सर्व इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, भावना फक्त पुरुषांनाच असतात का????
अपर्णा कुलकर्णी
मिहिर आणि रुहीच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली. त्यांना रुद्र नावाचं एक गोड,गोंडस बाळ झालं अगदी वर्षभरात. रूहीचे तिच्या रुद्रवर अतिशय प्रेम. जणू काही तोच तिचा श्वास, सगळे जगच. रुही मिहिर पेक्षा जास्त शिकलेली आणि हुशार पण रुद्रला बघायला घरात कोणीच नसल्याने तिने करिअरचा विचारच सोडून दिला होता. घरात बसूनच रूहि छोटे मोठे ऑनलाईन काम करून पैसे मिळवत असे. मिहिरने त्यात नवीन घर घेतले होते.
रुहीला कसल्याही व्यवहारात सामील करून न घेता, विचारात न घेता. कारण मिहिरचा स्वभाव खूपच विचित्र आणि स्वभाव खूप जुन्या विचारसरणीचा होता. बायकांनी फक्त रांधा,वाढा,उष्टी काढा इतकेच करावे. नवऱ्याने बस म्हटल की बसावे आणि उठ म्हटले की उठावे अशी त्याची अपेक्षा. स्वतःची बुद्धी चालवू नये रादर हे विसरून जावे की आपल्याला मेंदू नावाची गोष्ट असते. त्यामुळे घरातील सगळे छोटे मोठे निर्णय तोच घेत होता, किराणा आणण्यापासून ते भाजी पर्यंत सगळच. कारण पगारातील काही रक्कम बायकोला द्यावी हे त्याच्या अल्प मेंदूत कधीच शिरले नव्हते आणि रुहिने शिरवण्याचा केलेला प्रयत्न त्याला पटला नव्हता.
त्यामुळे रुही आणि मिहिरचे तोंड नेहमीच विरुध्द दिशेला असायचे. कारण रुही एक स्वतंत्र विचारांची आणि हुशार मुलगी होती. त्यात तिचे विचार मिहिरच्या अगदीच विरुध्द टोकाचे होते. स्त्री पुरुष समानता मानणारी होती रुही. पण मुलासाठी सगळेच गप्प बसून सहन करत होती कारण त्या दोघांच्या भांडणात बिचाऱ्या रुद्रच्या बालमनावर परिणाम होत होता आणि त्याचे बालपण हिरावले जात होते. जन्म दिल्यापासून रुहीने रुद्रचे सगळेच स्वतःच्या हाताने केले होते अगदी मालिश आणि अंघोळपण. कोणावरही अवलंबून न राहता. मग त्याला स्वतःच्या वागण्याने त्रास कसा होऊ दिला असता तिने.
यातच खरतर सहा वर्षे उलटून गेली होती. प्रत्येक दिवस मिहिरशी लग्न केल्याचा पश्र्चाताप व्यक्त केला होता रूहीने. बघायला आला होता तेंव्हा किती वेगळा वागला आणि लग्न झाल्यावर खूप वेगळा वागला होता मिहिर. आर्थिक व्यवहार असो किंवा मिहिरच्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट असो मिहिरने बायकोला सांगणे, तिच्याशी बोलणे महत्त्वाचे मानले नव्हते. पण रूहीच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा तपशील मात्र त्याला हवाच असायचा.
अगदी ती फोनवर जरी कोणाला बोली तरी कोणाशी बोलली, काय बोलली ?? मेसेज कोणी केला सगळच त्याला जाणून घ्यायचं असायच. रुहीला हेच पटत नव्हते. तिने स्वीकारले होते की नवरा आपल्याला कोणत्याच गोष्टीत गृहीत धरत नाही फक्त घरातील मोलकरीण असल्यासारखे वागवतो. या कटू सत्याचा तिने स्वीकार केला होता पण त्या बदल्यात त्यानेही म्हणजेच नवऱ्याने ही तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नये इतकीच तिची माफक अपेक्षा होती.
