Skip to content

स्पर्शाची भाषा न समजणारी जोडपी कायम शरीर संबंधाबाबत एकमेकांवर चिखलफेक करतात.

स्पर्शाची भाषा न समजणारी जोडपी कायम शरीर संबंधाबाबत एकमेकांवर चिखलफेक करतात.


हर्षदा पिंपळे


कधी कधी वाटतं मनाच्या कुपीत दडलेल्या चाफ्याच्या कुंद कळ्या तुझ्या मिठीत मोकळ्या कराव्यात.
फुलाची पाकळी गळून पडताना त्या फुलाला वेदना जाणवतही नसतील असाच काहीसा तुझा हळूवार स्पर्श.
हर एक पाकळी कशी तुझ्या स्पर्शाने मोहरून जाईल.
तुझ्या केवड्याच्या अत्तरात भिजणं म्हणजे जणू वेगळीच किमया असेल.
मला अनुभवायचाय तो मोहरलेला शिशीर
आणि तुझ्या प्रेमाचा मिहीर …!

तुला पाहताच क्षणी तुझा हात हातात घेऊन एका शांत ठिकाणी वाफाळलेल्या चहाचा एक एक घोट घेत जरा निवांत बसायचय… खिडकीतून लख्ख उजेड आणि पाऊस दिसत असेल तरी चालेल…
हो,पण तुझ्या ओशाळ झोपेसाठी मी माझ्या मखमली केसांचा गडद अंधार करायला तयार असेन…
काही क्षण का होईना तुझ्यासोबत रेंगाळायचय…
माझ्या जिवंतपणाच्या काही पाऊलखुणांना
तुझ्या डोळ्यात तरंगताना पहायचय
काहीही झालं तरी श्वास मिटण्याआधी तुझ्यासोबत काही क्षण तरी गंधाळायचय….!

स्पर्शाची भाषा खरच इतकी सुंदर आहे.इतकी बोलकी आहे.पण त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघता यायला हवं.कारण स्पर्शाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी ही निराळी आहे. कुणी अत्यंत अयोग्य पद्धतीने त्या स्पर्शाचा वापर करतं.आणि अनेकदा त्याच अयोग्य पद्धतीमुळे कित्येकांची स्पर्शाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते.स्पर्श शब्दसुद्धा त्यामुळे किळसवाणा वाटू लागतो.स्पर्श खरच बोलका असतो.मायेचा आणि घृणेचा स्पर्श क्षणार्धात समजून येतो.स्पर्शाची व्याख्या किळसवाणी होते ती काही वाईट वृत्तीच्या लोकांमुळे.नाहीतर, स्पर्श म्हणजे सुखावणारं सुख,स्पर्श म्हणजे किमया!

पण ही स्पर्शाची भाषा कित्येकांना कळते..?

असे कित्येक जण आहे ज्यांना आजवर स्पर्शाची भाषा कळालीच नाही.आता जोडपं आलं म्हणजे शारीरिक जवळीक ही येते.पण शारीरिक जवळीक म्हणजे काय..?त्या स्पर्शाचा नेमका अर्थ काय? या प्रश्नांची उत्तरं कित्येकांना कळालीच नाही.त्यांना स्पर्शाची भाषा कळतच नाही.शारीरिक आणि मानसिक गरजेपलिकडे जाऊनही केवळ ‘हाव’ म्हणून शारीरिक संबंधाकडे पाहणारी जोडपी म्हणजे जरा विचीत्रच.स्पर्शाच,मिलनाच सुख त्यांना अनुभवणं जमत नाही.अशी जोडपी कायमच शरीर संबंधाबाबत एकमेकांवर चिखलफेक करताना दिसतात.स्पर्शाची भाषा हळुवारपणे समजत असते.त्यामुळे एकदम अचानक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करण्यात काही अर्थ नसतो हे त्या जोडप्यांना समजत नाही.

