Skip to content

“विवाहबाह्य संबंध… माणसांना उभारी देणारे संबंध!”

“विवाहबाह्य संबंध… माणसांना उभारी देणारे संबंध!”


सुधा पाटील

(लेखिका, समुपदेशक)


अनेक सामाजिक विषयांवर लेख लिहिल्यानंतर काही वाचकांनी कमेंट्स मध्ये सांगितलं की,तुम्ही विवाहबाह्य संबंध यावर लिहा.आम्हाला तुमचे विचार ऐकायचे आहेत.खर तर मीही खूप दिवस झाले यावर लिहू की नको या संभ्रमात होते.कारण “विवाहबाह्य संबंध…” हा लोकांचा एक चघळण्याचा किंवा तो एक भयानक गुन्हा आहे असा शिकामोर्तब झालेला विषय आहे.

पण जेव्हा मी लग्न ही संस्था जवळून पाहते किंवा तीची यशस्वीता बघते तेव्हा मला एकच विधान करावसं वाटत,… “संबंध महत्वाचे असतात… मग ते वैवाहिक असोत अथवा विवाहाशिवाय निर्माण झालेले असतो.” तिथे फक्त एकमेकांविषयी आदर हवा,विश्वास हवा,प्रेम हवं आणि त्या नात्याविषयी निष्ठा हवी.जर वाटलंच आपण आता एकत्र राहू शकत नाही, तर अशा वेळी खरेपणाने स्पष्ट बोलून ते नातं थांबवण्याचा प्रांजळपणा हवा…..

जवळजवळ साठ ते आठ वर्षांपूर्वी एका महिलेचा लेख वाचला होता…”विवाहबाह्य संबंध… माणसांना उभारी देणारे संबंध!” तो लेख खूप सुंदर उदाहरणे देऊन तीने त्या विषयाचं विवेचन केलं होत. आणि ते योग्य आणि सहज पटणारं होतं. जगण्यासाठी छान,प्रेमळ संबंध, सहजीवन माणसाला हवं असत. पण हे असे संबंध लग्नानंतर निर्माण होतीलच असं नाही.

कारण लग्न संबंध कसे जुळतात हे तर सर्वांना ठाऊकच आहे. लग्नानंतर दोन जीवांचे संबंध सुंदर, सहजीवनास पुरक निर्माण होत असते तर ,समाजात घटस्फोट, दांपत्य जीवनात संघर्ष दिसलाच नसता….

मुळात प्रत्येक व्यक्तीच्या जगण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात.त्यामुळे आपणास काय योग्य वाटतं….काय अयोग्य वाटतं याला महत्त्व नुसतंच. कारण ज्याला जे योग्य वाटतं तसंच जो तो जगत असतो. त्यामुळे महत्त्व हे विवेकी,सुदृढ अशा संबंधांना असत. याचं आजकालच उदाहरण म्हणजे आजकालच्या पिढीचा लिव्ह इन रिलेशनशिप कडे वाढणारा कल! कारण लग्न ही संस्था स्थिर,एकमेकांना आदर,प्रेम देईल असे संबंध निर्माण करु शकत नाही….

आज समाजात एकीकडे लग्न होऊनही,वर्षानुवर्षे एकत्र राहुनही एकमेकांच्या जीवावर उठलेले संबंध आपण पाहतो…तर दुसरीकडे केवळ मैत्रीपोटी,एकमेकांचे विचार जळून एकत्र आलेल्या संबंधात एकमेकांची काळजी, एकमेकांना जपण दिसतं.तिथे केवळ भौतिक गोष्टींपेक्षा मानसिक गोष्टींचा विचार जास्त केला जात असावा. मी एक लेखिका, समुपदेशक या नात्याने अनेकांशी ,अनेक विषयांवर बोलत असते.त्यांची मते जाणून घेत असते.

असंच एकदा वीस ते पंचवीस वयोगटातील मुलींशी लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशिप याबद्दल बोलले. जवळपास ९५ टक्के मुलींनी हेच सांगितले की, माझ्या आईने लग्नानंतर मन मारुन तडजोड केली. तीची हुशारी असूनही ती कधी स्वतंत्र विचाराने जगलीच नाही. त्यामुळे तेच पुन्हा आमच्या बाबतीत घडेल म्हणून लग्नाची भीतीच वाटते. त्यापेक्षा शहरातील मुलंमुली लिव्ह इन रिलेशनशिपला जास्त महत्त्व देताना दिसतात.

