जोडीदारावर अवलंबून न राहता आपण प्रेम सहज करू शकतो, कसे ते वाचा.
अपर्णा कुलकर्णी
विशाल आणि सुजाता यांचे अरेंज मॅरेज, अगदी कांदे पोहे कार्यक्रम करून, घरच्यांच्या संमतीने केलेले होते. लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंतचा काळ दोघांनी खूप आनंदात घालवला होता. लग्नाच्या गोड बंधनात अडकन्याची स्वप्ने बघत दोघांचे लग्न झाले आणि संसार सुरू झाला. सुजाता आणि विशाल दोघेही उच्च शिक्षित होते. सुजाता एक संशोधक होती आणि एका प्रोजेक्टवर काम करत होती तर विशाल डॉक्टर होता आणि त्याचेही क्लिनिक उत्तम चालू होते. एकंदरीत दोघेही आपापल्या कामात गुंतून गेले होते तरीही रोज संध्याकाळी स्वतःची कामे बाजूला ठेवून एकमेकांना वेळ देत होते.
असेच चालू असताना सुजाताला दिवस गेले. या बातमीमुळे विशालला खूप आनंद झाला पण सुजाता मात्र दुःखी होती. विशालने त्याचे कारण विचारताच सुजाता म्हणाली, आता करिअरच्या खूप महत्त्वाच्या वळणावर आहे मी विशाल, यात मला बाळाची जबाबदारी घ्यायला जमणार नाही. या स्टेज वर येण्यासाठी मी अफाट मेहनत घेतली आहे हे तुला वेगळं सांगण्याची गरज नाही त्यामूळे आता करिअर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तसही लग्नाला फक्त वर्ष पूर्ण झालं आहे. त्यामुळे घाई करण्याची गरज नाही हे काही वर्षांनी पण होईल.
सुजाताच्या या बोलण्यावर विशाल नाराज झाला होता, कारण त्याने वर्षभरात जितके सुजाताला ओळखले होते त्यावरून सुजाता करिअरला महत्त्व देणारी होती हे त्याच्या लक्षात आले होतेच पण त्याहीपेक्षा आईच सुख तिच्यासाठी जास्त महत्त्वाचं असेल असे त्याला वाटले होते. त्याने सुजाताला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
शेवटी हे प्रकरण घरच्यांच्या कानावर गेले आणि सुजाताच्या आई वडिलांनी तिला आई होण्यातच कसे शहाणपण आहे हे समजावले. त्यामुळे सुजाताने बाळाला जन्म दिला आणि एक गोंडस मुलगी जन्माला आली पण त्यामुळे परदेशात जाऊन ट्रेनिंग घेण्याची सुजाताची संधी मात्र हुकली. त्याचा जबाबदार तिने सरळ विशालला मानले कारण त्याने जर सुजाताची अवस्था समजून घेतली असती तर घरच्यांनी असे तिला जबरदस्तीने आई होण्यास भाग पाडले नसते असे सुजताचे स्पष्ट म्हणणे होते.
तिच्या करिअरचे झालेले नुकसान विशालच्या चांगलेच लक्षात आले होते कारण तो ही एक डॉक्टर होता आणि करिअरचे महत्व त्याला वेगळे पटवून देण्याची गरज नव्हती. पण खूपदा माफी मागूनही सुजाता त्याला माफ करायला तयार नव्हती इतकेच काय फक्त कर्तव्यपूर्ती म्हणून ती तिच्या मुलीचे संगोपन करत होती. विशाल तिच्या मनातून उतरला होता. मी किती करिअर ओरिएंटेड आहे हे माहीत असूनही विशाल असा वागुच कसा शकतो याचेच तिला नवल वाटले होते.
इतकेच काय पण लग्न जमल्यावर ते होईपर्यंत ती विशालशी फक्त करिअरबद्दलच बोलत होती आणि तिची महत्त्वाकांक्षा समजून घेणारा असा व्यक्ती आहे विशाल असेच तिला वाटले होते म्हणूनच तिने त्याच्याशी लग्न केले होते. तसे तिने विशालला सांगितले ही होते, की माझ्या करिअरला प्राधान्य देणारा, समजून घेणारा नवरा मला हवा आहे आणि विशालने ते मान्य केले होते. पण प्रत्यक्षात मात्र चुकीचे घडले होते.