कित्येकदा छोट्या छोट्या गोष्टींवरून अनेक जोडप्यांमध्ये खटके उडत असतात पण त्यावेळी कित्येक जोडपी एकमेकांना समजून न घेता थेट एकमेकांच्या चारित्र्यावर चिखलफेक करत असतात.एका चांगल्या स्पर्शाला त्यांच्यामुळेच वाईट स्वरूप प्राप्त होतं.आणि स्पर्शाची खरी जाणीव व्हायलाही स्पर्श आधी कळावा लागतो.आणि तो हळुहळू समजून घेतला तर नक्की कळतो.शारीरिक संबंध हे हळूवार स्पर्शाने अधिक घट्ट होऊ शकतात हे काही जोडप्यांच्या लक्षातच येत नाही. समोर वाढलेलं ताट अक्षरशः घाईघाईने हावऱ्यासारखं खाणं म्हणजे आस्वाद घेणं मुळीच नाही.एक एक पदार्थ हळूवारपणे चाखला तर त्याची खरी चव कळते.नाहीतर त्या उगाचच घाईघाईने खाल्लेल्या जेवणाला काहीही अर्थही नाही. शारीरिक संबंधाच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू होते.

शारीरिक संबंध म्हणजे क्षणार्धात एकमेकांवर तुटून पडणे असं नाही.तर हळूवार स्पर्शाने एकमेकांना समजून घेत त्या परमोच्च सुखाचा बिंदू गाठता येतो.नाहीतर ज्यांना स्पर्शाची भाषाच समजत नाही ते एकमेकांवर सातत्याने चिखलफेक करत राहतात.”तुला काहीच कळत नाही. तु म्हणजे शून्य. तुझ्यात काहीतरी कमी आहे. आधी माहीत असतं तर असच केलं नसतं-तसच केलं नसतं.घे,आता भोगतेय कर्माची फळं…”वगैरे वगैरे बोलून अक्षरशः वातावरण गढूळ करून टाकतात.

तर काही जोडप्यांना शरीर संबंध म्हणजे थेट टोकाची भूमिका गाठणे इतकच काय ते माहीत असतं.प्रेमाने मारलेली मिठी,कपाळावरील हलकसं चुंबन याची मधुर भाषा त्यांना सहसा कळतच नाही.हळूवार स्पर्शाच्या भाषेची त्यांना जाणीवच नसते.त्यामुळे अनेकदा अनेकदा इच्छेविरुद्ध जोडप्यांमध्ये बऱ्याच गोष्टी घडत राहतात. यातून वाद निर्माण होऊन तीच जोडपी शरीर संबंधाबाबत एकमेकांवर चिखलफेक करतात.स्पर्शामुळे भावनिक नातं घट्ट होऊन शरीर संबंध हेल्दी आणि आनंदी होऊ शकतात हे त्यांच्या लक्षातच येत नाही.

जोडप्यांमधील साधा स्पर्श देखील एकमेकांमधील नातं दृढ करत असतं. एक भावनिक आणि मानसिक समाधान त्या स्पर्शामुळे मिळत असतं.पण स्पर्शाची साधी सरळ भाषा समजतच नसेल तर अशा जोडप्यांमध्ये खटके तर उडणारच. शारीरिक संबंध असो वा आणखी काही गोष्टी एकमेकांवर ते चिखलफेक करायला मागे पुढे पहात नाही. गरज,सुख, समाधान याच्या व्याख्या त्यांना उमगलेल्याच नसतात.जबरदस्ती, किंवा एखाद्या क्लिपमध्ये जसं आहे तसं करण्यास भाग पाडणे,त्यावरून चिडचिड करणे,हे असच असतं ,तसचं असायला हवं, मीपणा, अहंकारी वृत्ती यामध्ये कित्येक जोडपी स्पर्शाची भाषाच विसरतात. स्पर्शाची भाषा किती बोलकी असते याची जाणीव त्यांना सहसा होत नाही.

त्यामुळे आधी प्रत्येकाने स्पर्शाची भाषा समजून घ्यायला हवी. केवळ साध्या हलक्या स्पर्शानेही आपली हक्काची व्यक्ती सुखावते, सिक्युर फील करते हे लक्षात घ्यायला हवं. घाईघाईने कोणत्याही गोष्टी समजत नाही.त्यामुळे शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाही आधी स्पर्शाला बोलकं करायला हवं.नात्याची कुपी हळूवारपणे खोलायला हवी.तरच नातं भावनिक, मानसिक आणि शारीरिकरित्या सुदृढ आणि आनंदी राहू शकतं.

जमलं तर ‘स्पर्श’ समजून घ्या.स्पर्शाची ताकद समजून घ्या.आयुष्य सहज सुंदर होईल.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “स्पर्शाची भाषा न समजणारी जोडपी कायम शरीर संबंधाबाबत एकमेकांवर चिखलफेक करतात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!