माणूस निराश का होतो ?
शिक्षक, जिल्हापरिषद
एक क्षण एका दिवसाला बदलू शकतो. एक दिवस एक जीवन बदलू शकतो. अन् एक जीवन म्हणजेच एक जीव… एक मनुष्य जग बदलू शकतो. पण हा क्षण कधी येणार आहे ? तो दिवस कधी येतोय, हे आपल्याला माहित नाही. त्या क्षणाच्या प्रतीक्षेतच मनुष्य निराश होतो. ही निराशा म्हणजेच जीवनात कसलीच आशा न उरणे. निराशा आली की माणूस जीवनातली आशा, आकांशा, धैर्य, हिंमत सोडतो. काम करण्याची इच्छा सोडतो. ही इच्छा सोडली की मग तो आळशी बनतो, निष्क्रिय बनतो. आपण ह्या जगावर एक भार म्हणून जगत आहोत. आपल्या जीवनात कोणतंही ध्येय नाही.
आपल्या जीवनात काहीही अर्थ नाही. सारं जीवन व्यर्थ आहे, असं तो समजू लागतो. पण या साऱ्या गोष्टी बाहेरून येत नाहीत. त्या आपल्याच अंतर्मनातून उत्पन्न होत असतात. निराशेचे बीज आपल्या आतूनच अंकुरत असते अन् आशेचा सागरही आपल्या आतच सामावलेला असतो. एक दिवस निराशेच्या या छोट्याशा बीजातूनच मोठा वृक्ष निर्माण होत असतो अन् आशेचा सागर हळूहळू सुकत जातो. निराश, दुःखी किंवा उदास व्यक्ती दुसऱ्याला ज्ञान देऊच शकत नाही. जी गोष्ट आपल्याजवळ आहे, तीच तो दुसऱ्याला देऊ शकणार. तुम्ही दुःखी असाल तर तुम्ही दुसऱ्याला आनंद देऊच शकणार नाही, तर दुःखच देणार.
आपल्या निराशेचे खरे कारण आपण कधी जाणूनच घेत नाही. पहिली चूक आपण करतो ती म्हणजे आपलं काम आपण लक्षपूर्वक करत नाही. ते काम व्यवस्थित होत नाही, तेव्हा आपण निराश होतो. आपण एकाग्रता टिकवली पाहिजे, संयम पाळला पाहिजे.
माणूस निराश होण्याचं आणखी एक कारण म्हणजे तो सतत आपली तुलना इतरांशी करत असतो. मनुष्य स्वभावानुसार तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्तीशींच तुलना करतो. अन् तिथंच तो फसतो. स्वतःला कमी समजतो, आपला आत्मविश्वास गमावतो. त्यामुळे तो दुःखी, निराश होतो.
म्हणून बुध्द सांगतात, श्रेष्ठ व्यक्तीला श्रेष्ठ समजा, पण आपल्याशी त्याची तुलना करायचं टाळा. कारण जगातली प्रत्येक व्यक्ती एकसारखी कधीच नसते. आपल्यासारखी दुसरी व्यक्ती कोणतीच नसते. त्यामुळे आपली कुणाशीही बरोबरी करू नये.
आपण दुसऱ्यासारखं होऊच शकत नाही. म्हणून आपण जसं आहोत, तसंच स्वतःला. स्वीकारायचं. स्वतःला जाणा, स्वतःला ओळखायला शिका. दुसऱ्याच्या प्रभावानं विचलित होऊ नका. आपल्या निर्मितीवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
गौतम बुध्द पुढे सांगतात, आपण जेव्हा निराश होऊ तेव्हा सर्वप्रथम डोळे बंद करावे. एक दीर्घ श्वास घ्यावा. श्वासावर लक्ष केंद्रित करावे. आपला श्वास चालू आहे. म्हणजे आपण जिवंत आहे. अन् जिवंत आहे याचाच अर्थ आपण काहीतरी करू शकतो. जो काहीच करू शकत नसतात, ते मृत… मुडदे असतात. अन् त्यांची घरे स्मशानात असतात. जगात अशक्य असं काहीच नसतं. फक्त एक गोष्ट करायची, आपलं जीवन दुसऱ्याच्या स्वाधीन कधीच करायचं नाही.
(गौतम बुध्द यांचे सकाळी ऐकलेले विचार रूपांतरित केले)
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 हा क्रमांक आपल्या मोठ्या व्हाट्सएप समूहात ऍड करा.
एकदम मस्त
खूपच छान
खूपच सुंदर लेख आहे संपूच नये असे वाटत होते
Super
Khup chan
खूपच सुंदर लेख असाच पुढे पुढे क्रमश: असावा असे वाटते