ग्रामीण भागातील मुलींना हे पटल तरीही त्या घरच्यांच्या विरोधात जाण्याचं धाडस दाखवू शकत नाहीत. पण आज आपण एकविसाव्या शतकातील बदल हे मान्यच करावे लागतील. कारण जो बदलाप्रमाणे बदलतो तोच टिकतो. तो विरोध करतो तोच संपून जातो.कारण बदलाचा वेग हा बदलत्या काळाप्रमाणेच जास्त असतो.मुळात आपल्या भारतीय लोकांचा वेळ स्वत:ची प्रगती करण्यापेक्षा इतरांच्या आयुष्यात काय चाललंय याकडे बघण्यातंच जातो.

पण आपल्या चष्म्यातून जगाकडे बघण्याचा आपणास काहीच अधिकार नसतो. कारण व्यक्ती स्वातंत्र्य हे कायद्याने मान्य केलं आहे.त्यामुळे कोणावर आपण आरोप करुन काहीच उपयोग नसतो.कारण जगातल्या प्रत्येक व्यक्तीच आयुष्य, आयुष्याची ठेवण,अडचणी,अनुभव हे भिन्न असतात. ज्याचं जसं आयुष्य ,तसं तो निर्णय घेत असतो.त्यामुळे आपण एकमेकांना आपल्या नजरेतून पाहणं आधी बंद करायला हवं.ज्याच आयुष्य… त्यानं त्याच्या नजरेतून जगावं!

म्हणूनच जगताना…. एकमेकांना पूरक संबंध महत्वाचे असतात. ते कसे याला इतरांनी तपासू नये.कारण ते संबंध जोडणाऱ्यांना योग्य वाटत असतील, त्यांना ते जगताना आनंद देत असतील तर ते त्यांच्यासाठी योग्यच असतात. आणि शेवटी जगणं हे स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी असत. आणि जगातला प्रत्येक माणूस तेच करत असतो. याला कदाचित काही अपवाद असू शकेल.पण माणूस स्वानुभवातून स्वत:ची जगण्याची एक पद्धती ठरवतो….आणि जगत राहतो. हे अगदीच नैसर्गिक आहे….असो…शेवटी ज्याचा चष्मा जसा….तसंच तो पाहिल….


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

6 thoughts on ““विवाहबाह्य संबंध… माणसांना उभारी देणारे संबंध!””

  1. व्यक्तिगत जीवन जगण्याचा स्वातंत्र्य जरी कायद्याने मान्य केलेला असला तरी समाजातील मनुष्य ही संकल्पना त्यात महत्त्वाची आहे. विवाहबाह्य संबंध हे काळाची गरज नाहीये पण वैवाहिक जीवन जगताना स्त्री-पुरुष मग ते कार्यालयात काम करणारे असो किंवा आजूबाजूला रहिवास परिसरात राहणारे असो एकमेकांचे शुद्ध प्रेम आणि आपुलकी या नात्याने एकमेकांचे चांगले उत्कृष्ट मित्र बनू शकतात हे वैवाहिक जीवन आणि सामाजिक जीवन दोघींना पूरक आहे . एकमेकांविषयी तयार झालेले निकोप संबंध समाजासाठी आणि वैयक्तिक जीवनासाठी आदर्श व्रत आहे. पहिले आपण हा विचार केला पाहिजे की आपल्या आई-वडिलांनी जर असे विवाहबाह्य संबंध निर्माण केले असते तर आजच्या समाजात तुम्ही आपण जगत आहोत तो एक नितीमूल्य हरवलेला समाज जगापुढे उभा असता.

  2. आपले विचार उदाहरण सह दिले ते पटतात ,परंतु तरीसुद्धा हे योग्य वाटत नाही ,यामुळे कुटुंब उद्धवस्त झालेली ,वाताहत झालेली आपण पाहतोय , हा हेच जर तेवढे वेळेपुरते असेल तर ठीक ,परंतु परिवाराकडे परिवारिक कर्तव्य धर्म सोडून असेल तर हे ठीक नाही असे वाटणे सजिकच आहे!!

    🙏

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!