Skip to content

नवरा किंवा बायको दोघांपैकी एक फार संशयी असेल तर नातं कसे टिकवावे ?

नवरा किंवा बायको दोघांपैकी एक फार संशयी असेल तर नातं कसे टिकवावे ?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“काय सांगू यार तुला, मला समजतच नाही तिच्याशी कसं वागावं. मी कितीही नीट वागलो, प्रेमाने वागलो तरी तिला पसंद पडत नाही. नाराजी ही चेहऱ्यावर असतेच. आणि संशय घेणं. ते तर काय विचारूच नको. पाच मिनिटं फोन उशिरा उचलला झालं निशाच बोलण सुरू. “इतकाच वेळ का केला? मग समोर कोण बसलच होत का? इतकं काय अर्जंट होत की माझा फोन उचलला नाही.” परवाचाच एक प्रसंग सांगतो, तिला शॉपिंगला जायचं होत.

मी सुद्धा सोबत हवा होतो तिला. म्हणून तिला म्हटल ऑफिसकडे ये तिथून एकत्र जाऊ. तिला पण ती कल्पना आवडली. माझं काम झाल्यावर मी बाहेर येऊन थांबलो. तेवढ्यात माझी एक कलिग पण तिथे आली. तिला सुध्दा कोणतरी न्यायला येणार होत आणि निशा सुध्दा अजून यायची होती म्हणून आम्ही तिथे गप्पा मारत थांबलो.

थोड्या वेळाने तिथे निशा आली पण माझं बोलण्याच्या नादात तिच्याकडे लक्ष गेलं नाही. ती कलिग गेल्यावर मी समोर पाहिलं तेव्हा निशा आली होती. तेव्हा मी तिच्याजवळ जाऊन हसुन म्हणालो, “चला जाऊ शॉपिंगला.” पण ती एकही शब्द न बोलता तसच उलट पावली घरी निघून आली. मलाही काही समजल नाही मी सुध्दा घरी आलो.

तिला किती वेळा विचारलं तरी काही बोलली नाही आणि शेवटी फणकाऱ्याने म्हणाली, “तुला ऑफिसकडून जवळ पडत म्हणून यायचच नव्हत मुळी. त्या मुलीशी मस्त बोलता यावं त्यासाठी ही खटपट. नक्की काय चालू आहे तुमच्यामध्ये?बरोबर आहे, मी तिच्याइतकी सुंदर नाही ना!” तिचं बोलणं ऐकून मला काय बोलावं हे सुचेना. आमच्या साध्या बोलण्याला तिने हे वळण दिलं. हे एक उदाहरणं मी सांगितलं. पण वरचेवर अस काही ना काही होतच असत.”

नील हे सर्व त्याच्या मित्राला सांगत होता. कारण त्याला या गोष्टी हाताळणं आता कठीण जात होत. आणि संसारात अश्या गोष्टी होतात म्हणून सरळ वेगळं होऊया, किंवा वादविवाद करूयात असा त्याचा स्वभाव नव्हता. त्याला मनापासून हे नात टिकवायचं होत. आणि त्याला हे देखील माहीत होत की निशाला सुद्धा हे नात हवं आहे. तिच सुद्धा त्याच्यावर प्रेम आहे. पण तिचं हे अस वागणं त्याच्या आकलनापलिकडे होत. इतके दिवस त्याने या सर्व गोष्टी त्याच्या पुरत्या मर्यादित ठेवल्या होत्या. पण आज मात्र त्याला वाटलं की आपल्याला आपलं मन मोकळं केलं पाहिजे म्हणून त्याने हे सर्व आपल्या मित्राला सांगितलं.

नीलला होणारा त्रास स्वाभाविक होता. कारण नवरा बायकोच्या नात्यात सर्वात जास्त काय महत्त्वाचा असेल तर तो विश्वास. त्याला तडा गेला, त्याची जागा संशयाने घेतली तर नात्याला सुद्धा तडा जाण्याची शक्यता असते. नवरा बायकोपैकी एक जरी कोण अस असेल तर त्याचा त्रास दोघांना पण होतो. संयम तुटतो, वाद होतात, संघर्ष निर्माण होतात. अश्या वेळी नात टिकवायचं तरी कस? असा प्रश्न पडतो. कारण सर्व नीट असताना संशयाची कारण समजत नसतात. इथे समुपदेशकाची मदत महत्त्वाची आणि योग्य ठरते. कारण आपल्याला प्रत्येक वेळी सर्व ठीक करता येईलच अस नसत. म्हणून योग्य त्या वेळी समुपदेशकाकडे जाण तुमचं नात टिकवू शकत.

