अनेक जोडपी ‘ साधेपणा ‘ या जगण्याच्या जीवनशैलीपासून दुरावत चालले आहेत.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
दोघांचं बोलण झाल आणि ते निघायला उठले. आजची ही त्यांची दुसरी भेट होती. लग्न ठरवताना पहिल्यांदा भेटले ते मृणमयीच्या घरीच. सर्व काही जुळत होत, नाही म्हणायला तसा काही वाव नव्हता.
आणि मुख्य म्हणजे मृण्मयी आणि यशला देखील एकमेकांसोबत बोलायला मिळालं होत. दोघेही काही लाजरेबुजरे नव्हते. आणि या मताचेही नव्हते की एकाच भेटीत खूप जास्त खोलात जाऊन बोललं की सर्व समजत. त्यावेळी, त्या भेटीत त्यांना जितकं एकमेकांविषयी जाणून घ्यायला हवं होत तितकं त्यांना घेता आलं. त्यावर त्यांनी होकार दिला.
त्या दिवसांनंतर आज ते कॅफे मध्ये भेटत होते. स्वतःच बालपण, कॉलेज मधल्या गमती जमती या बद्दल त्यांचं बोलण चाललं होत. ज्यात मृण्मयी ने एक किस्सा सांगितला की कसं तिने तिच्या मैत्रिणीला त्रास देणाऱ्या मुलाला चोप दिला होता. जेव्हा ती हे सांगत होती तेव्हा यश चे डोळे विस्फारले होते कारण तिच्याकडे पाहून अस अजिबात वाटत नव्हत की ती मारामारी वैगरे करू शकते. बोलण वागणं दिसायला नाजूक बाहुलीसारखी होती. पण दिसत तस नसत ना!
यश मात्र या उलट होता. हातापेक्षा बोलण्यातून गोष्टी सोडविण्यावर त्याचा जास्त भर होता. अशी ही दोन विरुद्ध स्वभावाची माणसं आज त्यांच्या सहजीवनाची बोलणी करत होती. अश्याच मजा मस्तीत बोलण चाललं होत. तेव्हड्यात यशला आठवलं की काही दिवसात मृण्मयीचा वाढदिवस आहे.
त्याने तिला विचारलं, “तुला गिफ्ट म्हणून काय पाहिजे? आपली भेट झाल्यानंतर तुझा पहिला वाढदिवस आहे हा! त्यामुळे मला तुला काहीतरी छान द्यायचं आहे. तू सांग.” त्यावर मृण्मयी त्याची मजा घेत म्हणाली, “अरे वा, वाढदिवस माझा आणि गिफ्ट काय द्यायचं हे सुध्दा मीच सांगायचं का?” “अग तस नाही पण मी काहीतरी घेतल आणि तुला आवडलं नाही अस व्हायला नको ना म्हणून मी विचारलं.”
“बरं बरं ठीक आहे. तू मला काहीही गिफ्ट देऊ शकतो. पण ते इतरांनी दिलेल्या गिफ्टपेक्षा खूप वेगळं असलं पाहिजे. जमेल?” तो मान हलवत हो तर म्हणाला पण त्याला देखील आता प्रश्न पडला की वेगळं म्हणजे काय द्यायचं जे नेहमीच्या गोष्टीत येणार नाही आणि आवडेल सुध्दा. तिला त्याच्याकडे पाहून हसू येत होत. पण तिने ते दाखवल नाही. दोघेही घरी जायला उठले. त्याने तिला सोडले व तो देखील जायला निघाला.
अजूनही त्याला सुचत नव्हत की काय द्यायचं. कारण एरवी मुलींना गिफ्ट द्यायचं म्हणजे त्यात फार फार तर दागिने, कपडे, परफ्यूम यासारख्या गोष्टी येतात. जे तिला नको होत. असच खूप वेळ विचार करून अचानक त्याला एक गोष्ट सुचली. स्वतःवरच खुश होत त्याने स्वतः ला शाबासकी दिली.
वाढदिवसाचा दिवस आला. खूप माणसं आली होती. मृण्मयीच कुटुंब सधन होत तसच त्यांना लोकांमध्ये मान होता, ओळख होती त्यामुळे अनेक जण आली होती. सर्वांनी तिला खूप छान छान आणि महागतील गिफ्ट आणली होती. पण तिला आतुरता होती यशने आणलेल्या गिफ्टची. सरतेशेवटी तो आला. त्याच्या हातात एक छोटंसं पॅकेट होत. तो तिच्या जवळ गेला व तिला विश केले. तिने पण हसुन दिले. पण तिला कधी एकदा ते गिफ्ट उघडून पाहते अस झाल होत. ती त्याच्याकडून काढून घेत होती तेव्हड्यात तोच म्हणाला, “अग थांब थांब, हे गिफ्ट मी आणलय ना! मग मीच तुला ते देणार. आणि हे गिफ्ट बाकीच्या गिफ्ट सारखं महाग वैगरे नाहीये हा! पण वेगळं मात्र आहे.” अस म्हणत त्याने ते पॅकेट उघडल व त्यातून ती वस्तू सावकाश बाहेर काढली.
काढता क्षणी एक सुंदर असा सुवास सगळीकडे दरवळला. कारण तो एक छान असा मोगऱ्याच्या फुलांनी भरलेला गजरा होता. “मग कसं वाटल गिफ्ट?” यश ने अस विचारताच मृण्मयी आनंदी होऊन म्हणाली, “खूप छान आणि सुंदर. मला आवडलं.” तिच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत होता. त्याच ते गिफ्ट बाकी लोकांना पण आवडलं.
मृण्मयीची आई हसुन म्हणाली, “जावईबापू आता गजरा आणलाच आहे तर तो तुमच्याच हाताने तिच्या डोक्यात माळा.” यश ने पण तो स्वतःच्या हाताने तिच्या केसात माळला. त्यामुळे ती देखील अजून सुंदर दिसू लागली. या यशच्या वेगळ्या आणि अनोख्या गिफ्ट ने ते पूर्ण वातावरण प्रसन्न करून टाकले.
तस पाहिलं तर हे काही महागडं गिफ्ट नव्हत. तो एक साधा गजरा होता. पण त्याच ते साधेपण त्याच मूल्य अजून वाढवत होत. त्याचा तो सुवास हे सुचवत होता की आपण जिथे कुठे जाऊ तिथे आपल्या अस्तिवाचा सुवास दरवळला पाहिजे. हेच त्याचं अनोखेपण होत आणि हाच विचार करून यश ने त्याची निवड केली होती.
म्हणूनच अगदी साधा वाटणारा मोगऱ्याचा गजरा आज अनमोल भेट ठरला होता…
