घटस्फोट टाळता येऊ शकतो का ? की घ्यायलाच हवा?
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात अस म्हटल जात. इतक्या त्या भक्कम आणि पवित्र असतात. त्याचप्रमाणे लग्न जरी आता केल असल तरी त्यात सात वचन असतात जी नवरा बायको एकमेकांना देतात जी फक्त हा एका जन्मापुर्तीच नसून पुढील सात जन्मासाठी असतात. पुढील सात जन्म त्यांनी एकमेकांची साथ निभवायची असते. सुख दुःखात साथीदार व्हायचं असत. त्यासाठी मग वेगवेगळी व्रत वैकल्ये पण केली जातात. मग ती वटपौर्णिमा असुदे किंवा करवा चौथ. इतकं लग्नाला आपल्या धर्मात पवित्र स्थान दिलं आहे. म्हणूनच तर देवाच्या साक्षीने हे बंधन बांधल जात. आणि पती पत्नी तितक्याच निष्ठेने हे नात निभावतात.
जुन्या काळातली म्हणजेच आपल्या आजीच्या काळातील वगैरे लोक पाहीली तरी काय दिसून येत? त्यांचं त्यांच्या नवऱ्यांशी बऱ्याचदा पटायचं नाही, प्रसंगी भांडण व्हायची जी नवरा बायको मध्ये कॉमन गोष्ट आहे. पण तेच बाहेरच कोण नवऱ्याला काय बोललं की स्त्री पेटून उठायची. आपला नवरा कसाही असुदे पण त्याला बोलायचा अधिकार बाहेरच्या कोणालाही नाही हेच त्यातून दिसून यायचं. कितीतरी आजोबा आपल्याला दिसतात की जे आजारी असलेल्या आपल्या बायकोची सेवा करतात. त्यांच्यासोबत तासनतास आपला त्रास विसरुन बसून राहतात.
आता इतकी वर्ष संसार केलेला असताना कधीच काही झालं नाही अस तर होणार नाही. भांडण, मतभेद, वाद हे होणार कारण माणसच वेगळी आहेत. पण तरी दोघं शेवटपर्यंत एकत्र राहतात. का? तर लग्न करताना ज्याला आपलं माणूस म्हणून म्हटलेल असत त्याला फक्त म्हणूनच ती दोघं थांबत नाहीत तर ते वचन पाळतात, समोरचा माणूस आपला आहे म्हटल्यावर त्याला आहे तस स्वीकारतात. हा जो स्वीकार होता तोच नात टिकून राहण्याचा एक महत्वाचा आणि मोठा दुवा होता.
पण हेच आता नेमक उलट होताना दिसत आहे. हा स्वीकारच आता कुठेतरी कमी होताना दिसतो. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून ही खटके उडतात आणि त्याच मोठ्या भांडणात रूपांतर होत. आताच्या काळात स्व अस्तिवाला जास्त महत्त्व आलं आहे. स्वतःच्या ओळखीला जास्त महत्त्व आलं आहे. जे अगदी योग्य आहे. आपल्या माणूस म्हणून स्वतःच अस्तित्व हे पाहिजेच. आणि ते आपण जपलं देखील पाहिजे.
पण लग्न हे एक अस नात आहे जिथे फक्त मी पण असून चालत नाही. तिथे समर्पण पाहिजे, त्याग पाहिजे. जर आपल्या एखाद्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे तर आपल्याला काही ठिकाणी माघार घ्यावी लागते आणि हे कोणा एकाच्या बाबतीत लागू होत नाही तर दोघांनाही लागू होत. थोड माझ थोड तुझ अस करूनच संसार करावा लागतो. परिस्थितीला adapt करावं लागत, त्यात मोल्ड व्हावं लागत. पण अस होत नाही.
अगदी शुल्लक कारणावरून भांडण विकोपाला जातात आणि त्याच रूपांतर घटस्फोटात होत. घटस्फोटाचा निर्णय घेताना पण सर्व वाईट गोष्टीच आठवत असतात किंबहुना त्यांना खूप मोठं केलेलं असत. पण त्या माणसाने काहीतरी चांगल देखील केलेलं असू शकत, त्याच्यात काही चांगले गुणही आहेत याचा मात्र विसर पडतो. आणि एकदा हा निर्णय घेतला की परत माघार नाही अस अनेकदा वाटत. पण अस नाही. अगदी शेवटपर्यंत आपण आपला निर्णय बदलू शकतो. आपल्याकडे तो चॉईस असतो.