सीबीटीचे जनक Aron Beck यांनी आपल्या “love is never enough” या पुस्तकात जोडप्यांमध्ये निर्माण होणारे वेगवेगळे संघर्ष, त्यांची मुळ कारण आणि त्यांना कसं सामोरं जायचं, त्यांना कसं हाताळायच याची अतिशय पद्धतशीरपणे मांडणी केली आहे. आताच्या काळात सीबीटी ही सर्वात जास्त वापरली जाणारी थेरपी आहे. जी बहुतेक सर्व मानसिक समस्यांसाठी वापरली जाते ज्यामध्ये जोडप्यामध्ये असणाऱ्या समस्या देखील येतात. ही घेताना समजत की नवरा किंवा बायको कोणा एकाच जे संशयी वागणं असत त्याला काहीतरी कारण असतात. त्यांना जरी अस वाटत असल की त्यांच्या संशयाचं कारण त्यांचा नवरा किंवा बायको आहे, त्यांचं वागणं आहे तरी ते खर कारण नसत.

निदान जिथे खरच पार्टनर प्रामाणिक असतो तिथे तरी. थेरपिस्टशी बोलताना त्यांना या गोष्टींचा उलगडा होतो की त्यांचा रागाचं, संशयाचं कारण त्यांचे विचार असतात. जे इतके सहजेतेने आलेले असतात की त्यांची जाणीव त्यांना देखील होत नसते. म्हणून यांना automatic thoughts असे म्हटले जाते. जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा हे विचार आधी येतात आणि त्यानुसार काहीतरी रिएक्शन येते. हे विचार शोधून काढायची गरज असते ज्यामध्ये थेरपिस्ट आपल्याला मदत करतात. पार्टनर बद्दल जरी संशयी विचार मनात येत असतील तरी त्याच्याही आधी कुठेतरी सेल्फ doubt असतो, स्वतः बद्दल काही पूर्वग्रह असतात ज्यातून हे सर्व सुरू झालेले असत.

नील आणि निशा च्या केस मध्ये निशाच्या मनात आपण बायको म्हणून कुठेतरी कमी पडतोय, आपण देखण्या नाही, इतरांसारख्या सुंदर नाही असा विचार आहे. यातून मनात आपल्या नवऱ्याला आपण गमावून बसू अशी भीतीची भावना येते आणि त्यामुळे जेव्हा कधी नीलच वागणं कळत नकळत तिच्या या विचारांना जोडणार ठरतं तेव्हा तिच्या मनात संशय येतो आणि त्याच रूपांतर रागात होत. जेव्हा तिला हे समजेल की आपल्या संशयाचं कारण नील नसून आपले स्वतःचे विचार आहेत तेव्हा ती त्यांना सुधारू शकते ज्यातून तिचा स्वतःवरचा विश्वास देखील वाढेल आणि नीलवरचा देखील. या सर्व गोष्टी समुपदेशन केल्याने शक्य होतात.

आता इथे पार्टनरचा रोल काय असतो? तर आपल्या नवऱ्याच्या किंवा बायकोच्या या विचारांना कमी करण्यास मदत करणे. त्यांना याची जाणीव करून देणे की त्यांना वाटतं तस काही नाही. एक नवरा किंवा बायको म्हणून त्या अतिशय उत्तमरित्या सर्व सांभाळत आहेत. आपली बाजू नीट समजावून सांगणे. त्यांच्या वागण्याला प्रत्युत्तर न देता त्यांच्या वागण्याचं कारण समजून घेऊन त्यानुसार वागणे. आणि हे सर्व करण्यासाठी चांगला संवाद हवा. सर्व गोष्टी नीट होतात जर आपण ठरवलं तर!!!


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “नवरा किंवा बायको दोघांपैकी एक फार संशयी असेल तर नातं कसे टिकवावे ?”

  1. माझा ही हाच एक प्रॉब्लेम आहे. पण वाचून छान वाटलं

  2. खुप छान लेख आहे …खूप महत्वाचा पण आहे …या लेखामुळे कदाचित काही जोडप्यांचे जीवन नक्कीच बदलून जाईल..

    खुप आभार तुमचे…असेच लेख पोस्ट करत रहा ..💐💐

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!