नवऱ्याच्या छोट्या-मोठ्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी बायको प्रत्येक पुरुषाला हवी असते.
अपर्णा कुलकर्णी
चेतन खूप कष्टाळू आणि प्रामाणिक मुलगा होता. शिवाय स्वभाव लाघवी आणि समंजस असल्यामुळे सगळ्यांचा लाडका होता. घरात तो एकुलता एक आणि मोठा त्यामुळे त्याच्याकडून सगळ्याच नातेवाईकांना खूप अपेक्षा होत्या आणि आजवर त्याने त्या पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. त्याचे वडील लहापणीच वारल्यामुळे लहान बहिणीची म्हणजेच चित्राची, घराची एकंदरीत सगळीच जबाबदारी त्याच्यावर आली होती. त्यात आईचे आजारपण, चित्राचे लग्न आणि घरातील खर्च भागवणे म्हणजे त्याच्यासाठी तारेवरची कसरत होत होती.
तरीही त्याने चित्राच्या शिक्षणाची आणि लग्नाची जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडली होती. चित्राचे लग्न झाल्यापासून घरात सगळेच चेतनला लग्न म्हणून मागे लागले होते पण त्याची आर्थिक परिस्थिती अजून चांगली होण्याची तो वाट पहात होता. त्यात त्याच्या आईचे आजारपण कमी जास्त होत असल्याने सगळ्यांनीच समजावून त्याला लग्नासाठी तयार केले होते म्हणून तो तयार झाला होता. त्याच्या बाबांच्या मित्राची मुलगी त्याच्यासाठी स्थळ म्हणून आली आणि त्यांना चेतनचा स्वभाव माहीत असल्याने त्यांनी लगेच लग्न उरकून टाकले.
रुपाली चेतनची बायको नावाप्रमाणे रूपवान होती. चेतनही दिसायला छान होता पण उंची महागडे कपडे न वापरता साधेच रहाणे पसंत करत होता कारण परिस्थितीने त्याला तसे शिकवले होते. शिवाय अंथरूण पाहून पाय पसरावेत ही बाबांची शिकवण तो विसरला नव्हता. रुपाली बारावी झाली होती तर चेतन ग्राजुएट. चित्राच्या शिक्षणामुळे त्याने त्याचे महागडे शिक्षण न घेता फक्त ग्राजुएट पूर्ण केले होते पण बहिणीच्या सगळ्या इच्छा भाऊ आणि वडील दोन्ही नात्यांनी पूर्ण केल्या होत्या.
रुपालीला त्याचे हे गुण खूप आवडले होते आणि तिने ते अनुभवले पण होते. चेतन निर्व्यसनी तर होताच शिवाय कधीच खोटं बोलत नव्हता. लग्न ठरताच त्याने रुपलीला भेटून त्याची सगळी परिस्थिती खरी सांगून टाकली होती. त्यामुळेच रुपालीने ही त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. रुपाली लक्ष्मीरूपाने घरात आल्यावर घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या चेतनने तिच्या हातात सोपवल्या आणि कपाटाच्या चाव्या सुधा. सगळे व्यवहार चेतन रुपालीशी बोलून तिचे मत विचारात घेऊनच करत होता,स्वतः आधी तिचा विचार करत होता आणि यातच तिला समाधान होते.
बघता बघता दिवस जात होते आणि चित्राच्या बाळंत पणाचे दिवस जवळ आल्याने चेतन तिला घेऊन माहेरी आला होता.
चेतनला समोर असलेल्या खर्चाचे टेन्शन आले होते पण त्याने तसे बोलून दाखवले नव्हते. पण रुपालीच्या ते चांगलेच लक्षात आले होते. त्यामुळे ती म्हणाली, माझे बाबा आपल्याला आर्थिक मदत करतील, त्यांची मदत घेऊया का आपण ?? त्यावर चेतनने साफ नकार दिला आणि म्हणाला, मी अजून एखादा जॉब करेन पार्ट टाईम पण तुझ्या बाबांकडे पैसे नको मागू.
