प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरच्यांकडून, नातेवाईकांकडून जोडीदाराकडून या निरर्थक अपेक्षा ठेऊ नये.
मेराज बागवान
अपेक्षा….अपेक्षा….अपेक्षा, प्रत्येकाच्या काही ना काही, कोणाबद्दल ना कोणाबद्दल असतातच.त्यात वेगळे असे काही नाही.किंवा चुकीचे असे देखील काही नाही.पण ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतातच असे नाही.काही अपेक्षा पूर्ण होतात तर काही होत नाहीत.अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की माणूस दुःखी होतो.पण खरे तर काही अपेक्षा पूर्ण न होण्यामागे काही गोष्टी कारणीभूत असतात.तर कधी त्या अपेक्षा निरर्थक असतात.तर अशाच काही अपेक्षांबद्दल आपण चर्चा करणार आहोत ज्या, प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरच्यांकडून, नातेवाईकांकडून आणि आपल्या जोडीदाराकडून ठेवू नये.
१) मनातील ओळखणे – काही वेळेस काही व्यक्तींची अशी अपेक्षा असते की , समोरच्या व्यक्तीने माझे म्हणणे,माझे विचार,माझे मत काय आहे हे न सांगता ओळखावे.माझ्या पतीने किंवा पत्नीने मला काय हवं नको ते न सांगताच ओळखावे.ही अगदी निरर्थक अपेक्षा आहे.कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते.त्यामुळे ही अपेक्षा धरणेच निरर्थक आहे.
२) नेहमी उपलब्ध असणे – नातेवाईक , आप्तेष्ट, मित्र बरेच असतात.त्यांच्या बाबतीत काही जणांना वाटत असते की त्यांनी नेहमी माझ्यासाठी उपलब्ध असावे.जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा लगेच धावून आले पाहिजे.पण प्रत्येक वेळी हे शक्य नसते.प्रत्येकाला आपल्या अडी-अडचणी असतात. त्यामुळे जो तो आपल्या संसारात व्यस्त असतो.त्यामुळे कोणी तरी नेहमी माझ्यासाठी कायम उपलब्ध असेन ही अपेक्षा निरर्थक ठरते.
३) नेहमी एकसारखेच वागणे – मुलांना नेहमी वाटत असते, माझ्या आई-वडिलांनी कधीच बदलू नये.त्यांनी नेहमी एकसारखेच वागावे.मला कधी नाही म्हणूनच नये, विरोध करूच नये.पण ही गृहीत धरलेली अपेक्षा काहीच उपयोगाची नाही.परिस्थती नुसार माणसाला वागावे लागते.तरच जगण्याला योग्य अर्थ प्राप्त होतो.
४) मनातील सर्व काही सांगणे – बायकोला अनेकदा वाटत असते की आपल्या नवऱ्याने सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याशी शेअर कराव्यात , सांगाव्यात.पण जास्त ताण वाढू नये म्हणून नवरा कधी कधी काही गोष्टी सांगत नसतो.प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते. त्यामुळे सहजीवन जरी असले तरी प्रत्येकाला एक ‘प्रायव्हसी’ हवीच असते.आणि पती-पत्नी दोघांनी ती एकमेकांसाठी जपली पाहिजे आणि उगाच ही अपेक्षा ठेवू नये , की तू मला सर्वच सांगितले पाहिजे.
५) सोशल मीडिया वर लाईक/कमेंट करणे/स्टेटस पाहणे – सोशल मीडिया तर जणू जीव की प्राण झाला आहे.आणि त्यामुळे नात्यांमधील गुंता वाढत आहे.मी अमुक हे स्टेटस माझ्या जवळच्या मित्र-मैत्रिणीसाठी ठेवले आहे.पण तरी देखील ती माझे स्टेटस कधीच पाहत नाही.मी ही एक पोस्ट केली पण अमुक एका नातेवाईकाने साधे लाईक देखील केले नाही.रात्रंदिवस अमुक एक व्यक्ती ऑनलाइन आहे पण तरी देखील माझ्याशी बोलत नाही.अशा काही बालिश अपेक्षा बाळगणारे बरेच जण आहेत.कोणी आपले सोशल मीडिया स्टेटस नाही पाहिले म्हणजे , आपली त्यांच्या आयुष्यात काहीच किंमत नाही असे काही नसते.लाईक , कमेंट केले नाही म्हणून , आपण त्या व्यक्तीला आवडत नाही असे काही नसते. आपण ह्यावरून असे काही निष्कर्ष काढणेच चुकिचे आहे.हे सर्व आभासी जग आहे.भावना जरी व्यक्त करता येत असल्या तरी सोशल मीडिया म्हणजेच खरे आयुष्य नव्हे.पण याची सांगड अनेकांना घालता येत नाही. आणि अशा काही निरर्थक अपेक्षा बळावू लागतात.
