“नवरा सोडून गेला तरीही एक स्त्री भक्कम आयुष्य जगू शकते.”
मधुश्री देशपांडे गानू
“जीने के लिये सोचा ही नहीं
दर्द संभालने होंगे…
मुस्कुराये तो मुस्कुराने के
कर्ज उतारने होंगे…
मुस्कुराऊं कभी तो लगता हैं
जैसे होठोंपे कर्ज रखा हैं…..
तुझसे नाराज नहीं, जिंदगी हैरान हूं मैं……….”
आयुष्याचा जोडीदार अर्ध्याच वाटेवर सोडून, कधीही परत न येण्यासाठी निघून गेला तर त्या स्त्रीची या अप्रतिम गाण्यामधील भावनांसारखीच भावना असेल. हो ना!! खरंच तिला तिचं आयुष्य संपल्यासारखं वाटतं. कशासाठी आणि कोणासाठी जगायचं?? हा प्रश्न तिच्या समोर आ वासून उभा राहतो. पण तरीही सगळं बळ एकवटून, मुलांसाठी, सासू-सासऱ्यांसाठी, आई-वडिलांसाठी ती पुन्हा पदर खोचून उभी राहते.
पूर्वीच्या काळी अतिशय लहान वयात मुलींची लग्न होत. नवरा बीजवर, तीजवर ही असे. वयात प्रचंड तफावत. आणि मृत्यू दरही फार होता. त्यामुळे अगदी तिच्या बालवयात नवऱ्याचं निधन होणं फारच सामान्य गोष्ट होती. आणि हाल अपेष्टांचे दिवस सुरू होत. अतिशय बुरसटलेल्या, विकृत, माणुसकीहीन रूढी परंपरांना तिला सामोर जावं लागे. अगदी सतीची ही परंपरा होती. शारीरिक, मानसिक अत्याचार होत. एका स्त्रीचे जीवन मरणप्राय होत असे.
आज समाज खूपच सुधारलेला, पुढारलेला आहे. आजही जन्मदात्यांना मुलगी म्हणजे दुसऱ्याचं धन, दुसऱ्याचं देणं, ओझं असं वाटतं. जणू काही लग्न हेच एका स्त्रीच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे. तिला स्वतःचं अस्तित्व, माणूस म्हणून तिची स्वतःची ओळख अशी नसतेच. एकदा नवऱ्याचं नाव पुढे लागलं की सगळा समाज सुटकेचा निःश्वास टाकतो.
पण आजची स्त्री ही किमान शिक्षित तरी असते. सुशिक्षित, उच्चशिक्षित, आर्थिक स्वातंत्र्य असलेली आजची प्रगत स्त्री ही स्वतःचं अस्तित्व, स्वतःची ओळख, स्वतःला माणूस म्हणून सिद्ध करण्यासाठी समर्थ, सक्षम आहे.
अशातच एखाद्या स्त्रीचा नवरा तरुण वयात किंवा मध्यम वयात अचानक संसार अर्ध्यातून सोडून गेला तर त्या स्त्रीवर दुःखाचा डोंगर कोसळतो. अचानक पणे ती एकाकी, एकटी पडते. त्यातून मुलं असतील तर सगळी जबाबदारी तिच्या एकटीवर पडते. आज अशा अनेक स्त्रिया सासू-सासरे, स्वतःचे आई वडील आणि मुलं यांची सर्वस्वी जबाबदारी एकट्याने समर्थपणे, भक्कमपणे सांभाळताना दिसतात.
“प्रत्येक स्त्रीला तिचं सौभाग्य अखंड असावं असंच वाटतं.” पण नियतीचा क्रूर आघात सहन करावा लागतो. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून, मनातच दाबून टाकून इतरांसाठी तिला जगावं लागतं. नव्हे सर्वार्थाने जगावं लागतं.
अशावेळी जे घडलं ते नुकसान अपरिमित आहे. कधीही न भरून येणारं आहे. तरीही निश्चयाने, समर्थपणे तिने जीवनाला पुन्हा सामोर जायला हवं. “जाणारा निघून जातो पण मागे राहिलेल्यांना जगावच लागतं.” मग आपल्या साथीदाराच्या गोड आठवणी मनात जपून ठेवून, त्याची ऊर्जा आपल्या सोबत कायम आहे, असा विश्वास स्वतःला देऊन मनापासून आनंदाने जगण्याचा स्वीकार तिने करायलाच हवा. एक स्त्री हे करूच शकते.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा स्त्रीचं आर्थिक स्वतंत्र असणं.. जर ती आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असेल तर तिच्या निम्म्या समस्या कमी होतात. तिला कोणावर अवलंबून राहावे लागत नाही. आणि तिचा गैरफायदाही घेतला जात नाही. आपल्याकडे अशा स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन अत्यंत हीन, संकुचित आहे. बाकीच्या स्त्रियांना अशी स्त्री गरीब, बिचारी वाटते.