तसेही तुझ्या केकच्या पण ऑर्डर आहेत त्याचाही जरा हातभार लागेल पण आईचा दवाखाना आणि चित्राचे बाळंतपण एकत्रच आल्याने जरा तारांबळ उडत आहे. पण आपण करूया काहीतरी. ऑफिस मधून काही कर्ज मिळते का बघतो पण कोणाकडे पैसे नको मागू. त्याचे हे बोलणे रुपालीला पटले आणि तिने ही केकच्या जास्त ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. थोड्याच दिवसात चित्राला मुलगा झाला आणि दोन महिन्यांनी बारसे करून त्याने चित्राला सासरी पाठवले.
रुपालीच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाबा झाल्याने चेतनची जबाबदारी अजुनच वाढली. ती घरात आली तशी चेतनची परिस्थिती बरीच सुधारली. त्याला नोकरीत प्रमोशन मिळाले आणि त्याच्या आईच्या तब्येतीत विलक्षण सुधारणा झाली. प्रमोशनमुळे पगार पण चांगलाच वाढला होता तरीही खूप विचार पूर्वक चेतनने सगळा वाढलेला पगार मुलीच्या म्हणजेच रचनाच्या नावे बँकेत ठेवला होता. रचनाच्या पाचव्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने त्याची एफडी रुपालीच्या हातात सोपवली तेंव्हा आनंदाने तिचे डोळे भरून आले आणि नवऱ्याच्या कर्तृत्वाचा अभिमान वाढला ते वेगळेच.
हळू हळू दिवस सरत होते, रचनाचे शिक्षण, छोटे मोठे कर्ज, सगळ्या जबाबदाऱ्या चेतनने व्यवस्थित पूर्ण केल्या होत्या. प्रसंगी दोन जॉब केले होते पण कधीच कोणासमोर हात पसरले नव्हते आणि स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकला नव्हता. आज त्यांच्या लग्नाला वीस वर्ष पूर्ण झाली होती. दरम्यान त्याची आई मात्र त्याला सोडून गेली होती पण तिचे सगळे त्याने शेवटपर्यंत अगदी मनापासून केले होते आणि त्यामुळेच त्यांनीही समाधानाने डोळे मिटले होते.
आता जबाबदारी होती ती फक्त रचनाच्या लग्नाची. तेवढे झाले की तो बाबाच्या कर्तव्यातून मोकळा होणार होता. आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तो रुपालीला घेऊन बाहेर फिरायला आला होता. मोकळ्या आकाशाकडे बघत, रुपलीचा हात हातात घेऊन तो शांत बसला होता खूप वेळ. बऱ्याच वेळाने तो रुपालीला म्हणाला, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझे जग बदलून टाकलेस, रुपाली. माझ्यासारख्या गरीब माणसाशी फक्त लग्न केले नाही तर संसार पुढे नेलास. प्रसंगी कष्ट केलेस आणि मला साथ दिलीस म्हणूनच मी हे करू शकलो.
तुझ्यासारखी समंजस बायको मिळाली नसती तर मला हे जमलेच नसते. त्यावर रुपाली म्हणाली, अहो काहीही काय बोलताय, मी काहीच नाही केलं. केल ते तुम्हीच. तुम्ही नेहमीच प्रमाणिक राहिलात. कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमान गहाण ठेवला नाही. कोणासमोर हात पसरले नाहीत. नाही म्हणून लाजला नाहीत आणि आहे म्हणून माज केला नाहीत. पैसा ना पैसा योग्य ठिकाणी गुंतवून सगळ्या जबाबदाऱ्या फक पार पडल्या नाहीत तर मनापासून स्वीकारून पूर्ण केल्या.
चित्राचे शिक्षण, लग्न, बाळंतपण, आईचे आजारपण, माझ्या गरजा, रचनाचे शिक्षण, तिचे हट्ट सगळ अगदी छान सांभाळलात. तुमच्या या छोट्या मोठ्या कर्तृत्वाचा मला नेहमीच अभिमान वाटला आहे. त्यावर रुपलीला जवळ घेत चेतन म्हणाला, तुला माझा अभिमान वाटत होता आणि वेळोवेळी तू मला डोळ्यातून, कधी शब्दातून सांगत होतीस म्हणूनच मी हे करू शकलो. कारण नवऱ्याच्या छोट्या-मोठ्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी बायको प्रत्येक पुरुषाला हवी असते आणि तसे होत राहिले तर त्याचा विश्वास आणि उमेद वाढतच जाते.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
