प्रत्येक संसार हे पती-पत्नीच्या जमवून घेण्याच्या क्षमतेवरच उभे असतात.
मेराज बागवान
संसार…..असतो दोघांचा, दोन जीवांचा,पती-पत्नी यांचा.आणि हा संसार ज्या पायावर उभा असतो तो म्हणजे ‘समजूतदारपणा’ आणि ‘जुळवून घेण्याची क्षमता’.काही लोकांचे मत असे असते की , लग्न म्हणजे फक्त आणि फक्त तडजोड.पण खरे पाहता लग्न ही तडजोड नसून समजून घेणे आणि जमवून, जुळवून घेणे असते.जेव्हा एक मुलगा आणि एका मुलीचे लग्न होते तेव्हा ते दोन वेगवेळ्या व्यक्ती तर असतातच पण त्यांचे जगणे मात्र एकत्र असते, एकमेकांसाठी असते.यामध्ये फक्त कोणीतरी एकच नसते तर दोघांचे असे ते नाते असते. फक्त मी म्हणेल तसेच असे कधीच नसते. म्हणूनच प्रत्येक संसार हे पती-पत्नीच्या जमवून घेण्याच्या क्षमतेवरच उभे असतात.
संसारात दोघांची मते, स्वभाव,आवडी निवडी वेगवेगळ्या असतात. पण त्यातून देखील एकमेकांचे हे वेगळेपण जपणे दोघांचे देखील कर्तव्य आणि जबाबदारी असते.एकमेकांच्या आवडी निवडी जपणे ,त्याचा आदर करणे आणि स्वतःला त्या गोष्टी आवडत नसून देखील आपल्या जोडीदारासाठी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणे हे प्रत्येक पती-पत्नी ने करणे गरजेचे आहे. पण हे दोन्ही कडून होणे गरजेचे आहे.फक्त पतीच जुळवून घेतोय किंवा फक्त पत्नीच जमवून घेते आहे, याला काही अर्थ नसतो.
संसारात पती-पत्नी किती जमवून घेतात, त्यांच्यात जमवून घेण्याची किती क्षमता आहे यावर संसाराचे यश अवलंबून असते.कधी आर्थिक अडचणी येतात, त्याक्षणी पती-पत्नी एकमेकांना कशी साथ देतात आणि त्यातून कसा मार्ग काढतात हे फार महत्वाचे ठरते.फक्त आर्थिक च नाही तर इतर अनेक प्रकारच्या अडचणी असतात.ज्यांना पती-पत्नी ह्या दोघांनी मिळून सामोरे जायचे असते.अडचणी कौटुंबिक , नातेसंबंधाविषयी असू शकतात. शारीरिक संबंध , मुलांचे संगोपन याविषयी देखील असू शकतात. संसारात अडचण फक्त एका कुणाची नसते.त्यामुळे दोघांनी मिळून , एकमेकांशी जुळवून घेत त्यावर तोडगा काढायचा असतो. आणि ह्यासाठी आवश्यक असतो तो समजूतदारपणा.
‘संवाद’ नात्याला, संसाराला जिवंत ठेवतो.प्रत्येक वेळी पती-पत्नी मध्ये मनमोकळा संवाद असला पाहिजे. जेणेकरून कोणतेही गैरसमज, शंका, कुशंका राहणार नाहीत.पत्नी चे काय म्हणणे आहे आणि पती चे काय म्हणणे आहे हे एकमेकांनी ऐकले पाहिजे. कधी पती ला कार्यालयीन जीवनातील काही समस्या असतात. मग अशा वेळी पती ने मोकळेपणाने पत्नी ला हे सांगितले पहिजे.अनेकदा काय होते, तिला त्रास नको म्हणून ऑफिस चे ताण सांगितले जात नाहीत.पण पत्नी ही पती च्या आयुष्यातील अगदी जवळची व्यक्ती असते. तिला जे काही ताण आहेत ते सांगितले तर ती ते समजून देखील घेऊ शकते. तसेच पत्नी ने देखील तिच्या समस्या आपल्या पती समोर सांगितल्या पाहिजेत.कारण फक्त मनात ठेवून कोणतीच समस्या सुटत नाही.