आणि पुरुषांना ती सहज available वाटते. या दोन्हीं चुकीच्या समजांना सणसणीत लाथ मारून अशा स्त्रीने भक्कमपणे, समर्थपणे, सक्षमपणे पूर्णत्वाने जगावं. कोणाचीही हिंमत होता कामा नये, अशी वर्तणूक सर्वात प्रथम त्या स्त्रीची असायला हवी.
स्वतःला सतत कार्यमग्न ठेवणे हे अशावेळी अत्यंत आवश्यक आहे. नोकरी, व्यवसाय, स्वतःच्या आवडीनिवडी, छंद, मुलांचं संगोपन, स्वतःच्या कुटुंबात सर्वार्थाने रमणे यामध्ये स्वतःला झोकून देऊन ती सर्वार्थाने जगू शकते. “जर जगायचं आहेच, तर मग मनापासून, आनंदाने का नाही??” मुलांचे शिक्षण, संगोपन, त्यांना उत्तम माणूस म्हणून घडवणं ही जबाबदारी ही ती एकटी समर्थपणे पार पाडते.
नैसर्गिकच स्त्री ही पुरुषांपेक्षा चिवट असते. त्यामुळे नवऱ्याच्या माघारीही ती अत्यंत समर्थपणे, स्वतंत्रपणे जगू शकते. असा प्रसंग कोणावरही येऊ नये हे तर खरं.. पण यासाठीच पालकांनी आपल्या मुलींना एक स्वतंत्र व्यक्तिमत्व, सक्षम, आर्थिक स्वतंत्र, एक माणूस म्हणून घडवायला हवे. केवळ मुलगी म्हणून जुने बुरसटलेले, कालबाह्य संस्कार तिच्यावर करू नयेत. तरच अशा आकस्मिक घडलेल्या अतिशय दुःखद घटनेला ती ताकदीने सामोरी जाऊ शकेल. आणि त्यातून लवकर सावरेल.
शेवटी हे सगळं आपल्या मानसिकतेवर, मनाच्या विचारांवर आधारित आहे. अत्यंत सकारात्मकतेने, आत्मविश्वासाने एक स्त्री नवऱ्याच्या माघारीही उत्तम, आनंदी, संपूर्णतेने आयुष्य जगू शकते.
पुनर्विवाह करणे किंवा लिव्ह-इन-रिलेशनशिप मध्ये राहणे असा कोणताही निर्णय सर्वस्वी त्या स्त्रीची वैयक्तिक बाब आहे. आणि जोडीदाराची गरज, सोबत असावी असं वाटणं सहज नैसर्गिकही आहे. सारासार विचार करून हा निर्णय एखादी स्त्री घेऊ शकते.
नवरा अर्ध्यावर सोडून जाणं याचं दुःख फक्त एक स्त्रीच जाणू शकते जी यातून गेली आहे. ही रिकामी जागा मनात कायम ठेवूनही ती स्वतःचं आयुष्य भरभरून, मनापासून, स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून, आनंदाने, सर्वार्थाने, भक्कमपणे जगू शकते. नव्हे ती जगतेच. तिला आनंदाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहेच..आणि तिने तो नक्कीच मिळवावा…
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

फारच सुंदर विचार असतात
खुप छान वाटत वाचायला, पण प्रत्यक्षात जगताना मात्र खूप कठीण होत, खर तर असा जोडीदार मध्यावर सोडून गेलेला असेल तर पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या वागण्याचा जास्ती त्रास होतो मॅडम, जेव्हा अस्या माझ्यासारख्या स्त्रियांना सगळ्या चांगल्या गोष्टंमधून वगळल्या जात डावलल्या जात ना तेव्हा खूप वाईट वाटत, अपमान वाटतो,हळदी कुंकू, ओटी भरणे या गोष्टी आश्या स्त्रियां ना करत नाही
लेख खूप छान आहे पण मला माझा अनुभव शेयर करावासा वाटला म्हणून पोस्ट केला
खुप छान. 👌