फक्त गरज असते आतापर्यंत जे काही झालं आहे त्या घटनांचा तटस्थपणे, त्रयस्थपणे मागोवा घ्यायची. जेव्हा आपले वाद होतात त्यामध्ये बऱ्याचदा एक गोंधळ होता तो म्हणजे समजुतीचा. कसा काय? तर वाद होताना जे नवरा किंवा बायको एकमेकांना बोलतात तेच खर मानलं जात. आता मनातलं बाहेर पडल अस म्हटल जात. पण खरी परिस्थिती अशी असते की ते फक्त आवेशात केल गेलेलं बोलण असत जे खर असेलच अस नाही. वरवरच्या वागण्या बोलण्याच्यामागे त्या व्यक्तीचं जे खर व्यक्तित्व आहे तेच समजावून घेण्यात चूक होते आणि म्हणून गोष्टी विकोपाला जातात.
आपण आता जे वागत असतो त्यांच्यावर आपल्या आधीच्या अनुभवांचा त्यातून आपली जी एक विचारपद्धती झालेली आहे तिचा मोठा प्रभाव असतो. ही विचारपद्धती नवरा बायकोने समजून घेणं गरजेचं असत. म्हणजेच त्या माणसाला समजून, ओळखून घेणं गरजेचं असत. आता ओळखणे म्हणजे फक्त त्याला काय खायला आवडत, काय नाही इथपर्यंत मर्यादित नाही. त्याची छोट्यातील छोटी गोष्ट समजणे, समजावून घेणे या सर्व गोष्टी यात येतात.
आणि हे जितकं आपण जास्त एकत्र राहू, बोलू, संवाद साधू तितकं शक्य होत. या सर्व गोष्टी एका महिन्यात होणाऱ्या नाहीत. त्याला वेळ द्यावा लागतो. आणि हीच तयारी नसते. वेळ द्यायचा नसतो स्वतःला आणि समोरच्याला देखील. अगदी लग्नाला चार महिने झाले नाही तरी घटस्फोट घेतला जातो. का? तर अडजस्ट व्हायला जमलं नाही. इथे आपल्याला जमलं नाही की आपण तितका वेळ स्वतःला दिला नाही हा प्रश्न पडला पाहिजे.
आपल्याला कितीही वाटत असल की आपण अडजस्ट करावं लागत तरी आपण निवडच करत असतो. एखादी बाई मार खाऊन पण, अपमान सहन करून त्या माणसासोबत राहते. आता दिसताना ही adjustment दिसते. पण त्या त्रासाहून एकट पडल्यानंतर समाजाकडून जो त्रास सहन करावा लागेल बोलणी खावी लागतील तो असह्य होत असतो म्हणून एकत्र राहायची निवड केलेली असते. तेच काही ठिकाणी समाज काय म्हणेल याहून आपल्याला काय वाटत हे महत्वाच आहे अस मानून वेगळं व्हायची निवड केलेली असते.
पण दोन्ही ठिकाणी असच म्हटल जात की मला सहन होत नाही, मी अडजस्ट करते आहे. आपल्याला कितीही वाटलं आपण सहन करू शकत नाही तरी अस नाही. जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे आपण सर्व सहन करू शकतो. आपल्यावर आहे आपण काय आणि कस सहन करायच.
जिथे मानहानी होते, शारीरिक, मानसिक हिंसा होत असेल तर तिथे लोक काय म्हणतील असा विचार करून निमूटपणे त्या माणसासोबत आयुष्य काढणे चुकीचं आहे. जिथे आपण आपल्याला पूर्णपणे गमावून बसलोय तिथे सोबत राहताना एकदा जरूर विचार केला पाहिजे. पण फक्त माझे या व्यक्तीशी विचार जुळत नाहीत, किंवा आमच्या आवडी निवडी जुळत नाहीत म्हणून घटस्फोट घेण्याऐवजी त्या माणसाची नैतिकता काय आहे ही जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
कोणताही माणूस परफेक्ट नसतो. सर्वांमध्ये कमतरता असते. आपण त्या माणसाला आपलं मनात असू तर ती कमतरता कशी भरून काढता येईल याचा विचार केला पाहिजे. विचार, मतं एकसारखी कशी असतील? जर माणसाचं वेगळी आहेत. हे वेगळेपण स्वीकारून पुढे जायचं आहे. त्यासाठी एकमेकांना एक तरी संधी दिली पाहिजे. नात तोडायला वेळ लागत नाही. पण ते घट्ट करण्यासाठी, जपून ठेवण्यासाठी वेळ लागतो जो आपण एकमेकांना दिला पाहिजे.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

Good
माझ्या लग्नाला 25 वर्षे झाली पण मागील दोन
वर्षापासून आमच्यातले वाद टोकाला गेले आहेत समुपदेशकाची मदत घ्यावी तर तीचा नकार आहे.
मी काय करावे ते समजत नाही.
Nice