‘विश्वास’ , अत्यंत महत्वाची गोष्ट.जो आज पती-पत्नी मध्ये खूपदा हरवत चालला आहे.मोबाईल, इंटरनेट, जागतिकीकरण ह्या सगळ्यांचा परिणाम नात्यांवर होतच आहे. कित्येक पती-पत्नी ‘प्रॅक्टिकल’ आयुष्य जगता जगता, विश्वास म्हणजे काय हे विसरून चालले आहेत.एकमेकांवर तुम्ही किती विश्वास ठेवता ह्या क्षमतेवर देखील संसार अवलंबून असतो.जिथे विश्वास असतो, तिथे काळजी, प्रेम असते.ते नात्यांना टिकवून ठेवत असते.जर कोणा एकाचा जरी दुसऱ्यावर विश्वास नसेल तरी देखील संसार टिकू शकत नाही.
‘आदर’.एकवेळ प्रेम नसेल तरी चालेल.पण प्रत्येक पती-पत्नी ने एकमेकांचा आदर बाळगायला हवा.तुम्ही एकमेकांचा आदर ठेवता याचाच अर्थ तुम्ही एकमेकांशी जमवून घ्यायला तयार आहात.पण हा आदर दोन्ही कडून हवा.उगाच एकजण दुसऱ्याचा वारंवार अपमान करतो आहे आणि दुसरा तरी देखील समजून घेत आहे, याला काहीच अर्थ नसतो.’स्वाभिमान’ ही देखील एक गोष्ट असते.जी माणसाला माणूस म्हणून जग असे सांगत असते.पती-पत्नी जरी एकमेकांसाठी असले तरी देखील कोणी कोणासाठी लाचार कधीच नसते.म्हणून तुम्ही एकमेकांचा कितपत आदर ठेवता ह्या क्षमतेवर प्रत्येक संसार उभे असतात.
‘अहंकार’.कित्येकदा अहंकार वैवाहिक जीवन जिकरीचे करतो.मीच का ‘सॉरी’ म्हणू, मीच का प्रथम बोलू’ वगैरे गोष्टी संसारात विष कालवतात.पण तुम्ही स्वतःचे अहंकार जपत देखील एकमेकांशी कसे जमवून घेता ह्यावर तुमच्या संसाराचे गमक अवलंबून असते.
‘अपेक्षा’.प्रत्येक पती पत्नी ची एकमेकांकडून काही ना काही अपेक्षा असतेच.आणि त्यात काही चुकीचे नाही.पण तुम्ही त्या अपेक्षा दुसऱ्यावर लादत तर नाही ना याची खबरदारी घेणे गरजेचे असते.शारीरिक संबंध वैवाहिक जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात.प्रत्येक वेळी शब्दांची भाषा पती-पत्नी मध्ये उपयोगी येत नाही आणि त्यावेळी प्रभावी ठरतो तो ‘संभोग’ म्हणजेच शारीरिक संबंध. स्पर्शाची भाषा खूप काही सांगून जाते.प्रेम वाढीस लागते, आपलेपणा निर्माण होतो.म्हणूनच हे शारीरिक संबंध अत्यंत निकोप, निर्मळ असणे आवश्यक आहे.एकमेकांची मर्जी सांभाळणे गरजेचे आहेच, पण ह्या संबंधामध्ये कोणी कोणावर कसलीही जबरदस्ती करू नाही.अन्यथा त्या नात्याला काहीच अर्थ प्राप्त होत नाही.
अशा काही गोष्टी असतात संसारात, जिथे पती-पत्नी एकमेकांशी कसे जमवून घेतात यावर तो संसार उभा असतो.प्रत्येक पती-पत्नी ने सहजीवनाच्या प्रत्येक वळणावर थोडे आत्मपरीक्षण करून, थोडे एकमेकांशी बोलून संसाराचा गाडा पुढे नेला पाहिजे.अडचणी, भांडणे, वाद-विवाद प्रत्येक संसारात होत असतात.पण वेळीच त्यावर पती-पत्नी कसे नियंत्रण ठेवतात, त्यातून सामंजस्याने कसा मार्ग काढतात आणि संसार कसा टिकवून ठेवतात हे फार महत्त्वाचे ठरते.कारण ह्या क्षमतेवरच संसार उभा असतो.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
