Skip to content

पती-पत्नी मधील संवाद बिघडण्याची प्रमुख १० कारणे.

पती-पत्नी मधील संवाद बिघडण्याची प्रमुख १० कारणे.


मेराज बागवान


‘संवाद’ ,माणसातील माणूसपण जिवंत ठेवतो. संवाद म्हणजेच काय ,तर एकमेकांशी बोलणे, हितगुज साधणे,विचारांची देवाणघेवाण करणे आणि सोप्या भाषेत म्हणायचे तर , गप्पा मारणे.आयुष्य खऱ्या अर्थाने जिवंत ठेवायचे असेल तर संवाद असायलाच हवा.संवाद नसेल तर नाती जिवंत राहत नाहीत, संवाद नसेल तर काळजी, प्रेम उरत नाही.म्हणूनच ह्या संवादाला खूप महत्व आहे.

पती-पत्नी तर अगदी जवळचे नाते.दोन शरीर एक आत्मा असे हे नाते.आयुष्यभर साथ देण्यासाठी बनवलेले हे नाते.पण आजकाल पती-पत्नी मधील संवाद हरवत चालल्याचे बरेच ठिकाणी दिसते.कुठे संवाद आहे, पण तो सुसंवाद नाही, बिघडत चाललेला संवाद आहे.मग काय असू शकतात ह्या मागची कारणे?

१) एकमेकांना पुरेसा वेळ न देता येणे- आजकालच्या धकाधकीच्या जीवनात दोघे कमावते आहेत.नोकरी-व्यवसाय ह्या सगळ्यात जास्त वेळ घराबाहेर जातो आणि मग एकमेकांना हवा तसा वेळ देता येत नाही.आणि मग या सगळ्यात संवाद होत नाही.संवाद झाला तरी मग त्यात वाद-विवाद च जास्त होतात.

२) हट्टी / आत्मकेंद्रित स्वभाव – कधी पत्नी स्वतःच्याच विश्वात रममाण असते, तर कधी पती खूपच हट्टी असतो. एकमेकांचे कोणी एकूणच घेत नाही.आणि त्यामुळे मग बोलणे बंद होऊ शकते आणि संवाद देखील हरवू शकतो.

३) आर्थिक अडचणी – आयुष्यात बरेचवेळा आर्थिक अडचणी, समस्या येतात.कर्ज, वाढते खर्च, आजारपण यामुळे पैसे पुरेनासे होतात, ताण वाढतो.मग ह्या कारणास्तव भांडणे होतात आणि संवाद बिघडतो.

४) अवास्तव अपेक्षा -पती-पत्नी दोघांना एकमेकांकडून अपेक्षा असणे साहजिक आहे. पण ह्या अपेक्षा अवास्तव किंवा कधीच पूर्ण होऊ शकणाऱ्या असतील तर मग कलह निर्माण होऊ शकतात.राग-चीडचिड वाढू शकते आणि मग याचा परिणाम संवादावर होतो.

५) तणावजन्य शारीरिक संबंध – शारीरिक संबंध म्हणजे एक प्रकारचा मूक संवादच असतो.शारीरिक क्रियांमधून एकमेकांच्या भावना एकमेकांपर्यंत पोहचत असतात आणि पती पत्नी मधील तो एक खूप महत्वपूर्ण दुआ असतो .पण हे शारीरिक संबंध जबरदस्तीचे असतील, मनाविरुद्ध असतील तर त्याला काहीच अर्थ उरत नाही.आणि मग ह्यामुळे देखील पती-पत्नी मधील संवाद बिघडू शकतो.

६) कौटुंबिक वादविवाद – सासू-सासरे,नणंद,दिर,जाऊ, घरात असतील तर कधी ना कधी घरगुती कारणांमुळे भांडणे होत असतात.कधी पती घरातील इतर मंडळींची बाजू घेतो , तर कधी पत्नी खूपच हट्टी बनते.मग ह्यामुळे दोघांमधील संवाद हरवतो.

७) संशय – पती-पत्नी यांना ‘इनसिक्युरिटी’ वाटणे सहाजिक असते. पण कधी कधी याचे रूपांतर संशयात होते.मग एकमेकांविषयी शंका, कुशंका, पाळत ठेवणे, मोबाईल तपासणे, इत्यादी प्रकार होत राहतात आणि यामुळे संवाद बिघडतो.

८) मोबाईल फोन आणि समाजमाध्यम याचा अतिरेक – मोबाईल फोनचे व्यसन ही तर घराघरातील समस्या आहे.आणि त्यात भर म्हणजे, वेगवेगळी समाजमाध्यमे.याच्या अतिवापरामुळे एकमेकांकडे चक्क दुर्लक्ष केले जाते.ऑनलाइन तासंतास चर्चा रंगतात.पण समोर बसलेल्या व्यक्तीशी बोलायला वेळ नसतो.आणि मग त्यामुळे संवाद बिघडतो.

९) जबाबदाऱ्यांचे अयोग्य व्यवस्थापन – संसार दोघांचा असतो, कुणा एकट्याचा नसतो.पण कधी कधी कुना एकालाच घरातील, बाहेरील , मुलांचे पाहावे लागते.आपलंच आहे म्हणून त्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या देखील जातात.वाद नकोत म्हणून निमूटपणे सर्व केले जाते.पण हळूहळू यामुळे पती-पत्नी मधील संवाद बिघडत जातो.

१०) स्वातंत्र्य नसणे – प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते.पती-पत्नी देखील दोन व्यक्ती असतात.प्रत्येकाला स्वतःचे असे विचार, मते असतात. पण कधी पती पत्नीवर आपले विचार लादताना दिसतो, तर कधी पत्नी आपल्या आवडी-निवडी पती वर लादताना दिसते.दोघांना नाते हवे असते, पण स्वतःच्या मनाप्रमाणे.मग इथे एकमेकांचे वेगळेपण विचारात घेतले जात नाही.त्याचा आदर कुठेतरी हरवतो.आणि मग आदर हरवला की संवाद नकोसा होतो.

ही काही प्रमुख कारणे आहेत, ज्यामुळे पती-पत्नी मधील संवाद बिघडतो.पण संवाद तर नाती जिवंत ठेवतो, तो बिघडून, हरवून कसे चालेल आणि पती-पत्नी हे नाते तर आयुष्यभरासाठी असते.मग हा संवाद टिकवता आला पाहिजे. पती-पत्नी एकमेकांचा खूप मोठा पाठिंबा होऊ शकतात, जो आयुष्यात विविध प्रकारचे यश मिळविण्यासाठी उपयोगी ठरू शकतो.त्यामुळे हे नाते टिकवता आले पाहिजे आणि ते शक्य आहे एकमेकांमध्ये असलेल्या ‘सुसंवादामुळे’.

आजकाल पती-पत्नी हे नाते खूपच लवकर तुटताना दिसते, वरील कारणे त्यासाठी जबाबदार ठरतात.ही एक मोठी सामाजिक समस्या होत चालली आहे.आज प्रत्येक घराघरात हे ऐकायला, पहायला मिळते आहे, जी खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणनच आज प्रत्येक जोडप्याने ही काही कारणे तपासून, आत्मपरीक्षण करून पती-पत्नी चे नाते चिरकाल टिकवायला शिकले पाहिजे.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!