इकडे विशाल पण खूप अस्वस्थ होता. विशाल एक स्त्री रोग तज्ञ डॉक्टर होता आणि त्याने आजवर अशा कित्येक जोडप्यांना पाहिले होते जे मुल होण्यासाठी प्रयत्नशील होते. पण त्यांना मुल होत नव्हते आणि त्यात काहीही अडचण न येता आपल्याला मूल होत आहे म्हटल्यावर तो आनंदाने भारावून गेला होता आणि त्याची हीच अवस्था त्याच्या घरच्यांनी हेरून सुजाताच्या आई वडिलांना सांगितले होते. पण आता या सगळ्या गोष्टींना काहीच अर्थ उरला नव्हता.
खरतर विशाल आणि सुजाता एकमेकांवर खूप प्रेम करणारे जोडपे. पण कोणाचाच दोष नसताना ही त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. मनाने सुजाता विशालपासून खूप दूर गेली होती. चूक नसताना ही तिच्या करिअरच्या नुकसानच खापर त्याच्या माथी होते तरीही तो सुजाता वर खूप प्रेम करत होता. पण सुजाता त्याच्यावर प्रेम ही करत नव्हती आणि तिरस्कार ही. ती फक्त कर्तव्ये पार पाडत होती. बघता बघता त्यांच्या संसाराला वीस वर्षे अशीच उलटून गेली होती पण विशाल मात्र सुजाताकडून कसलीही अपेक्षा न ठेवता, तिच्यावर अवलंबून न राहता तिच्यावर निरपेक्ष प्रेम करतच होता.
दरवर्षी तिचा वाढदिवस लक्षात ठेवून तिला वेगवेगळ्या प्रकारे गिफ्ट देत होता, तिच्यासाठी तिच्या आवडीचे पदार्थ आणत होता, तिला काय हवं नको बघत होता, इतकेच काय पण तिच्या करिअरसाठी काय करता येईल त्यासाठी पण प्रयत्न करत होता पण दुर्दैवाने त्यात त्याला यश आले नव्हते. पण म्हणून त्याने त्याचे प्रयत्न थांबवले नाहीत. शेवटी त्याने एक ठरवले होते की आता सुजाताच्या प्रेमावर अवलंबून न राहता, ती प्रेम करेल याची वाट न बघता आपण मात्र तिच्यावर निरंतर प्रेम करत राहायचे.
मित्रांनो ही फक्त एक परिस्थिती झाली एका जोडप्या मागची. पण लग्नानंतर सर्रास असेच चित्र पाहायला मिळते मग तो प्रेम विवाह असो किंवा मग अरेंज मॅरेज असो. नव्याचे नऊ दिवस सरले की संसाराचा व्याप सुरू होतो आणि मग संसारात जोडपी इतकी गुरफटून जातात की नात्यात प्रेम उरतच नाही. पण प्रेम नसेल तर नाते आयुष्यभर टिकवून ठेवणे कठीण होऊन जाते. मग अशा वेळी नात्यातला एक व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून न राहता किंवा अपेक्षा न ठेवता नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते.
सहसा हे प्रमाण स्त्रियांमध्ये सत्तर तर पुरुषामध्ये तीस टक्के असते. बऱ्याचदा ही निरपेक्ष भावना स्त्रियांनाच ठेवून पुढे जावे लागते. पण त्यात खचून न जाता, जास्त विचार न करता नाते सहज टिकवून ठेवता येते आणि कडेपर्यंत नेता येते हे लक्षात असूद्या. मी तर म्हणेन फक्त नवरा बायकोच्याच नात्यात नव्हे तर प्रत्येक नात्यात हाच फॉर्म्युला गृहीत धरून राहिलात तर सुखी व्हाल.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

खूपच छान माहिती दिली आहे
Khup Sundar lekh
खूपचं छान आहे हा लेख