाग्रता विचलित होऊ शकते.

१०) तुमचे वैयक्तिक नातेसंबंध, त्यातील चढ-उतार, वैयक्तिक अडचणी यांचा मनावर ताण असेल तर तुमचा फोकस विचलित होण्याची शक्यता नक्कीच वाढते.

अशी अनेक कारणं आपल्याला देता येतात. पण मग फोकस कायम ठेवण्यासाठी नक्की काय करायचं? अनेक बाह्य कारणं आणि अंतर्मनात चाललेली आंदोलनं अशा गोष्टींनी मनाची एकाग्रता ढळू शकते. सर्वात प्रथम मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे. ध्यानधारणा, योगासने हे सर्वात उत्तम उपाय आहेत. आपल्या कामाचा व्यवस्थित प्लॅन लिहून तयार ठेवायचा. म्हणजे आपला फोकस निश्चित होतो. कामाच्या ठिकाणी फोन, टीव्ही अशा गोष्टी आवर्जून बंद ठेवायच्या.

स्वतःचा कम्फर्ट झोन तयार करा. आवडणारे कपडे, म्युझिक, आवडती जागा निवडा. छोटी छोटी उद्दिष्टं ठरवा. स्वतःच्या आरोग्याची नीट काळजी घ्या. स्वतःचा फोकस ठेवून काम पूर्ण केल्याबद्दल स्वतःलाच बक्षीस द्या. विरंगुळा शोधा. लांब वर फिरणे, मित्र-मैत्रिणींशी गप्पा, खेळ असं काहीही.. सकारात्मक व्यक्तींच्या सानिध्यात रहा. अशा अनेक गोष्टींनी मनाची एकाग्रता नक्कीच वाढते. आणि आपला फोकस कायम राहतो. कामं तर वेळेत पूर्ण होतातच. पण मनाचं समाधान फार मोठं असतं..


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!