इतकेच काय तर कधी आजारी पडल्यावर मिहिर तिला काय झालं हे ही विचारत नव्हता तर ती दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांना बील द्यावे लागेल म्हणून हॉस्पिटल बाहेरच थांबत होता. बायकोचे दुखणे निस्तरणे म्हणजे फुकट पैसा वाया घालवणे असे त्याला वाटत असे. कारण त्याच्या दृष्टीने रूहीने नोकरी करून त्याच्या घराला हातभार लावावा असे त्याला वाटे. मी घर घेतले, त्याचे हफ्ते फेडतो, घरात सगळं भागवतो आणि ही काहीच न करता आयते बसून खाते असेच त्याला वाटत होते.
रूहिला त्याच्या या स्वभावाची चांगलीच कल्पना होती. म्हणूनच कामाचे पैसे ती बाजूला काढून ठेवत असे. कधी कोणत्या वेळी लागतील सांगता येत नाही याची तिला कल्पना होती. एकदा तसेच झाले, रुही तापाने फणफणली. सर्दी,ताप, थंडी, अंगदुखी सगळेच एकदम गाठून आले. रूही बेडवर तळमळत होती. तरीही सकाळची सगळी कामे तिने उरकली होती. मिहिर घरातच होता पण तुला काय होतंय हे एका शब्दानेही त्याने तिला विचारले नव्हते.
रात्री मेडिकलमध्ये जाऊन कसल्यातरी गोळ्या आणून दिल्या त्याने रूहिला पण त्याने काही तिला फरक पडला नाही. दुसऱ्या दिवशी अशा अवस्थेत उठून तिने चहा केला आणि रुद्रला बिस्कीट देऊन एकटीच दवाखान्यात निघाली. तेंव्हा झोपेतून नवरा उठला आणि उगाच औपचारिकता म्हणून दवाखान्या बाहेर सोडून पुन्हा गेला. रूहीला एकशे एक ताप होता. डॉक्टरांनी तिला तपासले आणि इंजेक्शन दिले. तेवढ्यात तिला चक्कर आली आणि तिथेच डॉक्टरांच्या अंगावर पडली. जरा वेळाने ती उठली तेंव्हा फोन करून मिहिरला सगळे सांगितले तर मिहिर उपकार केल्यासारखे हॉस्पिटल बाहेरच थांबला. काय झालं आहे हे विचारण्यासाठी पण डॉक्टरपर्यंत तो आला नाही. बिल रूहीनेच भरले, ते तिलाच भरावे लागणार होते म्हणा.
दोन दिवस झोपून कसेबसे थोडे कामे करून तिने काढले. या काळात मिहिरने मुलासोबत खूप दंगा केला, मोबाईलवर मोठ मोठ्याने मालिका लावून बघत बसला. रूहीला कसलाही आराम करू दिला नाही. नंतर दोन दिवसांनी मिहिर आजारी पडला. त्यालाही खोकला सर्दी झाली. तेंव्हा मात्र रूहीने बायकोची सगळी कर्तव्ये पार पाडावी. खायला, प्यायला करून द्यावे. जवळ बसून चौकशी करावी असे वाटू लागले. तसे त्याने रूहिला बोलून दाखवले तेंव्हा ती म्हणाली मी पण दोन दिवस आजारी होते, मलाही शांततेची, आरामाची गरज होती. प्रेम नाही निदान माणुसकी म्हणून तर डॉक्टरांना तोंड दाखवायचे होते तुम्ही. पण तुमच्या खिशाला झळ लागेल या भीतीने तुम्ही तिथपर्यंत आला पण नाहीत. घरात बसून मला शांतता लाभू दिली नाही.
सर्व इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, भावना फक्त पुरुषांनाच असतात का???? मी मात्र माझ्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, भावना मारून जगत आले फक्त माझ्या रुद्रसाठी. पण तुम्हाला ते कळेल अशी अपेक्षाच नाही मला. आता माझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवायची नाही कारण अपेक्षा भांगाच दुःख पदरात पडेल बाकी काही नाही.