६) चूक न दाखविणे – मी कितीही चुकले /चुकलो तरी घरच्यांनी माझी चूक मला दाखवू नये.आणि जरी चूक झाली तरी ती पदरात घ्यावी अशी काही मुलांची अपेक्षा असते.पण जिथे चूक झाली आहे ते सांगणे गरजेचे असते. नाहीतर चुकांची पुनरावृत्ती होते.ज्यामुळे गोष्टी आणखीन बिघडतात.म्हणून घरच्यांकडून ही अपेक्षा ठेवणे निरर्थक आहे.
७) नेहमी बाजू घेणे – माझ्या ह्या मित्राने काहीही झाले तरी माझीच बाजू घेतली पाहिजे.मी त्याचा मित्र आहे, म्हणून त्याने माझंच ऐकलं पाहिजे, कोणी काहीही बोलत असले तरी.पण खरे तर असे नसते.माणूस हा कधी ना कधी चुकत असतोच.त्यामुळे प्रत्येकवेळी अशी अपेक्षा ठेवणे निरर्थक आहे.
८) नेहमी विचारून कोणताही निर्णय घेणे – नवरा-बायकोच्या नात्यांत आणि आई-वडिलांच्या बाबतीत ही अपेक्षा असते.कोणताही निर्णय घेताना मुलीने/मुलाने/पतीने/पत्नीने मला विचारलेच पाहिजे आणि मग निर्णय घेतला पहिजे.पण काही छोटे निर्णय असतात.ते आपले आपल्यालाच घ्यावे लागतात.आजकालच्या धावपळीच्या जगात ते घेणे देखील गरजेचे च असते.त्यामुळे ही अपेक्षा तसे पाहायला गेले तर थोडी जुळवून घेतली पाहिजे.
९) नकार न ऐकणे- कधी पत्नी ला वाटत असते की पती ने मला कधी ‘नाही’ म्हटले नाही पाहिजे, तर कधी पती ला तसे वाटत असते.पण योग्य वेळी ‘नाही’ म्हणता आले पाहिजे आणि ‘नाही’ ऐकण्याची तयारी देखील असली पाहिजे.कोणी कोणाचे मालक नसते.प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमान असतो.मन, सन्मान, आदर असतो .तो प्रत्येकाने, प्रत्येकाचा जपला पाहिजे.
१०) नेहमी सेवा करणे – आई-वडिलांची सेवा करणे खूप चांगले काम आहे. पण कधी मुले देखील इतकी आळशीपणे वागतात की , माझ्या आई-वडिलांनी सर्व गोष्टी माझ्या हातात दिल्या पाहिजेत. लहानपणी जसे वाढविले तसेच मोठेपणी देखील वागले पाहिजे असे काही जणांना वाटत असते.काही ठिकाणी पती-पत्नी मध्ये देखील ही अपेक्षा खूपदा दिसते.पण हे निरर्थक आहे.कोणी कोणाचा सेवक नसतो/नोकर नसतो.त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाचा आदर केला पाहिजे.
अशा काही अपेक्षा आहेत ज्या निरर्थक ठरतात.प्रत्येक व्यक्तीने शांतपणे आपण कोणाकडून काय आणि कशा प्रकारच्या अपेक्षा ठेवतो याचा जरुर एकदा विचार केला पाहिजे. त्यामुळे सर्व समस्या सुटतीलच असे नाही.पण जगणे नक्कीच सुसह्य होईल, ताण हलका होईल आणि मानसिक शांतता मिळेल.
धन्यवाद !
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.